व्यक्तिवेध : दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम..

दाक्षिणात्य राजकुमार, स्टॅलिन झाले नवे सीएम
………

एकेकाळी जगात डाव्या विचारांचा तत्कालीन तरुणाईच्या मनावर मोठे गारुड होते. रशिया ही जागतिक महासत्ता होती. रशियाचे अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांच्या नेतृत्वाचा जगात बोलबाला होता. द्राविडीयन चळवळीतून पुढे आलेल्या आणि ई पेरियार स्वामी यांच्या वैचारिक तालमीत तयार झालेले एम. करुणानिधी यांच्यावरही डाव्या, बुद्धीप्रामाण्यवादी विचारांचा प्रभाव होता. दक्षिणेच्या राजकारणात मैलाचा दगड ठरलेले एम. करुणानिधी यांनी आपल्या मुलाचेही नाव स्टॅलिन ठेवले. कारण स्टॅलिनचा जन्म एक मार्च १९५३ साली चेन्नईत झाला. त्याच्या काही दिवस आधीच रशियाचे सत्ताधीश स्टॅलिन वारले होते. त्यांचे नाव एम. करुणानिधी यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याला ठेवले. तेच मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन होय, दाक्षाणित्य राजकुमार असलेल्या स्टॅलिन यांनी तामीळनाडूचे नवे मुख्यमंत्री या पदाची सूत्रे आज शुक्रवारी हाती घेतली.

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी राजकारणात उतरलेल्या, तमिळ चित्रपटात अभिनेता असलेले स्टॅलिन यांनी चेन्नईचे महापौर म्हणून आपल्या कामाची छाप पाडली होती. त्याकाळी ज्येष्ठ अभिनेत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांचा तामीळनाडूत वरचष्मा असतानाही स्टॅलिन मात्र चेन्नई शहराचे रिअल हिरो होते. आपल्या वडिलांची म्हणजे एम. करुणानिधी यांच्या राजकीय सावलीचा आश्रय न घेता स्टॅलिनला स्वतंत्र राजकीय ओळख तयार करायची होती. मात्र, घराण्यातील राजकारण त्यांना भोवले. विरोधक असलेले अभाद्रमुक यांच्याशी लढतानाच स्टॅलिन यांना आप्तस्वकीयांशी लढावे लागले. आणीबाणीत मिसाखाली अटक असलेल्या या तरुणाने असीम कष्ट, सहनशीलता, पक्ष संघटना बांधणी आणि केंद्रातील सरकारच्या दबावतंत्रापुढे न झुकता १० वर्षानंतर द्रविड मुनेत्र कळघम म्हणजे द्रमुकची सत्ता स्थापन केली आहे. भारताच्या राजकीय क्षितीजावरील ते खरे नायक आहेत.

तामीळनाडूचे राजकारण हे द्रमुक नेते करुणानिधी आणि अभाद्रमुकच्या नेत्या जयललिता या दोघांच्या भोवतीच फिरत असते. तामीळनाडू राजकारणातील या दोन मोठ्या नेत्यांच्या निधनानंतर भाजपच्या कमळाबाईला या राज्यात सत्तेचे स्वप्ने दिवसा पडू लागली होती. यासाठी भाजपने दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत उर्फ शिवाजी गायकवाड यांना गळास लावण्यास सुरुवात केली होती. प्रचंड लोकप्रियतेवर स्वार असलेल्या रजनीकांत यांच्या करिष्मा पणाला लावून रावणाच्या श्रीलंकेजवळ असलेल्या तामीळनाडूत जय श्रीरामचा नारा लावण्याचा भाजपचा प्रयत्न होता. यासाठी जयललिता यांच्या एकेकाळच्या सहकारी शशिकला यांनाही तुरुंगवारी करुन आल्यानंतर राजकीय विजनवासात धाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भाजपसमर्थक अभाद्रमुकचा स्टॅलिन यांनी सुफडासाफ केला.

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात मावळते मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यात दोन गट निर्माण झाले होते. त्याचा परिणाम मागील सरकारच्या कार्यपद्धतीवर झाला. तामीळनाडून २०१७ मध्ये अपघाताने मुख्यमंत्री झालेल्या पलानीस्वामी यांचे सरकार फार दिवस टिकणार नाही असा राजकीय जाणकारांचा होरा होता. तथापि, केंद्र सरकारच्या मदतीने पलानीस्वामी यांनी कार्यकाळ पूर्ण केला. पलानीस्वामी यांचे सरकार केंद्रातील मोदी सरकारच्या हातातील बाहुले आहे. मोदी सरकार हे तामीळविरोधी आहे, अशी जनभावना निर्माण करण्यात स्टॅलिन यांना यश आले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकने ३९ पैकी ३८ जागा जिंकून तामीळनाडूवर राजकीय कब्जा घेतला होता. त्याचे सारे श्रेय स्टॅलिन यांच्या खंबीर नेतृत्वाला जाते.

नोटाबंदीच्या फसव्या निर्णयामुळे तामिळनाडू राज्यातील उद्योगधंद्यांची झालेली वाताहात, बेरोजगाराचे तांडे, अभाद्रमुकची भाजपशी असलेली अभद्र युती, करोना महामारीच्या काळात मोदी सरकारची ढेपाळलेली कामगिरी याबाबत स्टॅलिन यांनी सातत्याने आवाज उठविला. जलीकट्टू, नीट परीक्षा, तमिळी अस्मिता असे अनेक लोकांना भावणारे मुद्दे हातात घेत स्टॅलिन यांनी तामीळ जनता विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार असा संघर्ष तीव्र करण्यात बाजी मारली. निवडणुकीच्या काळात स्टॅलिन परिवारावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर तितक्याच आक्रमकतेने स्टॅलिन ही राजकीय सुडापोटीची कारवाई असल्याचे तामीळी मतदारांपुढे आक्रमकपणे मांडले. करुणानिधी यांच्या विशाल नेतृत्वापुळे स्टॅलिन यांना काही मर्यादा असायच्या. त्या छायेतून ते बाहेर पडले आहेत.

तामीळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी १५४ जागांवर स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुनेत्र कळघम द्रमुकने निर्विवाद बहुमत संपादन केले आहे. द्रमुकला सहाव्यांदा सत्ता दिल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार. जनतेप्रति प्रामाणिक राहीन. जनतेसाठीच काम करेन. कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. सर्व कार्यकर्ते मंडळीचे अभिनंदन. कारण त्यांचेही स्वप्न पूर्ण झाले आहे, अशा शब्दात विजयानंतर स्टॅलिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या यशस्वी वाटचालीस आभाळभर शुभेच्छा. तामीळनाडून १० वर्षानंतर सत्तांतर झाले असून, त्याचे खरे नायक एम. के. स्टॅलिनच आहेत.

तामीळ प्रांतातील दिग्गज नेते एम. के. करुणानिधी यांचे तृतीय चिरंजीव आणि करुणानिधी यांच्या दयालु अम्मल या दुसऱ्या पत्नीपासून झालेले हे राजकुमार आहेत. स्टॅलिन यांनी तत्कालीक मद्रास विद्यापीठातून नंदनम आर्टस कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी संपादन केलेली आहे. त्यांचे मोठे बंधु एम. के. अझगिरी आणि सावत्र बहिण कनिमोझी ह्या राज्यसभा खासदार आहेत.
तत्कालीन मद्रास आणि सध्याच्या चेन्नई शहरात जन्मलेले स्टॅलिन हे वयाच्या १४ व्या वर्षी निवडणूक प्रचारात उतरले होते. १९७३ साली स्टॅलन हे द्रमुकच्या कार्यकारिणीवर निवडले गेले. आणीबाणीला विरोध केला म्हणून त्यांना मिसाखाली तुरुंगवास भोगावा लागला. तेथेच त्यांची राजकीय जडणघडण होण्यासाठी मनाची मशागत झाली. आणीबाणीनंतर त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. १९८९ नंतर चेन्नईतील थाउजेंड लाईटस विधानसभा मतदारसंघातून ते चारवेळा निवडून आले आहेत. थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत ते १९९६ साली चेन्नईचे महापौर म्हणून निवडून आले. २००१ साली पुन्हा ते चेन्नईचे महापौरपदी विराजमान झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनि नगरविकास कायद्यात सुधारणा करुन एका व्यक्तीला दोन सरकारी पदे भूषविता येणार नाही असा कायदा संमत केला. हे प्रकरण न्यायालयात गाजले.

नेहरु गांधी यांच्याप्रमाणेच करुणानिधी यांनीही राजकारणात घराणेशाही निर्माण केली असा विरोधकांचा आरोप होता. पण स्टॅलिन हे घराणेशाहीचा वारसा नव्हे तर स्वकर्तृत्वाने पुढे आलेले व्यक्तीमत्व आहे असे करुणानिधी यांनी अनेकदा स्पष्टीकरण दिले. १९८९ आणि १९९६ मध्ये करुणानिधी मुख्यमंत्री असतानाही आमदार पुत्र असलेले स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. स्टॅलिनने आपली लढाई स्वत लढून चेन्नईचे महापौर पद पटकाविले होते. नंतर ते मंत्री झाले. पण करुणानिधी यांनी अन्य दोन मुले एका आरोपात अडकल्यानंतर त्या दोघांना पक्षातून काढून टाकले होते. सावत्र बहीण कनीमोझी यांना साथ देऊन कोट्यवधीची संपत्ती निर्माण करणारे ए. राजा यांना समर्थन देण्याच्या निर्णयाबाबत करुणानिधी यांच्या विरोधात स्टॅलिन गेले होते.

एम. करुणानिधी यांनी पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. तामिळनाडूला सामाजिक, आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वयाच्या १७ व्या वर्षी एम करुणानिधी यांनी तामिळ स्टुडंट्स फोरमची स्थापना केली. १९४०च्या दशकात त्यांची भेट सी. एन. अण्णादुराई यांच्याबरोबर झाली. अण्णादुराई हे त्यांचे राजकीय गुरू ठरले.

आपल्या विचारांचा अधिक ताकदीने प्रसार करण्यासाठी त्यांनी मुरसोली या वृत्तपत्र नव्याने सुरु केले. हे वृत्तपत्र नंतर द्रमुक पक्षाचे मुखपत्र झाले. करुणानिधी यांनी प्रथम १९५७ साली निवडणूक लढवली. ते कुलिदलाई येथून आमदार झाले. तर त्यांची शेवटची निवडणूक २०१६ साली होती, जेव्हा ते थिरुवरूरमधून निवडून आले. अशाप्रकारे त्यांनी एकूण १३ वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि एकदाही पराभूत झाले नाहीत.

मुख्यमंत्री म्हणून करुणानिधी यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतले. कमाल नागरी जमीन धारणा कायदा १५ एकरपर्यंत कमी करण्यात आला. शिक्षण, नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण २५ वरून ३१ टक्के करण्यात आले. सर्व जातींतील लोकांना मंदिरातील पुजारी होता येईल, असा कायदा करण्यात आला. त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यांच्या काळात शेतीपंपासाठी लागणारी वीज मोफत करण्यात आली. त्यांनी सर्वांत मागास जात हा स्वतंत्र प्रवर्ग बनवला. चेन्नईसाठी मेट्रो ट्रेन, रेशन दुकानांमधून एक रुपया प्रतिकिलो दराने तांदूळ विक्री, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण, मोफत सार्वजनिक आरोग्य विमा, दलितांसाठी मोफत घरे, हातरिक्षांवर बंदी असे काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी १९ वर्षं मुख्यमंत्रिपदी असताना घेतले होते.

करुणानिधी यांच्या कार्यकाळात द्रमुकमध्ये दोनदा मोठी फूट पडली. एकेकाळचे तामिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन किंवा एमजीआर यांनी द्रमुकमधून बाहेर पडत अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत राज्यात सत्ता मिळवली. दुसरी फूट पडली १९९३ साली जेव्हा वायको यांनी द्रमुकतून बाहेर पडत एमडीएमकेची स्थापना केली. यामुळे अनेक जिल्ह्यांतील पक्ष सचिव वायको यांच्यासमवेत गेले. पण करुणानिधी यांनी पक्ष भक्कम ठेवत पुन्हा सत्ता मिळवली.
व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीने मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. मागासलेल्या जातींसाठी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यात आले. त्यामध्ये करुणानिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरली. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक १९९८ ते २०१४मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता. युपीएच्या पहिल्या सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात तामिळनाडूमधले १२ मंत्री होते. द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचे खाते होते. हा झाला एम. करुणानिधी यांचा राजकीय प्रवास.

आता नवे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत ३३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात १९ माजी मंत्री आणि १५ नवे चेहरे आहेत. मंत्रिमंडळात दोन महिला मंत्री आहेत. स्टॅलिन यांनी तातडीने खातेवाटपही केले असून, मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे गृहमंत्रालयासोबतच सामान्य प्रशासन विभाग आणि इतर काही खाती असतील. सध्या करोनाचे संकट आहे. या काळात तामिळनाडूत सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्रालय चेन्नईचे माजी महापौर, आ. सुब्रमणियन यांना देण्यात आले आहे.

तमिळ नेते, विचारवंत आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार यांचा करुणानिधी यांच्यावर मोठा प्रभाव होता. तोच द्रविडीयन चळवळीचा वारसा स्टॅलिन पुढे चालवतील यात शंका नाही. बदलत्या काळात बदलत्या प्रश्नांची राजकीय मांडणी ते कशी करतात आणि जनाधार कसा टिकवितात हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. स्टॅलिन यांना भावी वाटचालीस शुभेच्छा….

समीर मणियार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *