आजोबांच्या शेअर्सवर नातवाचाही हक्क आहे का? स्टॉक ट्रान्सफरचा नियम काय, जाणून घ्या

मुंबई : वडिलांची संपत्ती किंवा आजोबांच्या मालमत्तेवर नेमका कोणाचा अधिकार असतो याविषयी आपण बऱ्याचदा चर्चा ऐकल्या असतील. पण शेअर्सबाबतही अशी व्यवस्था आहे हे तुम्हाला माहित्येय का? मालमत्तेप्रमाणेच शेअर्सना देखील सामान नियम लागू होतात का? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अलीकडेच चंदीगड येथील एका डॉक्टरला आपल्या आजोबांनी घेतलेले ५०० रुपये किमतीचे शेअर्स सापडले ज्याची सध्याची किंमत ३.७५ लाख रुपये आहे.

आजवर अशी प्रकरणे अनेक वेळा पाहायला मिळाली आहेत. अशा स्थितीत आजोबांच्या शेअर्सवर नातवाचा हक्क आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याशिवाय शेअरहोल्डरच्या शेअर्सवर कायदेशीर अधिकार कोणाचा आणि हे शेअर्स कसे ट्रान्सफर केले जातात. जर तुमच्या आजी-आजोबांनीही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील तर लक्षात घ्या की हे शेअर्स सहज हस्तांतरित केले जाऊ शकतात. डीमॅट खात्याद्वारे स्टॉक सहज हस्तांतरित केले जाऊ शकतात.

 

शेअर ट्रान्सफर करता येतात का?


शेअर्स खरेदी केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सिक्युरिटीज म्हणजेच शेअर्स हस्तांतरित केले जाऊ शकतात. यासाठी कायदेशीर वारसांना आवश्यक कागदपत्रांसह डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी (डीपी) संपर्क साधावा लागेल. तसेच शेअर्स फिजिकल फॉर्म (शेअर सर्टिफिकेट) असेल तर थेट कंपनीशी संपर्क साधावा. शेअरहोल्डरने नॉमिनीचे नाव दिलेले असेल तर शेअर्स ट्रान्सफरची प्रक्रिया आणखी सोपी होईल. शेअर हस्तांतरित करण्यासाठी नॉमिनीला ट्रान्समिशन फॉर्म आणि मृत्यू प्रमाणपत्राची नोटराइज्ड प्रत सादर करावी लागेल जी राजपत्रित अधिकारी किंवा नोटरी पब्लिकने प्रमाणित केलेली असावी.

 

याशिवाय नॉमिनीला डीपीच्या कार्यालयातून किंवा वेबसाइटवरून ट्रान्समिशन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. फॉर्म भरून त्यासोबत कागदपत्रे जोडून सबमिट करावी आणि नंतर त्याची पडताळणी केली जाईल. फॉर्ममध्ये दिलेली माहिती योग्य असेल तर शेअर्स नॉमिनीच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील.

 

दरम्यान, शेअरहोल्डरच्या मृत्यूनंतर नातवाला समभाग हस्तांतरित करण्याची एकमेव शक्यता म्हणजे मृत्यपत्र. पर्यायाने शेअरहोल्डर जिवंत असल्यास शेअर्स थेट नातवाला भेट म्हणून शेअर बाजारातून नातवाच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात. नातवाला शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी सेबी कायद्याच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद नाही.

 

नॉमिनी नसल्यास शेअर्सचे हस्तांतरण कसे?


आता प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीकडे आजोबांनी खरेदी केलेले शेअर्स असतील तर ते ट्रान्सफर करता येतील का? अशा परिस्थितीत, आजोबांनी आपल्या नातवाच्या नावावर मृत्युपत्रात हिस्सा दिला असेल तर तो हिस्सा मिळण्यास पात्र आहे. शेअर्ससाठी कोणीही नॉमिनी नसल्यास शेअर्स कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित केले जातील. लक्षात घ्या की कायदेशीर वारस किंवा नामनिर्देशित व्यक्ती न्यायालयाच्या आदेशानुसार ठरवले जाते. शेअर्सचे मूल्य एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी ट्रान्समिशन फॉर्म, मृत्यू प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, प्रतिज्ञापत्र आणि NOC आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *