अरे देवा..! आता शिक्षकांना करावे लागणार हे काम, BMC चा नवा निर्णय..

| मुंबई | मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेच्या शिक्षकांनाही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी दिली आहे. महानगर पालिकेच्या इमारती, कार्यालये तसेच रुग्णालयात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरु होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रार्थना स्थळांवर समुपदेशनाची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ संपून आता कामावर हजर राहावे लागणार आहे.

आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विना मास्क फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

सध्या रोज सरासरी १२ हजार ५०० जणांवर कारवाई केली जाते ही संख्या २५ हजारापर्यंत वाढविण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी क्लिन अप मार्शलची संख्या २ हजार ४०० वरुन ४ हजार ८०० करण्याचे निर्देशही आयुक्तांनी विभाग कार्यालयांना दिले आहेत. सोबतच पोलिसांनाही दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. याचबरोबर शिक्षकांवरही आता मार्शलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

रुग्णालये, महानगर पालिका कार्यालये आणि सरकारी इमारतींमध्ये विना मास्क नागरीक फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षकांनी पालिकेच्या संकुलांमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसुल करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. ही कारवाई सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

कोविड काळातही शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली होती. यात, कोविड बाबतच्या बातम्याचे संकलन करणे, विभाग स्तरावर नियोजन करणे, अशी कामे शिक्षकांना देण्यात आली होती. कुर्ला येथील एल प्रभागाच्या हद्दीतील काही शिक्षकांनी या कामात सहभाग नोंदवला नव्हता. त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे.

प्रार्थनास्थळांच्या परीसरात मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशेषत: शिक्षीकांनाही प्रार्थनास्थळांची जबाबदारी देण्याची देण्यात येणार आहे. या शिक्षीका नागरीकांचे समुपदेशन करणार आहे. त्यामुळे आता शिक्षीकांनाही कामावर रुजू करण्यात येणार आहे. असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.