तपासणीतून धक्कादायक वास्तव आले समोर; २२४ पैकी २६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह..

| भिगवण | भिगवन मध्ये पोलीस प्रशासन, तहसीलदार आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या अचानक तपासणी मोहिमेमध्ये २२४ पैकी तब्बल २६ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.हे शेकडा सरासरी प्रमाण १२ टक्के असून ही आकडेवारी निश्चितच सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. शासनाच्या वतीने नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, कामाशिवाय घराबाहेर पडू नका. परंतु काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नाहीत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने लोक घराबाहेर पडतातच. याला लगाम घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या आदेशाने आज भिगवण मध्ये पोलिसांनी दुचाकीस्वार आणि विनाकारण परवानगीशिवाय फिरणाऱ्या चारचाकी वाहनांची ही थांबवून रॅपिड अँटिजेन टेस्ट केली.

मात्र पोलिसांच्या या अचानक केलेल्या कारवाईने अनेकांची धांदल उडाली.ज्या दुचाकीस्वारांसोबत महिला होत्या त्या तर एकदम गलीतगात्रच झालेल्या दिसून आल्या. तर पॉझिटीव्ह निघाल्याने अनेकांना पश्चाताप करण्याची वेळ आली. या मोहिमेसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यासोबतच प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह पुर्ण तयारीनिशी याप्रसंगी उपस्थित होते.तपासणीत पॉझिटिव्ह निघालेल्या सर्वांना भिगवण कोविड सेंटर येथे नेण्यात आले. काहींना ऍडमिट केले असून काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगितल्याचे समजते. या कारवाईने मात्र धक्कादायक वास्तव समोर आले असून सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होणाऱ्या अनेकांना विचार करायला लावणारी ही आकडेवारी आहे.

आज तपासणी करण्यात आलेल्या २२४ नागरिकांपैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे. हे शेकडा प्रमाण १२ टक्के इतके आहे. याचा अर्थ कोरोना पसरवणारे खरे ‘सुपर स्प्रेडर’ हे फिरणारे लोकच आहेत. म्हणून कोरोनापासून मुक्ती मिळवायची असेल तर सर्वांनी घरी राहणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारचे हे सुपर स्प्रेडर संपूर्ण समाजाचा विनाश केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आता तरी सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा आणि कोरोनाला टाळा असे प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.