जागर इतिहासाचा : आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी साखर.. वाचा त्या साखरेचा इतिहास..

ईशान्य भारतातील सुपीक खोरी व दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटे येथे उसाची सर्वांत प्रथम उपज झाली असे मानतात.पुरावनस्पतिवैज्ञानिक घटक, प्राचीन वाङ्मयातील संदर्भ आणि शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र यांच्यावरून भारताविषयीच्या विधानाला पुष्टी मिळते. भारतात पुष्कळ ठिकाणी काष्ठयुक्त व जंगली ऊस वाढताना आढळतो. त्याच्यात आधुनिक काळात पिकविण्यात येणाऱ्या उसाची

सर्व वैशिष्ट्ये आढळतात. इंग्रजीत साखरेसाठी असलेला‘ शुगर’ हा शब्द संस्कृत‘शर्करा’ शब्दावरून आला आहे. भारतातून गेलेला शर्करा हा शब्द अनेक शतकांनंतर अरबी भाषेत शक्कर असा झाला नंतर मध्ययुगीन लॅटिन भाषेत तो सुकॅरम असा झाला आणि अखेरीस तो शुगर म्हणून इंग्रजी भाषेत दाखल झाला.

भारतातील ऊस इ. स. पू. १८००– १७०० दरम्यानच्या काळात चीनमध्ये गेला. उसाचा रस उकळून कच्ची साखर तयार करण्याचे तंत्र गंगेच्या खोऱ्यातील लोकांकडून मिळाल्याचे अनेक चिनी लेखकांनी लिहून ठेवले आहे. नंतर ऊस फिलिपीन्स, जावा व हवाई बेटे येथे गेला. शेकडो वर्षांपूर्वी स्पॅनिश नाविक पॅसिफिक महासागरात गेले. तेव्हा तेथील अनेक बेटांवर जंगली ऊस असल्याचे त्यांना आढळले होते.

अलेक्झांडर द ग्रे ट याच्या सैन्याने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्यांनी भारतातील उसाचा उल्लेख केलेला आढळतो. त्याचे एक सेनाधिकारी नीअरकुस याने इ. स. पू. ३२७ मध्ये तयार केलेल्या अहवालात असे लिहिले होते की,‘ भारतात असा एक वेत आहे की, त्यापासून मधमाश्यांच्या मदतीशिवाय मध मिळविता येतो. या वनस्पतीला फळे येत नसली, तरी तिच्यापासून मादक पेय मिळते’. नंतर पाचशे वर्षांनी गेलेन या थोर वैद्यांनी भारत व अरबस्तान येथून आलेल्या साखरॉन या पदार्थाची जठर, आतडी व वृक्क (मूत्रपिंड) यांच्या स्वास्थ्यासाठी औषध म्हणून शिफारस केली होती. कालांतराने पर्शियन लोकही साखरेचा उपयोग करायला भारतीयांकडून शिकले. इ. स. पू. ७०० मध्ये युफ्रे टिस नदीच्या खोऱ्यातील नेस्टोरियन साधूंनी राखेचा प्रभावी उपयोग करून पांढरी शुभ्र साखर तयार केली. सातव्या ते नवव्या शतकांच्या काळात अरबांनी निकट पूर्वेतून उत्तर आफ्रिका ते स्पेनपर्यंत लढाईत विजय मिळविले. यामुळे सर्व भूम ध्य सागरी खोऱ्यांत उसाची लागवड सुरू झाली. नंतर काही शतकांनी पॅलेस्टाइनमधून युद्घातून परतलेल्या सैनिकांनी यूरोपात साखर आणली. व्हेनीस शहर हे साखरेच्या व्यापाराचे केंद्र बनले व त्याचे हे स्थान नंतर पाचशे वर्षे अबाधित राहिले.

पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज व स्पॅनिश लोकांनी ऊस अटलांटिक महासागरापलीकडे नेला. मादीरा, अझोर्स व केप व्हर्द बेटांवर उसाची लागवड प्रथम करण्यात आली. १५०६ मध्ये पेद्रोद अत्येंझा यांनी सांतो दोमिंगो सभोवती उसाची लागवड केली आणि शेवटी साखर उद्योग नवीन जगात (पश्चिम गोलार्धात) पोहोचला. कॅरिबियन बेटांवर उसाची लागवड सुरू झाल्यावर तीस वर्षांच्या आतच ऊस हे वेस्ट इंडीजमधील एक महत्त्वाचे पीक बनले आणि या बेटांना शर्करा बेटे म्हणू लागले. उत्तर यूरोपातील मागणीमुळे व विशेषतः तुर्कांनी १४५३ साली कॉन्स्टँटिनोपल ताब्यात घेतल्यावर तेथील साखरेचे महत्त्व वाढले. नंतर तुर्कांनी भूम ध्य सागरी प्रदेशांतील आपल्या साखर उत्पादनाला प्रोत्साहन देणे थांबविले. मात्र वेस्ट इंडीज येथून हा उद्योग दक्षिण अमेरिकेपर्यंत पसरला. तथापि, तेथील स्थानिक लोकांना याविषयीचे कौशल्य नसल्याने या कामासाठी त्यांनी आफ्रिकेतून गुलाम आणले. साखर उद्योग व गुलामगिरीची पद्घत यांम धील गुंतागुंत वाढत जाऊन त्यातून अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत या बेटांवर रक्तपाती उठाव झाले. येथे सुरुवातीला उसाचा रस काढण्यासाठी बैल वा घोडे व नंतर पवनचक्क्या वापरीत. उसाचा रस, लाइम (कॅल्शियम ऑक्साइड), मृत्तिका व राख यांच्या मदतीने परिष्कृत करून तो तांब्याच्या किंवा लोखंडाच्या मोठ्या पसरट पात्रांत उकळीत असत. नंतर स्फटिक वितळवून मिळणारे मिश्रण उकळून त्याचे पुन्हा स्फटिकीभवन करीत. १६५० च्या सुमारास सांतो दोमिंगो व ब्रा झील येथे देखील साखर मोठ्या प्रमाणावर तयार होत असे.

अमेरिकेत लुइझिॲना येथे उसाची लागवड प्रथम झाली. तेथे १७५१ साली सांतो दोमिंगोतील जेझुइट पंथातील लोकांनी याची सुरुवात केली. नंतर चाळीस वर्षांनी आंटोनिओ मेंडेझ व एत्येन द बोर यांनी सध्याच्या न्यू ऑर्लिन्समध्ये उसाची लागवड करून सर्वसाधारण वापराची साखर परिष्कृत करण्याचा प्रयत्न केला. यातून या सर्व वसाहतीत उसाचे मळे उभे राहिले. अमेरिकन क्रां तीविषयी भूमिका तयार होण्यामागे साखर उद्योगाचीही छोटी व साहाय्यक भूमिका होती.

प्राचीन बॅबिलोनिया, ईजिप्त व ग्री स येथे बीटचे पीक घेत असत. १७७४ मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ आंड्रिआस सिजिसमुंड यांना बीटमधील साखर उसातील साखरेसारखीच असल्याचे आढळले. १७९९ मध्ये त्यांचे शिष्य फ्रां ट्स आकार्ड यांनी बीटपासून साखर मिळविण्याची व्यावहारिक पद्घत विकसित केली. नंतर बीटपासून साखर तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात यूरोप व रशियात उभे राहिले. बीटच्या पिकाला खरे महत्त्व एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाले. युद्घांमुळे फ्रान्सला उसाच्या साखरेची टंचाई जाणवू लागली. म्हणून नेपोलियनने साखर तयार करण्यासाठी बीटच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. ल्वी व्हिल्मोरिन या फ्रेंच वनस्पतिवैज्ञानिकाने निवड पद्घतीद्वारे बीटमधील साखरेचे प्रमाण ७. ५ टक्क्यांवरून १६ ते १७ टक्क्यांपर्यंत वाढविले. यामुळे बीटपासून साखर बनविणे अधिक किफायतशीर झाले आणि यूरोपात या उद्योगाचा विस्तार झाला.

संदर्भ :

1. Chen, क्ष. C. P. Chou, C. C. Canesugar Handbook : A Manual for Canesugar Manufacturers and Their Chemists, 1993.

2. Chou, C. C. Handbook of Sugar Refining : A Manual for Design andOperation Sugar Refining Facilities, 2001.

3. Clarke, M. A. Godshall, M. A. Eds., Chemistry and Processing of Sugarbeetand Sugarcane, 1988.

4. Gaman, P. M. Sherrington, K. B. Science of Food, 1998.

5. Mathlouthi, M. Reiser, P. Eds., Sucrose : Properties and Applications, 1994.

6. Pigirolamo, M. Diet and Cancer : Makers, Prevention and Treatment, New York, 1994.

7. Volk T, et al. pH in human tumor Xenografts :Glucose. Br. J Cancer, Sept. 68, 1993.

8. Warburg, O. On theOrigin of Cancer Cells, Science, Feb. 123: 309-4,1956.

ठाकूर, अ. ना. घाडगे, सुभाष रा. वाघ, नितिन भ., मराठी विश्वकोश

Leave a Reply

Your email address will not be published.