एका झाशीच्या राणीची गोष्ट…

“मी माझी झाशी देणार नाही” असं सांगत १८५७ च्या ब्रिटिशांच्या विरुद्धच्या उठावात लढा देणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक रणशिंग फुंकले होते. त्यांच्या ह्या पराक्रमाने, शौर्याने भारताच्या त्या काळात अनेक स्त्रियांना प्रभावित केले होते. चूल आणि मूल ह्यात अडकलेली भारतीय स्त्री वेळप्रसंगी तलवार उचलू शकते आणि लढाईच मैदान गाजवू शकते हा विश्वास त्यांनी त्या काळी भारतीय स्त्रियांना दिला होता. ब्रिटिशांना जर भारतातून हकलवून लावायचे असेल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय पर्याय नाही हे नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना पक्के ठाऊक होते. भारतीय स्त्रियांचा पराक्रम, ताकद आणि लढा देण्याची वृत्ती ह्यांचा वापर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होऊ शकतो हे नेताजींनी आधीच ओळखले होते. त्यासाठीच त्यांनी आझाद हिंद सेनेत संपूर्ण स्त्री सैनिकांची एक ब्रिगेड तयार केली होती आणि त्याला नाव दिलं होतं ‘झाशी च्या राण्या (रणरागिणी)”

नेताजी आझाद हिंद सेनेसाठी पैसे आणि लोकांची जमवाजमव करत होते. त्यांच्या भाषणांनी अनेक तरुण लोकांना स्वातंत्र्याच्या ह्या लढाईत आपलं योगदान देण्यासाठी प्रेरित केलं होतं. जुलै १९४३ चा काळ होता. नेताजी सिंगापूर इकडे भाषण देण्यासाठी आले होते. सिंगापूर इकडे जवळपास ५०,००० ते ६०,००० भारतीय लोक नेताजींचे भाषण ऐकण्यासाठी जमा झाले होते. त्यांच्या त्या शब्दांनी सर्वच भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची इच्छा झाली. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी एक १७ वर्षाची मुलगी आली होती. सिंगापूर मधल्या मध्यम वर्गीय सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या त्या मुलीला बंड करायचं होतं. पारंपारीक पद्धतीने जमलेलं लग्न कोणत्यातरी अनोळखी माणसाशी करून संसाराचा गाडा हाकायची तिची इच्छा अजिबात नव्हती. सुभाष बाबुंचे शब्द तिच्या त्या कोवळ्या मनावर कोरले गेले होते. आता तिचं एकच लक्ष्य होतं ते म्हणजे ब्रिटिश सत्तेचा नायनाट आणि भारताचं स्वातंत्र्य.

तिने मागचा पुढचा विचार न करता पहिलं पाऊल उचललं. आपल्याजवळचे सगळे किमती दागिने आणि पैसे तिने आझाद हिंद सेनेला मदत म्हणून दान केलं. आपला पुढला निर्णय तिने जाहीर केला तो म्हणजे आझाद हिंद सेनेत भरती होण्याचा. आझाद हिंद सेनेत संपूर्ण स्त्री रेजिमेंट चा भाग होण्याचा तिचा निर्णय एका सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबासाठी धक्कादायक होता. पण ती मुलगी घरच्यांच्या दबावाला दबली नाही. आपल्या कुटुंबाला आपला निर्णय स्विकारण्याशिवाय तिने पर्याय ठेवला नाही. २२ ऑकटोबर १९४३ ला ह्या मुलीने आझाद हिंद सेनेच्या झाशीच्या राण्या ह्या रेजिमेंटच्या स्थापनेसोबत प्रवेश केला.

एका सुखवस्तू घरातून आलेल्या त्या मुलीला सैनिकी आयुष्य काय असते? हे माहित नव्हतं. देशासाठी सैनिक बनून स्वातंत्र्य लढ्यात तर उडी घेतली पण त्यासाठी लागणारी शरीराची कसरत, ते वातावरण, तो सराव सगळचं तिच्यासाठी नवीन होतं. रोज सकाळी लवकर उठून खडतर ट्रेनिंग, मार्चिंग, बंदुकीचा सराव हे सगळं कुठेतरी तिला मानवत नव्हतं पण मनात लक्ष्य एकच तो तिरंगा भारताच्या भूमीवर फडकवायचा होता आणि त्यापुढे हे सगळे कष्ट काहीच नव्हते. आपण ज्या रस्त्यावर निघालो आहोत तिकडून कदाचित आपण जिवंत परत येणार नाही ह्याची कल्पना असताना सुद्धा फक्त आणि फक्त भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या १७ व्या उडी घेणारी ती झाशीची राणी म्हणजे ‘जानकी थेवर’.

जानकी थेवर ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने आझाद हिंद सेनेत लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारली होती. एप्रिल १९४४ मध्ये लेफ्टनंट जानकी थेवर ह्यांची नियुक्ती बर्मा (म्यानमार ) च्या झाशी राणी ब्रिगेड च्या कमांडरपदी झाली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एका स्त्री आर्मी चं नेतृत्व जानकी थेवर ह्यांच्याकडे आलं होतं. एक स्त्री सैनिकी नेतृत्व समर्थपणे करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. आझाद हिंद सेनेत नवीन स्त्रियांना भरती करण्यासाठी एका मलेशियन वृत्तपत्रात लिहिलं होतं,

We may be the softer and fairer sex but surely I protest against the word ‘weaker’. All sorts of epithets have been given to us by man to guard his own selfish interests. It is time we shattered these chains of men along with the chain of Indian slavery.”

आपल्या धारधार शब्दांनी त्यांनी त्याकाळी कित्येक स्त्री सैनिकांना प्रभावित केलं होतं. युद्धात आझाद हिंद सेनेची पिछेहाट होतं असताना पण ह्या रेजिमेंट ची एकही स्त्री सैनिक आपल्या रेजिमेंट मधून पळून गेली नाही. इतकं जबरदस्त समर्पण ह्या सर्वच स्त्रियांच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होतं. ब्रिटिश सैनिकांनी रंगून (यंगून, म्यानमार ) इथल्या रेड क्रॉस हॉस्पिटलवर बॉम्ब हल्ला केल्यावर जखमी सैनिकांना त्यातून वाचवण्यात तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या सोबत प्रत्येक सैनिकाला जंगलातून, दरी- खोऱ्यातून घरी पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आझाद हिंद सेना युद्धात हरल्यानंतर त्यांनी इंडियन मेडिकल मिशन च्या माध्यमातून मलेशिया इकडे भारतीयांसाठी काम सुरु केलं. आझाद हिंद सेना संपली असली तरी त्यांचा बाणा कायम होता. स्त्रियांसाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमधून आपलं योगदान त्यांनी दिलं. त्यांच्या भरीव योगदानाची दखल मलेशिया सारख्या मुस्लिम राष्ट्राने घेताना त्यांना मलेशिया च्या अप्पर हाऊस मध्ये सांसद म्हणून निवडून दिलं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला. भारत सरकारने उशिरा का होईना २००० साली त्यांना भारताच्या पद्मश्री सन्मानाने सन्मानित केलं. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या अनिवासी भारतीय महिला होत्या. ९ मे २०१४ ला ह्या झाशीच्या राणीने शेवटचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पुरुषी वर्चस्वा विरुद्ध बंड करत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं योगदान जानकी थेवर ह्यांनी दिलं.स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे सांगताना एका स्री रेजिमेंट ची धुरा वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी समर्थपणे सांभाळली. आपला जाज्वल्य देशाभिमान, आपला बाणा, आपला पराक्रम ह्या जोरावर त्यांनी पाहिलेलं स्वातंत्र्य भारताचं स्वप्न त्या पूर्ण करू शकल्या नाहीत पण त्यांनी दिलेलं योगदान हे अमूल्य होतं. त्यांच्या स्मृतीस एका भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार…

जय हिंद!!!

– विनीत वर्तक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *