लोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..!

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. पादुका पंढरपूरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी असेल अशी ग्वाही पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातून तब्बल १० लाख भाविक पाय चालत पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जिवनातला हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. याच आपल्या समृध्द वारी आणि सध्याच्या परिस्थितीबाबत ह.भ. प. गणेश महाराज भगत यांच्याशी साधलेला लोकशक्ती संवाद:

सचिन घोडे(मुलाखतकार) : जय हरी..! रामराम 🙏🏻 दैनिक लोकशक्ती च्या लोक संवाद कार्यक्रमात आपले स्वागत आहे गणेश महाराज भगत..!

गणेश महाराज भगत : जय हरी माऊली..! रामराम..! आभारी आहे..!

सचिन घोडे : महाराज सद्य परिस्थितीत संबंध जगात कल्लोळ माजला आहे, एका विषाणू ने एवढे मोठे संकट आपल्या मानवजातीवर आणले आहे..! अश्या काळात आपल्या सारख्या आध्यात्मिक गुरूंकडूनच समाजाला मानसिक स्वास्थ आणि दिशा मिळत असते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला नमन..!

गणेश महाराज भगत : धन्यवाद , समाजाचे प्रबोधन करणे नि योग्य दिशा देणे हेच तर धर्माचे सार आहे.

सचिन घोडे : महाराज, आपल्या पवित्र आणि सगळ्या जगाला वंद्य असणारी वारी नक्की कधीपासून सुरू आहे.? वारीची परंपरा केव्हा पासून आहे?

गणेश महाराज भगत : पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंद विश्व आहे. अध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांशी जोडून ज्ञान, भक्ती, प्रेम यांचा एकत्रित प्रवाह वारीच्या माध्यमातून चैतन्याचा प्रसादिक स्त्रोत असलेल्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत अनादिकालापासून नित्य निरंतर प्रवाहित आहे. अगदी पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर उभे केले तेव्हापासून म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या ही अगोदर वारीची ही परंपरा असल्याचे सिद्ध झाले आहे. वारी ही वारकऱ्यांची सामुहिक उपासना पद्धती आहे. ” माझे जिवीची आवडी ! पंढरपुरा नेईन गुढी!!” असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही सर्व वारकऱ्यांची हृद्य भावना आहे. वारीला पालखी सोहळ्याचे स्वरूप देण्याचे विलक्षण कार्य संत तुकोबारायांचे ज्येष्ठ चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी केले आहे. त्यांनाच पालखी सोहळ्याचे जनक मानले जाते. पुढे १८३२ सालि हैबत बाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा हा वेगळा सुरू केला. देहू व आळंदी हे दोन मोठे प्रवाह आणि त्याचबरोबर सासवड वरून सोपान काका, तापी काठावरून मुक्ताबाई, त्रंबक वरून निवृत्तीनाथ महाराज, पैठणहून एकनाथ महाराज, आणि इतर सर्वच संतांच्या स्थळावरून पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी वारीतून लाखो भाविक प्रतिवर्षी दाखल होतात. अशीही पिढ्यान पिढ्याची प्रवाही परंपरा महाराष्ट्रासह कर्नाटक ,आंध्र प्रांतातही घरोघरी निष्ठेने जपली आहे.

सचिन घोडे : गणेश महाराज, यापूर्वी ही दिव्य परंपरा कधी खंडित झाली आहे का? जशी या वर्षी ती काही अंशी होणार आहे.

गणेश महाराज भगत:- नाही, यापूर्वी वारी खंडित झाली असा प्रसंग उद्भवला नव्हता. मुळात किती ही ऊन वारा पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही वारी ही अखंड अव्याहत चालूच राहिली आहे. १८९२ मध्ये प्लेगच्या साथीमुळे वारीवर निर्बंध लादले होते परंतु वारकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घेऊन त्या वारीची परंपरा चालू ठेवली होती. मात्र त्या आजाराचे स्वरूप वेगळे होते.. “पंढरीचा वारकरी! वारी चुकू नेदी हरी !!”तुकाराम महाराज देवाच्या चरणी हीच प्रार्थना करतात. परंतु सद्यस्थितीमध्ये कोरोना हा समुदायाने पसरणारा आजार आहे, हे लक्षात घेता वर्षभरात पंढरीच्या ज्या मुख्य चार वाऱ्या असतात त्यापैकी यंदाची चैती वारी ही वारकऱ्यांनी सामंजस्य आणि नैतिकतेचे भान ठेवून अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपन्न केली.

सचिन घोडे : महाराज आपण पायी वारिलाच एवढे महत्त्व का देतो..?

गणेश महाराज भगत -अध्यात्मिक प्रभू प्रबोधनाचा एक आविष्कार म्हणून वारीचे स्थान भक्ती संप्रदायात आणि लोकजीवनात महत्वपूर्ण आहे. पायी वारीच्या माध्यमातून कायिक मानसिक आणि वाचक असे तीनही तक सलग वीस ते पंचवीस दिवस घडत असते. देहभान विसरून सर्वसंग परित्याग करून वारकरी भक्ती प्रेम कल्लोळाने नाचत गात वाट चालत असतात. “नाम घेता वाटचाली ! यज्ञ पाऊला पाऊली!!” अशी वारकऱ्यांची धारणा आहे. परमात्म्याच्या ठाई असलेल्या अंतर्मनाचे प्रेमळ दर्शन प्रत्येक वारकऱ्यात घडते. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद तर आहेच पण त्याहीपेक्षा कैकपट जास्त आनंद हा वारकऱ्यांना वारीमध्ये त्याच्या नाम चिंतनात वाटतो हा माझ्यासहित असंख्य वारकऱ्यांचा अनुभव आहे. अशी साधना आवर्जून कितीही प्रयत्न केला तरी घडणे अशक्य आहे म्हणून पायी वारी ला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सचिन घोडे : महाराज या वर्षी वरी होणारं नाही परंतु तरीही तुम्हाला वर्षी वारी व्हावी वाटते का?

गणेश महाराज भगत – वारी ही निखळ आनंदाची अनुभूती आहे. पंढरीची वारी ही परमात्मा प्रेमाची वारंवार अनुभव घेण्याची रीत आहे. वारीत भक्ती ही वैयक्तिक स्वरूपात न राहता ते सामूहिक स्वरूपात आविष्कृत होते.आम्ही भजनात, कीर्तनात इतके रंगून जातो नाचत गात गिरक्या घेत पावली खेळत सभोवतालच्या विश्वात स्वतःलाही विसरून जातो. ब्रम्ह आनंदाच्या या खेळात आत्म प्रचिती ची ऊडी पडते.. मना सहित कायाही पालटते जीवनाचा रंग अंतर्बाह्य बदलून जातो. असा हा आनंद सोहळा कधी येईल अशी अर्त उत्कंठा प्रतिवर्षी लागून राहते. ‌परंतु भक्ती आणि नीती यांचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आजची परिस्थिती मानवी जीवनातील नैतिक तेलाच आव्हान करत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोणाच्या या जागतिक महामारी च्या संकटाचा विचार करता कोणीही खरा वारकरी आपला हा अट्टाहास मिरवताना दिसत नाही.प्रेम भावाचा संत खेळ वारी शिवाय अनुभवता येणार नाही हे जरी अंतिम सत्य असले तरी व्यवहार नीतीच्या दृष्टीने पाहता सामाजिक जाणिवा या भूमिकेतून सामाजिक तत्त्वांचे सद्विचार दर्शन वारकयांकडून निश्चित घडेल .

सचिन घोडे : या संकटा संबंधाने काय उपाय योजना सुचवाल?

गणेश महाराज भगत : सरकार व प्रशासन या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशावेळी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी व शासन यांच्यामध्ये वारंवार सकारात्मक चर्चा घडत आहेत. लोक हिताचा विचार करून परंपरा म्हणून अबाधित राखत प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्याच वारकऱ्यांच्या समवेत, सर्व काळजी घेत ,हा सोहळा व्हावा असे मला वाटते. संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या जीवनातही वारी खंडित झाल्याचा प्रसंग त्यांच्या पत्रिकेच्या अभंगातून लक्षात येतो. आपणही त्याचाच विचार करत ठायीच बैसोनी करा एक चित्त! आवडी आनंत आळवावा!! या उपदेशाप्रमाणे मानस वारी करावी.

सचिन घोडे : महाराज..! धन्यवाद..! आपण अतिशय सहज आकलन होईल अश्या रीतीने वारीची तेजस्वी परंपरा आणि सद्यस्थिती यांची सांगड घातली. अगदी ओघवत्या ओव्या देखील आपण सुंदर गुंफल्या..!
आपण मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा आभार..!

गणेश महाराज भगत : जय हरी..!🙏🏻 धन्य वाद

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *