आदित्य ठाकरे यांचे प्रसिद्धीपत्रक : हे तर गलिच्छ राजकारण..!

| मुंबई | सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दररोज वेगळीच कलाटणी मिळत आहे. थेट बिहार पोलीस महाराष्ट्रात येऊन स्वतंत्र चौकशी करणेपर्यंत हे प्रकरण तापले आहेत. त्यात मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विनाकारण भाजप कडून टार्गेट केले जात आहे. आदित्य यांचे बॉलीवूड जगताशी असलेले संबंध देखील या प्रकरणातून चर्चले जात आहेत. त्याने व्यथित होऊन आदित्य ठाकरे यांनी आज अखेर प्रसिध्द पत्रकाद्वारे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. गलिच्छ राजकारण कोणीही करू नये असा सज्जड दम त्यांनी दिला असून ठाकरे परिवार, शिवसेना, महाराष्ट्र यांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कोणतीही गोष्ट या आधी झाली नाही आणि इथून पुढेही होणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

काय आहे प्रसिध्दी पत्रक :

हे तर गलिच्छ राजकारण..!
पण मी संयम बाळगलाय!

‘कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र सरकार ‘ कोरोना चा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले हे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवूड ‘ हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये. तूर्त इतकेच !

आपला नम्र
आदित्य उद्धव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *