माझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…

क्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम निवडतो. कधी ती वर्ल्ड टीम असते तर कधी इंडियन टीम असते. प्रत्येक खेळाडूच्या वैशिष्ट्यांचा विचार करून तो आपली टीम निवडत असतो. अर्थात त्याच्या मताशी सारेच सहमत असतील असं नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. निवड सुद्धा वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येकाची टीम वेगळी वेगळी असू शकते.

राजकारणात मात्र अशा प्रकारचं ड्रीम गव्हर्नमेंट निवडण्याची पद्धत नाही. निदान माझ्यातरी वाचण्यात कुठं आलं नाही. आताच हा विषय मनात येण्याचं कारण असं की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय सरकार आजवरच्या सरकारमधील सर्वात टाकावू सरकार आहे, हे आता कुणाही शहाण्या माणसाला वेगळं सांगण्याची गरज उरली नाही. सर्वच आघाड्यांवर नीचतम पातळी गाठण्याचा पराक्रम भारताच्या इतिहासात या सरकारच्या नावानं लिहिला जाईल. इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणी पेक्षा सद्याची परिस्थिती भयंकर आहे. एखाद्या टोळीच्या हातात देश असावा, अशी अवस्था आहे.

नरसंहार हा शब्द सुद्धा फिका वाटावा अशी या सरकारची कोरोना बाबतची एकूणच भूमिका आहे. उत्तरप्रदेश, बिहार या भाजपा शासित प्रदेशातून गंगेच्या पाण्यावर तरंगणारी प्रेतं हा मानवतेच्या इतिहासातील काळा कुट्ट डाग आहे. आणि तो खुद्द मोदी आणि स्वतःला योगी म्हणवून घेणाऱ्या आदित्य बिष्ट या त्यांच्याच मुख्यमंत्र्याच्या माथ्यावर पर्मनंट कोरला गेला आहे.

एखाद्या देशाचा पंतप्रधान धडधडीत आणि तेही वारंवार खोटं बोलण्याचा विक्रम देखील मोदी यांच्याच नावावर नोंदविला जाईल. शेतकरी आंदोलनाला सहा महिने होऊन गेलेत. ‘समाधान सिर्फ एक फोन कॉल की दुरीपर है’ असा डायलॉग मारणारा पंतप्रधान त्याच शेतकऱ्यांच्या मार्गात काटेरी कुंपण उभे करतो, ही कल्पनाही भयंकर आहे ! पण भाजपा सरकारनं ते निर्लज्जपणे करून दाखवलं आहे. या अमानवी कृतीचा विरोध करण्याचा मर्दपणा शिल्लक असणारा एकही नेता भाजपा मध्ये आता शिल्लक राहिलेला नाही.

मात्र यांची सारी बदमाशी आता जनतेच्या लक्षात यायला लागली आहेत. मतदारांना आपली चूक कळून आली. लोक आता भाजपचे मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना गावातून हाकलून लावत आहेत. एका आमदाराचे तर पूर्ण नागडा होईपर्यंत कपडे फाडले गेले. लोक यांच्या गाड्यांचा पाठलाग करत आहेत. मुख्यमंत्र्याना सभा न घेता पळून जावे लागत आहे. जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. पण मोदी कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नाही. सारा देश उध्वस्त झाला आहे. मोदी, शहा यांच्या एकूणच आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी देशात सुरू आहेत. खरं तर त्यांच्यात अंतर्गत झगडे देखील सुरू झाले आहेत. आदित्यनाथ यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. हेच चित्र देशात सर्वत्र दिसायला लागेल. अशावेळी देश वाचवायचा असेल तर मोदी यांचं विकृत सरकार राष्ट्रपतींनी बरखास्त करावं आणि सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेवून, सर्वांचा सहभाग राहील असं राष्ट्रीय सरकार स्थापन करावं, असा विचार मी नुकताच मांडला होता.

अर्थात सद्याचे आपले राष्ट्रपती तसे काही खंबीर विचाराचे असावेत, असा अपघातानं देखील पुरावा आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच मग विरोधी पक्ष, देशातील मान्यवर नेते, यांच्यापैकी कुणातरी मांडणी केली, जुळवाजुळव केली आणि राष्ट्रपतींना विश्वासात घेतलं, तर राष्ट्रपती एखादवेळ विचार करू शकतात. पण तशी ती गोष्ट एवढी सोपी नाही, हेही आपण लक्षात घायला हवं.

पण तरीही समजा असा पुढाकार घ्यायचा झाला, विविध पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणून मोट बांधण्याचं ठरलं, तरी हे शिवधनुष्य पेलायचं कुणी ? आणि अशा सरकारचं नेतृत्व करायचं कुणी ? हा महत्त्वाचा प्रश्न होता. आणि अशी गुंतागुंतीची परिस्थिती शरद पवार हे अधिक चांगल्या तऱ्हेने हाताळू शकतात, असं मला वाटते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात हे सरकार असावं, असा विचार मी मांडला. त्याला खूप लोकांनी प्रतिसाद दिला. अनेकांनी शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नही उभे केलेत. मात्र सुमारे ८० टक्के लोकांनी ती कल्पना उचलून धरली.

एकवेळ अशी होती की केजरीवाल मोदींना पर्याय होऊ शकतात, अशी हवा निर्माण झाली होती. आता ममता बॅनर्जी यांच्याकडे लोक त्या दृष्टीनं पाहतात. २०१९ च्या निवडणुकीत मायावती ह्यांनी आपलं घोडं पुढं दामटायला सुरुवात केली होती. आणि त्याचा परिणाम विरोधी पक्षांच्या एकिकरणाच्या भावनेला तडा जाण्यात झाला. चंद्रा बाबू नायडू तर काहीवर्षापूर्वी भावी पंतप्रधान म्हणून टॉपला होते. पण गम्मत अशी की त्याच वेळी त्यांची प्रदेशातली देखील सत्ता राहिली नव्हती. पण एकत्र येवून काही करायचे असेल, तर उपलब्ध परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.

ह्या साऱ्या नेत्यांच्या आपल्या आपल्या महत्त्वाकांक्षा आहेत. आपले आपले स्वभाव आहेत. काहींचे स्वभाव तर अत्यंत तुसडे आणि उर्मट आहेत. हेकेखोर आहेत. असं असलं तरी लोक त्यांना निवडूनही देतात, हेही खरं आहे. अर्थात मोदी किंवा शहा यांचे पराक्रम लक्षात घेता, इतर साऱ्या नेत्यांचे दोष एकत्र केलेत, तरीही मोदींच्या समोर अगदी किरकोळ वाटावेत असेच आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या गुणदोषांचा आणि सद्या स्थितीचा विचार करता, काहीही झालं तरी मोदी यांच्या जबड्यातून देशाला बाहेर काढणं, ही पहिली गरज आहे, असं मला वाटते. त्यासाठीच सर्वपक्षीय राष्ट्रीय सरकार स्थापन करून पुढील निवडणुका घेणं, हाच एक मार्ग निघू शकतो.

समजा, अशी वेळ आलीच तर नवं सरकार कसं असावं ? किंवा समजा, मला माझ्या मनासारखं सरकार बनविण्याची वेळ आली, तर..? माझ्या मनातलं राष्ट्रीय सरकार कसं असेल..?

माझ्या मनातील राष्ट्रीय सरकारची ही पहिली यादी आणि खातेवाटप पुढीप्रमाणे असेल..

• मनमोहन सिंग – प्रधानमंत्री
• ममता बॅनर्जी – गृहमंत्री
• शरद पवार – संरक्षण
• रघुराम राजन – अर्थ
• राहुल गांधी – उद्योग
• लालू प्रसाद यादव – रेल्वे
• राजनाथसिंह – वाणिज्य
• नितीन गडकरी – रस्ते आणि वाहतूक
• राकेश टिकैत – कृषी
• अरविंद केजरीवाल – शिक्षण
• चंद्राबाबू नायडू – टेक्नॉलॉजी
• सीताराम येचुरी – कामगार
• डॉ. संग्राम पाटील – आरोग्य
• ऍड बाळासाहेब आंबेडकर – समाजकल्याण
• चंद्रशेखर राव – जहाज, जलवाहतूक
• जगनमोहन रेड्डी – जल संसाधन
• अखिलेश यादव – नागरी उड्डयन
• मायावती – आदिवासी विकास
• रविष कुमार – ब्रॉडकास्ट
• डॉ कन्हैय्या कुमार – युथ अफेयर्स
• महुआ मोइत्रा – महिला व बालकल्याण
• योगेंद्र यादव – ग्रामीण विकास आणि पंचायत राज
• संजय राऊत – संसदीय
कामकाज

समजा पहिल्या यादीला राष्ट्रपतींनी मान्यता दिलीच तर दुसरी यादी जाहीर करता येईल !

म्हटलं तर ही गंमत आहे. म्हटलं तर एक विचार आहे ! पण निदान यावर चर्चा करायला काय हरकत आहे ?

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *