| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..?

सध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या अगदी दररोज घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते हे विधान सध्या सातत्याने अधोरेखीत होत आहे.

ठाणे जिल्ह्याचा विचार करता सेनेचे प्राबल्य दिसून येते. याच किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. अनेक नवीन चेहऱ्यांची इतर पक्षातून भरती करून ह्या प्रयत्नाला बळ देण्याचं काम भाजप कडून ठाण्यात केलं जात आहे. सध्या ठाण्यातील भाजपचे नेते पाहिले तरी ते सहज लक्षात येते की सगळेच बाहेरून पक्षात आलेले आहेत. आमदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड असतील किंवा नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री झालेले कपिल पाटील असतील ठाणे भाजप मध्ये मूळचे ताकदवान नेते तसे कोणी नव्हतेच की बाहेरून आलेल्यांना अधिकचे महत्व देवून मूळ भाजप मधील लोकांचे महत्व कमी करण्यात आले याबाबत खात्रीने काही सांगता येणार नाही.

ठाणे जिल्ह्यात तसे पाहता मुळत: भाजपचे जे अतिशय मोजके चेहरे आहेत त्यातील एक म्हणजे आमदार रविंद्र चव्हाण. परंतु सध्या ते पक्षात अस्वस्थ आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांच्या अनुपस्थितीने या प्रकरणाला अजून हवा दिली आहे. बाहेरून येऊन पक्षात शिरजोर झालेल्या नेत्यांच्या मांदियाळी मुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे असे बोलले जात आहे.

आता जिल्ह्यात भाजपचे सत्ताकेंद्र भिवंडी कडे सरकताना दिसत असल्याने डोंबिवलीत आदळआपट सुरू आहे की काय असा संशय येण्यास वाव आहे. त्यात शिवसेनेचे खासदार मतदारसंघात करत असलेली कामे, जनसंपर्क पाहता पक्षातून आणि पक्षा बाहेरून देखील चव्हाणांची कुचंबणा होत असावी, असा कयास बांधला जाऊ शकतो.

परंतु चव्हाण पक्षात अस्वस्थ असले तरीही ते मूळचे भाजपचे आहेत, RSS च्या विश्वासातील होते, त्यामुळे ते भाजप पक्ष सोडतील असे वाटत नाही. परंतु सध्या RSS देखील नवीन चेहऱ्यांची डोंबिवलीतून चाचपणी करत असल्याचे खाजगीत बोलले जात आहे. त्यामुळे आधीच वाढलेली त्यांची अस्वस्थता भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. एकंदरीत, जुन्या भाजप नेत्यांना जपणे आवश्यक आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे राहील की, भिवंडीकडे आणि स्थानिक बाहेरचे या वादाच्या केंद्र बिंदूकडे सरकलेले हे अंतर्गत राजकारण कधी थांबते ते..?

Leave a Reply

Your email address will not be published.