राजकारणातील आश्वासक तरुण तुर्क – मा. आ. राहूलदादा जगताप

राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो नेहमीच लोकांच्या गळ्यातील ताईत बनून राहतो, हे राज्यातील अनेक नेत्यांच्या राजकीय प्रवास पाहिला तर लक्षात येईल.

श्रीगोंदे तालुक्याचे माजी आमदार राहूल जगताप यांनीही जमिनीवर पाय ठेऊन, अंगी विनम्रता जोपासत राजकारणाचा श्रीगणेशा केला अन् कुणाच्या स्वप्नात नसताना आमदारकी मिळवली. निवडणुकीत जरी ते थांबले असले तरी पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावे लागते, ही बाब लक्षात घेऊन त्यांचे राजकारण सुरू आहे. त्यांची कार्यपद्धती पाहता भविष्य उज्ज्वल असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

राजकीय दबदबा निर्माण केलेल्या कै. कुंडलिकराव जगताप यांनी मुलगा राहुल जगताप यांना राजकारणाचे धडे देत मुत्सद्दी बनविले. सुरुवातीला जिल्हा परिषद, त्या अगोदर कुकडी कारखान्याचे अध्यक्ष पदाच्या जबाबदाऱ्या अंगिकारत राहुल जगताप यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजकारणात नवखे असणाऱ्या राहुल जगताप यांनी बाजी मारली अन् तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. जगताप यांच्या उदयाने तालुक्यात तिसरी शक्ती उभा राहिली. जगताप यांनी ही तिसरी शक्ती पाच वर्षात भक्कम केली. जगताप यांनी कमी कालावधीत तालुक्यात निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्या उद्याच्या राजकीय वाटचालीची ती एक नांदी आहे.

कमी वयात आमदारकी मिळविलेले आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सगळी सत्ता प्राप्त झाली असताना त्याचा कधी उन्माद करायचा नाही ही तात्यांची शिकवण त्यांनी व्रत म्हणून स्वीकारली आहे. तरुण वर्गात त्यांची क्रेझ आहेच, त्याचबरोबर वयोवृद्ध माणसासोबत गप्पा मारणं, त्यांची ख्याली खुशाली जाणणं हा त्यांचा गुण हेवा करायला लावणारा आहे. कार्यकर्त्यांच्या, सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेताना ते त्यांचे होऊन जातात.

मला एक प्रसंग आठवतोय, तात्यांच्या निधनानंतर त्यांना शेजारच्या तालुक्यातून काही नवोदित राजकीय मंडळी आली होती. मी त्यांच्यासोबत होतो, त्यातील एक तरुण नेता हा राहुल जगताप आणि आपली जास्त ओळख नाही, हवेत राहणारा आमदार वाटतो, अशी चर्चा होती. दादांना भेटताच दादांनी त्या तरुण नेत्याला नावानिशी हाक मारत आपली कधी व कुठे भेट झाली याचा संदर्भ देत साधकबाधक चर्चा केली. दादांनी आपल्याला नुसतं ओळखलंच नाही तर कुठल्या प्रसंगादरम्यान भेट झाली होती, याची ओळख दिल्याने तो तरुण नेता आपण समजत होतो, तसे राहुल जगताप नाहीत याची जाणीव झाली.

आमदार झाल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली पण त्यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर देत राज्यात विरोधी सरकार असतानाही मतदारसंघात उपलब्ध करून दिलेल्या निधीचा लेखाजोखा मांडला. पाच वर्षांच्या आमदारकीत काही प्रश्न मार्गी लागले. आणखी बरेच प्रश्न बाकी आहेत. ते मार्गी लावण्यासाठी आजही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सहकार साखर कारखानदारी आज खूप जिकिरीची बाब बनली आहे. दिग्गज मंडळींनी उभे केलेले कारखाने गळून पडत गेल्याची अनेक उदाहरणे राज्यात आहेत. तात्यांनी कुकडी कारखान्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. कारखाना चांगला चालविला. तोच किता राहुल जगताप गिरवत आहेत. २०१९ ला पुन्हा संधी असताना राहुल जगताप यांनी घेतलेली माघार अनेकांना धक्कादायक वाटली, पण आमदारकीच्या काळात कुकडीकडे जास्त लक्ष देता आले नाही, ही बाब लक्षात घेऊन राहुल जगताप यांनी कुकडी कारखाना ही शेतकऱ्याची कामधेनू आहे, ती व्यवस्थित चालली पाहिजे ही भूमिका ठेऊन जगताप यांनी माघार घेतल्याचे बोलले जाते. सहकारी संस्थेची एकदा का घडी विस्कटली की ती पुन्हा बसविणे अवघड असते, ही गोष्ट त्यांच्या जमेला असल्यानेच त्यांनी उद्यासाठी एक पाऊल मागे घेतले. राजकारण म्हटले की, विरोध, टीका, आरोप आलेच राहुल जगताप हेही अनेकदा टीकेचे धनी झाले पण कमी वयात राहुल जगताप यांनी नकारात्मक गोष्टींना कसे सामोरे जायचे हा गुण आत्मसात करत राजकीय प्रगल्भता विकसित केली.

मतदारसंघात काम करत असताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.जयंत पाटील यांच्याशी संपर्कात राहून तालुक्याच्या विकासाचे प्रश्न कसे मार्गी लागतील ही त्यांची प्रामाणिक भूमिका वरिष्ठ नेत्यांनाही भावना. आमदारकी नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर, किंवा काम करताना ही सल कधी जाणवत नाही. त्यांच्या आजच्या कार्यशैली पाहता उद्याचा भविष्यकाळ उज्वल आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

– अमोल गव्हाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *