बीड मधून लीड कुणाला ???3M आणि 3B ठरवणार…
वरकरणी भाजप साठी सोप्प्या वाटत असलेल्या बीड लोकसभेचा लेखाजोखा

(प्रतिनिधी) परळी ::-संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागून असलेल्या मोजक्या लोकसभा जागांपैकी एक म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ . महायुती तर्फे भाजप च्या पंकजाताई मुंडे आणि महाविकास आघाडी तर्फे बजरंग अप्पा सोनवणे हे दोन प्रमुख उमेदवार येथुन रिंगणात आहेत . २०२४ लोकसभा निवडणूकीचा अंदाज घेण्यासाठी आधी २०१९ च्या लढतीचा अंदाज घ्यावा लागेल . २०१९ मध्ये देखील या मतदार संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अविभाजीत) या दोन पक्षातच लढत झाली होती . त्यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी असा कुठला कंगोरा नसताना शेवटी शेवटी जातीय समीकरण प्रबळ ठरले आणि अखेरीस प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना १,६८,००० मतांनी पराभूत केले.

आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . भाजप ने चिन्ह अबाधित ठेवत फक्त उमेदवार बदलला आहे तर समोर ऐन वेळी घड्याळात बघून योग्य वेळ साधत तुतारी हाती घेऊन बजरंग सोनवणे पुन्हा एकदा लढतीसाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही उमेदवारांना काही बाजू जमेच्या तर काही बाजू अडचणीच्या ठरणार आहेत . 3M विरुद्ध 3B असा एक अंतर्गत मतप्रवाह इथे जाणवतो त्याचीच चर्चा आज आपण करूयात.

मविआ चे उमेदवार श्री बजरंग सोनवणे

मविआ तर्फे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे मतदारसंघात अप्पा या नावाने लोकप्रिय आहेत. दोन साखर कारखाने आणि जिल्हा परिषद राजकारणाचा दीर्घ अनुभव यामुळे बजरंग अप्पाचा जनसंपर्क दांडगा आहे . वैयक्तिक संपर्क आणि राष्ट्रवादी मार्फत धनंजय मुंडे यांची रसद ह्या जोरावर २०१९ मध्ये बजरंग सोनवणे यांनी जवळपास ५,०९,८०७ मते घेऊन तगडी लढत दिली . वैयक्तिक आणि पक्षीय बळ सोबतच 3M फॅक्टर जे बजरंग अप्पा सोनवणे यांना सहाय्यक ठरतील असे वाटते ते पुढीलप्रमाणे…

१) मराठा फॅक्टर :-

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सर्वाधिक धग बीड जिल्ह्यातच जाणवली. आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रित होऊन एकजूट झालेले गरजवंत मराठा एकगठ्ठा मतदान करतील का ? आणि तो फायदा बजरंग ह्याच उत्तर येणारा काळ देईल परंतु सध्यातरी हा फॅक्टर बजरंग अप्पा यांच्याच बाजूने झुकलेला दिसतो . ह्या जिल्ह्यात मराठा आंदोलन इतके प्रबळ आहे की खुद्द मनोज जरांगे यांनी इथून लोकसभा लढवावी यासाठी मराठा आंदोलक आग्रही होते . मराठा ध्रुवीकरण ला पर्याय म्हणून जर ओबेसी ध्रुवीकरण झाले नाही तर हाच फॅक्टर निर्णायक ठरेल असे सामान्य जनतेच्या मनात आहे

२) मुस्लिम फॅक्टर :-

बीड लोकसभेत बारीक लक्ष्य ठेवावे लागेल असा मतदार म्हणजे मुस्लिम मतदार होय . मतदारसंघात २०१९ साली २,३०,००० म्हणजेच एकूण मतदानाच्या ११% मुस्लिम मतदार आहे. मोदीविरोधी हा गट थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या पाठीशी गेला तर भाजप ची डोकेदुखी नक्कीच वाढू शकते . केंद्रातील हिंदुत्वकेंद्री राजकारणाला कंटाळलेला हा मतदार बजरंग सोनवणे यांना एकगठ्ठा मतदान करेल का ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. केवळ हिंदुत्व आणि मोदी विरोध हे एकमेव कारण नाही . मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मुस्लिम बांधवाचा सहभाग लक्षणीय होते. सभा आणि मोर्च्यांसाठी पाणी वाटप करण्या पासून ते थेट सभेत उपस्थिती असण्यापर्यंत हा सहभाग होता. मुस्लिम – मराठा दिलजमाई कशी काम करते यावरही सर्वांचे लक्ष असेल

३)महायुती :-

बजरंग सोनवणे यांना अनपेक्षित पणे मदत करणारा हा सुप्त घटक . मागच्या विधानसभेत पराभव पत्करावा लागल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपने जवळपास दुर्लक्षित केले होते . अगदी डिपॉझिट जप्त झालेल्या गोपीचंद पडळकर यांना देखील विधानसभा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले पण ते सौख्य पंकजाताई यांच्या पदरात कुणी घातले नाही . महायुती मध्येच एक गट पंकजा मुंडे यांच्या पराभवाची इच्छा बाळगून आहे. मुंढे भगिनींना ही निवडणूक तशी सोप्पी नाही . ह्या निवडणुकीत झालेला पराभव म्हणजे मुंडे भगिनींच्या राजकीय कारकिर्दीचा अस्तच समजावा लागेल. पक्षांतर्गत विरोधक बजरंग सोनवणे ना किती रसद पुरवतात ते महत्वाचे

महायुतीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे…

दुसऱ्या पिढीचे राजकारण करत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या मागे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे आशीर्वाद आणि पुण्याई आहे . गावोगावी , तांडा , पाड्यावर असलेला संपर्क आणि जिवाभावाचे कार्यकर्ते यावर पंकजाताई मुंडे यांची भिस्त आहे आणि हक्कही . जिल्ह्यात आणि राजकारणात देखील त्यांना “ताईसाहेब” ह्या नावाने ओळखले जाते . दांडगा जनसंपर्क , सत्ताकाळात केलेली कामे ह्या सोबतच 3B चे पंकजाताई ना मदत करतील असे सामान्य जनतेला वाटते ते पुढीलप्रमाणे…

१) भगवानगड :-

बीड लोकसभा मतदारसंघात वंचित शोषित घटकांची संख्या जास्त आहे . ऊसतोडणी कामगार पुरवणारा जिल्हा अशी ओळख असलेला जिल्हा आता कात टाकू लागला आहे . केवळ उसाच्या फडातच नव्हे तर सरकारी कार्यालयात देखील बीडचा माणूस हक्काने दाखल झाला . राष्ट्रसंत श्री भगवानबाबा ह्यांची अध्यात्मिक शिकवण आणि जोडीला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला अस्मितेचा हुंकार ह्यातून वंजारी समाजाने ही उन्नती साधली. भगवानगड हे सर्व धर्मीय आणि जातीय लोकांचे श्रद्धास्थान .

वंजारी समाज पूर्णपणे पंकजा मुंडेंच्या पाठीशी राहिला तर त्यांच्या साठी काही गोष्टी सोप्या होऊ शकतात हे नक्की

२) भाऊ :-

पंकजा मुंडे यांना दिलासा देणारी दुसरी गोष्ट म्हणजे बंधू धनंजय मुंडे यांची साथ . मागच्या वेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मध्ये विधानसभेची लढत होऊन त्यात पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता . परंतु आता पंकजा ह्या लोकसभेसाठी उभ्या आहेत आणि त्यामुळे पर्यायाने परळी विधानसभा ही धनंजय मुंडेंसाठी खुली राहील अशी शक्यता आहे . धनंजय मुंडे यांचा स्वतःचा असा चाहता आणि मतदार वर्ग जिल्ह्यात आहे . बजरंग सोनवणे यांना पक्षात आणून उमेदवारी देण्यापर्यंतचा प्रवास धनंजय मुंडे यांनीच घडवून आणला होता तेच सोनवणे आता विरोधात उभे आहेत . अस म्हणतात की वस्ताद स्वतःचा एक डाव राखून ठेवत असतात . बजरंग सोनवणे यांचे राजकीय वस्ताद असलेले धनुभाऊ आता बहिणीसाठी कोणता डाव टाकतात हे लवकरच समजेल .

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ह्यांचा करिश्मा असा आहे की त्यांना पितृतुल्य मानणारे अनेक नेते या राज्यात आहेत . रासप चे अध्यक्ष महादेव जानकर हे त्यातीलच एक . ते ही पंकजाताई ना बहीण मानतात . त्यांना परभणी ची जागा मिळवून देण्यात पंकजा मुंडे याचाही सहभाग आहेच . भाऊ फॅक्टर मधले हे भाऊ नंबर २

सातारा लोकसभेचे उमेदवार आणि गोपीनाथरावांना आदरस्थानी मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले . ऐनवेळी गरज पडल्यास पक्षाचा आदेश किंवा पंकजाताई चा वैयक्तिक आग्रह म्हणून मराठा मतदारांना प्रभावित करण्यासाठी उदयनराजे देखील एखादी सभा घेऊ शकतात . त्याचाही प्रभाव पडेलच .

३) भाषण :-

मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

भगवान गडावर प्राण कानात आणून दसरा मेळाव्यात मुंडे साहेबांना ऐकण्यासाठी जमणारा लाखोंचा जनसमुदाय हीच मुंडे साहेबांची खरी ताकद आणि संपत्ती . अमोघ वक्तृत्वाने त्यांनी पूर्ण महाराष्ट्र च नव्हे तर देशाची संसद देखील गाजवून टाकली . पंकजाताई मुंडे तोच वसा पुढे चालवत आहेत . “वंचितांची माय”अस लोक त्यांना हक्काने म्हणतात . धनंजय मुंडे असोत वा पंकजा मुंडे लोक त्यांच्यात गोपीनाथ मुंडे साहेबांना पाहतात. पंकजा मुंडे यादेखील उक्तृष्ट वक्त्या आहेत . उपस्थित जनसमुदाय आपल्या बाजूने कसा ओढायचा…त्याच्या काळजाला हात कसा घालायचा हे कसब त्यांनाही अवगत आहे. जातीय ध्रुवीकरणात कुंपणावर असलेला मतदार त्या त्यांच्या अमोघ वाणीने स्वतःकडे वळवतील अस त्यांचे समर्थक सांगतात

3M विरुद्ध 3B ह्यात कोण वरचढ ठरत ते मतमोजणीच्या दिवशी कळेलच…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *