!… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील किस्सा !

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ! याशिवाय त्यांनी केंद्रात उपप्रधानमंत्री, संरक्षणमंत्री अशी खातीही सांभाळली होती. यशवंतराव चव्हाण ज्यावेळी भारताचे संरक्षणमंत्री होते तेव्हा एक घटना घडली. त्या घटनेतुन यशवंतरावांच्या मनातील एका हळव्या माणुसपणाची ओळख होते. काय आहे ती घटना जाणुन घेऊया..

यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असतानाची ही घटना ! एके दिवशी यशवंतरावांच्या मोटारींचा ताफा पंजाबातुन दिल्लीकडे निघाला होता. यशवंतराव प्रवासात रस्त्यावर लागणारी एक एक गावे मागे टाकत दिल्लीकडे मार्गक्रमण करत होते. अचानक एका गावातुन जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला “पानीपत” नावाचा नामफलक दिसला. क्षणार्धात यशवंतरावांनी चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. आपला पुढचा नियोजित प्रवास खंडित करून यशवंतराव १७६१ साली ज्याठिकाणी पानिपताचा युद्धप्रसंग घडला होता, त्या “काला आम” नावाच्या ठिकाणी ते पोहोचले.

गाडीतुन उतरुन यशवंतराव तिथल्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधींच्या समोर आले. समाधींसमोर येताच त्यांनी अचानक शेतात बसकण मारली. त्या रानातली पांढुरकी माती त्यांनी आपल्या हाताच्या दोन्ही मुठींमध्ये भरली. मातींनी मुठी भरुन कविहृदयाचे यशवंतराव हमसुन हमसुन रडु लागले..

यशवंतरावांची ही अवस्था पाहुन सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची एकच तारांबळ उडाली. यशवंतरावांच्या भावनेचा पहिला पुर ओसरल्यानंतर आपल्या ओघळत्या अश्रुंना कसाबसा बांध घालत ते जमलेल्या उपस्थितांना सांगु लागले,

“दोस्तहो, हीच ती पवित्र माती…! राष्ट्रसंकट उद्भवल्यावर त्याविरोधात कसे लढावे, शत्रुला कसे भिडावे याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे. आमच्या महाराष्ट्रभुमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे. त्यांच्या रक्तामांसानीच या मातीचे पवित्र भस्मात रुपांतर झाले आहे…”

Leave a Reply

Your email address will not be published.