जुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू – बाजीराव मोढवे

तो काळ होता…

पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० वर्षात कधीही जुन्या पेंशन सारख्या धगधगत्या विषयाला हात न लावण्याच्या धोरणामुळे आणि त्यातून विश्वासघात झाल्याच्या भावनेने जुन्या जाणत्या संघटनांच्या विरोधातील अविश्वाची भावना शिखरावर होती आणि त्यातुनचं युवकांच्या नव्या संघटनेची गरज आता संपुर्ण महाराष्ट्रात आहे हा विचार काही तरूणतुर्क ध्येय्यवेडे शिलेदार या महाराष्ट्राच्या मातीत रूजवत होते. वाटते तेवढा सोपा हा विचार मुळीचं नव्हता पण एकदा की तो रूजला आणि बहरला तर महाराष्ट्रात नव्हे तर देशात ह्या क्रातींची मशाल धगधगणार हा विचार सर्वांच्या मनात पेरण्याचा काम एक नगरी अवलिया सातत्याने करत होता… नाव तयाचे बाजीराव मोढवे.

बाजीराव मोढवे आणि माझी पहिली भेट ही शेगाव येथेचं; संघटन स्थापनेचा तो श्रीगणेशा होता; पण तत्पुर्वी ह्या अवलिया च्या व्यक्तिमत्वाची झलक व्हॉट्सअॅप ग्रुपवरील बेधडक संवादावरून मिळालीचं होती. संघटन आणि जुन्या पेंशनच्या लढ्याविषयीची तळमळ ही पदोपदी व प्रत्येक शब्दांमधून स्पष्टपणे दिसत होती. अगदी पहिल्याच मिटींगमध्ये सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर लॉनच्या गवतावर मी आणि जितू रहाटे निवांत बसल्यावर…अरे मी तुलाचं शोधत होतो आणि माझ्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून; “जे काही आज घडले त्याने संघटनेचा पाया भक्कम झाला बरं का आशू आणि यासाठी तू जे काही केले ते कायमचं माझ्या लक्षात राहील रे…” खरतर हे शब्द मला बाजीराव यांना म्हणायचे होते, परंतू ते खांद्यावर ठेवलेले हात आणि मारलेली घट्ट मिठी ही आयुष्यभरासाठी बांधलेली ऋणानुबंधाची गाठ होती…

…आणि मग सुरू झालेला प्रवास

अवघ्या काही महिन्यावरचं संघटनेने नागपुर हिवाळी अधिवेशनावर जुन्या पेंशनच्या मागणीसाठी मोर्चा काढायचे ठरविले होते आणि त्याच्या नियोजन-आयोजनाची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपलेली होती. यावेळी ना संघटनेचे रजिस्ट्रेशन आणि ना ही काही पूर्वानुभव…या नियोजनासाठी त्यावेळी दर दिवसाआड धीर देणारे आणि कल्पना सुचविण्यांमध्ये वितेशभाऊ, गोविंदसर यांच्यासोबत चं एक विचार म्हणून भक्कमपणे पाठीशी असणारे नाव होते ते बाजीराव मोढेवे…

“हा आक्रोश मोर्चा जुन्या पेंशनच्या लढ्याची व एकंदरीत आपल्या ह्या नवख्या संघटनची दशा व दिशा ठरविणारा राहील…. आणि त्या दृष्टीने जे जे शक्य आहे ते सर्व आपल्याला करायचं आहे… बरं का आशू…तू घाबरू नको तुझ्यासोबत मी कायम आहे…वितेश आहे; गोविंद आहे…तू फक्त बिनधास्त तयारी कर…”

हे फक्त मलाचं नाही तर कधी धडपडणार्या, कधी निराश झालेल्या तर कधी खांदे खचलेल्या विचारांना पुन्हा बळकटी देणारे विचार आजही तेवढेचं तेजस्वी आहे, तेवढेचं स्फूर्तीदायक आहे आणि याचा अनुभव राज्यातील अनेकांनी घेतलेला आहे हे मात्र तेवढेचं शाश्वत सत्य..

आक्रोश मोर्चानंतर प्रत्येक आंदोलन, चळवळीची दिशा.यासाठी अगदी शुन्यातून सुरूवात करून यशापर्यंतचा मार्ग त्यानंतर ठरविला जाऊ लागला त्याचा केंद्रबिंदू बाजीराव मोढवेचं असायचे. संघटनेला बोट लावण्याचे अनेक प्रयत्न त्या वेळी स्वकियांसोबत अनेकांकडून झाले. त्यावेळी संघटनेवर उठलेले बोट त्याच्याच डोळ्यात कसे टाकायचे हे बाजीराव शिवाय दुसरे कुणी चांगल्याप्रकारे करूचं शकत नाही आणि हे वेळोवेळी करून राज्यनेतृत्वाला व पर्यायाने संघटनेला भक्कम आधार अगदी पडद्यामागे राहून देण्याचे काम या धोरोद्दताने तेव्हाही केले आणि आजही करतचं आहे. नकळत अगदी निष्पापपणे..

चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार पर संदेह नही करते…
कभी भी मात दे सकती है..

टीम नगर आणि बाजीराव

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आणि त्या जिल्हाचा संस्थापक अध्यक्ष होऊन हे संघटन प्रत्येक तालुक्यात अगदी तळागाळात; प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम किती अवघड किती कठीण. परंतु असं म्हणतात न की अवघड व कठीण काम करण्यासाठीचं परमेश्वर काही विशेष व्यक्तींची निवड करतो.. नगर जिल्हात हे संघटन किती खोल रूजलेले आहे याचा प्रत्यय मला एका कौटुंबिक समारंभ आटोपून पुणे ते नागपुर असा परतीचा प्रवास करत असताना आला. नगर जिल्हात ज्या ज्या तालुक्याच्या ठिकाणाहून प्रवास झाला त्या त्या ठिकाणी माझे माझ्या कुटुंबासह स्वागत झाले.. जे येऊ शकले नाही त्यांचे आवर्जून फोन आणि साईंच्या शिर्डीत दस्तुरखुद्द बाजीराव हजर…

या सगळ्याची खरचं काही गरज नव्हती महाराज असे जेव्हा मी म्हटले तेव्हा पुन्हा त्याचं शैलीत…

“अरे आशू आपण जे काही आज करत आहे त्यापासून आपला परिवार, आई वडील अनभिज्ञ असतात. परंतू त्यांचा मुलगा, कुणाचा भाऊ तर कुणाचा पती काय काम करतोय हे त्यांना कधी कळेल… ते कळू तर दे…?” डोळ्यातील पाण्याशिवाय माझ्याजवळ काहीचं बोलण्यासाठी शिल्लक नव्हते. त्यादिवशी सस्नेह दिलेली साईंची फ्रेम व साईंचा आशीर्वाद आजही पाठीशी आहे.

सर्वकाही माझ्याचं हातात रहावे अशी अनेकांची मानसिकता असताना तेव्हा नगर जिल्हातील अनेक नगरी हिऱ्यांची ओळख राज्याला बाजीराव यांनी करून दिली आणि अगदी गरज नसताना पदावरून बाजुला होऊन दुसऱ्याकडे पदाची जबाबदारी सुद्धा दिली… “आज फडकणाऱ्या भगव्या ‘स्वराज्य’ याचा पाया तेव्हाचं नकळतपणे, निस्वार्थपणे ह्या माणसाने घालून दिला होता… हे ही तेवढेचं सत्य.”

हिरव्यागार वनामागे उभा ठाकलेला धीरोदत्त सह्याद्री..

कोणतीही संघटना असो वा चळवळ त्यात एकवाक्यता आणि नेतृत्वावरील निष्ठा अत्यंत महत्वाची असते… आजच्या काळात जन्म दिलेल्या बापाला नाव ठेवणारी आणि तू काय केलं म्हणणारी कारट्यांची संख्या अनंत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन नवखेचं… यात फुट पाडण्याचे, ही संघटना लयास जावी यासाठी मुद्दामहून आणि उद्दामपणे घोडे पळविणारे अनेक आलेत. परंतु आपल्या शब्दशैलीने आणि धीरगंभीर विचारांच्या ठेवणीने नेतृत्वावर विश्वास आणि त्याला भक्कम आधार देऊन हे घोडे उधळून लावण्याचे काम अनेकदा बाजीराव यांच्याकडून झाले. संघटनेच्या कोणत्याही शिलेदाराला राज्यात कुणी काहीही बोलले तर अंगावर त्याला घेणारा कोण तर हाच… बाजीराव..

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन ला मिळालेलं नेतृत्व हे विदर्भातील.. अगदी राज्याच्या शेवटल्या टोकावरील गर्द जंगलातील… पण ह्या गर्द जंगलाला भक्कम आधार देणाचे काम ह्या नगरी सह्याद्रीने नेहमी केेले…

“उद्देश आणि ध्येय एकचं जुनी पेंशन..”

५ वर्षे लोटल्यानंतरही संघटन आणि जुन्या पेंशनच्या लढ्याला बाजीराव मोढवे यांच्या विचाराची किती गरज आहे हे सर्व जाणून आहे.

लढा अत्यंत कठीण व निर्णायक मार्गावरून प्रवास करत असताना बाजीराव हा विचार अत्यंत महत्वाचा आहे… स्वकीयांचा उत्कर्ष हा विचार जेवढा महत्वाचा तेवढाचं महत्वाचा असतो स्वकीयांवर केलेला विश्वास…

समजा हा विश्वास जर कोसळला तर पुन्हा नव्याने कोणी उभे होण्यासाठी तयार होणार नाही…

म्हणून….

हा विचार असाच कायम राहो..!
हा विश्वास असाच अबाधीत राहो..!!
हा शब्दसम्राट असाच बहरत राहो..!!!

आपल्या ह्या जन्मदिनी मोढवे ह्या विचारास एका प्रामाणिक कार्यकर्त्यांकडून व मित्राकडून शब्दरूपी सस्नेह भेट….

एवढचं मागणं…

राह के पत्थर से बढ़ कर कुछ नहीं हैं मंज़िलें ,
रास्ते आवाज़ देते हैं सफ़र जारी रखो !

– आशुतोष चौधरी, विभागप्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *