काँग्रेस पक्षात सक्षम नेत्यांचे खच्चीकरण होते – ज्योतिरादित्य शिंदे..

| भोपाळ | गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हातात घेतले होते. तदनंतर त्यांची भाजपतून राज्यसभेवर वर्णी देखील लागली. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली आहे. “काँग्रेस पक्षात सक्षम नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले जातात. आपले माजी सहकारी सचिन पायलटदेखील अशाच परिस्थितीतून गेले आहेत,” असं मत ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केलं.

“सचिन पायलट हे माझे मित्र आहेत. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. अनेकांना याची कल्पनाही आहे. काँग्रेस पक्षात सक्षम नेत्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं ही बाब दु:खद असून या परिस्थितीतून माझे माजी सहकारी सचिन पायलट हेदेखील गेले आहेत,” असं शिंदे म्हणाले. सोमवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं त्यांनी कौतुक केलं. “जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं, अयोध्येत राम मंदिराचं पूजनही करण्यात आलं आणि चीन त्यांच्या भाषेत प्रत्युत्तरही दिलं,” असंही त्यांनी नमूद केलं. इंटरनेट हे एक स्वतंत्र माध्यम आहे. परंतु जनतेचा विश्वास गमावणाऱ्यांकडे जेव्हा बोलण्यासाठी काही नसतं तेव्हा अशा मुद्द्यांमध्ये हात घातला जात असल्याचंही शिंदे म्हणाले.

“फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही व्यक्तीबाबत करण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह विधानावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे या मताचा मी आहे,” अंसही त्यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी १९८५ मध्ये तत्त्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराची कुलुपं उघडल्याचं म्हटलं होतं. यावर शिंदे यांनी भाष्य केलं. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले. “कॉंग्रेस (राम मंदिराच्या मुद्द्यावर) स्वत:च मध्येच अडकत आहे. त्यांच्या नेत्यांनी काय केलं आणि काय नाही हे त्यांच्याच नेत्यांना माहित नाही,” असंही शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *