दुर्दैवी घटना: जळगावात देखील पोलिसावर हल्ला..!

| जळगाव | जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे शनिवारी (९मे) रोजी संचारबंदीत हटकल्याने एका पोलिसावरच काही समाजकंटकानी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी यांच्यावर लॉक डाऊन मुळे अतिरिक्त ताण असताना त्यांच्यावर असे हल्ले होणे दुर्दैवी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील असे हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. तरीही हल्ले होत असल्याचे चित्र आहे.

या प्रकरणी वरणगाव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  वरणगाव शहरातील तपतकठोरा रस्त्यावर काही उनाड तरुणांचा घोळका बसलेला होता. संचारबंदी असल्याने या रस्त्यावर गस्तीला असणारे पोलीस कर्मचारी श्री मनोहर पाटील यांना तरुणांचा घोळका दिसल्याने त्यांनी जमाव पांगवण्यांच्या उद्देशाने तरुणांना ‘गर्दी का करता? आपापल्या घरी जा?येथे थांबू नका.’ असे सांगितल्याने काहींना या गोष्टीचा राग आला. त्यातून त्या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला लाथ मारून खाली पाडून त्यांच्याच काठीने त्यांना बेदम मारहाण केली. यात श्री पाटील यांना जबर दुखापत झाली असून डोक्याला देखील मार लागला आहे. 

या प्रकरणी सैय्यद शकील उर्फ अरबाज सय्यद, सय्यद अलीम सय्यद सलीम, सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून चौथा आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास समज देऊन सोडण्यात आले आहे. नुकताच अश्याच प्रकारे भुसावळ येथेही पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. जिल्ह्यात अश्या प्रकारे पोलिसांवर हल्ले होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल ढासळत आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *