लोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु – संदीप पवार सर..!

आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा जरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड .. सरांनी आपले आयुष्यच जणू शाळेला अर्पण केले आहे. इतके अफाट आणि अचाट काम त्यांनी स्वतः शिक्षण क्षेत्रात घडवून आणले आहे.

त्यांच्याशी दैनिक लोकशक्ती ने साधलेला संवाद :

प्रविण शिंदे ( मुलाखतकार ) : संदीप सर नमस्कार..! आपले दैनिक लोकशक्तीच्या लोकसंवाद कार्यक्रमात स्वागत..! आणि गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा..!

संदीप पवार सर : नमस्कार , प्रविण सर..! मलाही लोकशक्तीच्या कार्यक्रमात येऊन आनंद वाटत आहे. तुम्हालाही गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

प्रविण शिंदे ( मुलाखतकार ) : सर, चला गप्पांना सुरुवात करुया..!

संदीप पवार सर : नक्कीच सर..!

मुलाखतकार : सर आपली २५ वर्षाची सेवा झाली. या २५ वर्षातील शैक्षणिक टप्प्यातील एखादा अविस्मरणीय क्षण कोणता आहे? आणि त्या प्रसंगातून तुम्ही काय शिकलात?

संदीप पवार सर : मी १९९५ पासून आज पर्यंत जरेवाडी शाळेत शिक्षकाची नोकरी करत आहे. या पंचवीस वर्षाच्या अनुभवांमध्ये अनेक अविस्मरणीय क्षण आहेत, सुरुवातीच्या काळामध्ये एक शिक्षकी शाळा आणि २४ विद्यार्थी ,त्यानंतर पाचवीचा वर्ग सुरू केला त्यावेळेस विद्यार्थी संख्या ४० झाली. सुरुवातीला मला एकट्यालाच ५ वर्ग शिकवावे लागत होते. इमारतही एकच होती. शाळेत जाण्यासाठी रस्ता नव्हता. लोकांमध्ये अडाणीपणाचा भाव जास्त होता. कुठल्याही शैक्षणिक अधिष्ठान या वस्तीला नव्हते. अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा मोठ्या जोमाने सुरु केला, अनेक अडचणी आल्या परंतु ध्येय समोर असल्यामुळे त्या अडचणींना तोंड देत खूप काही शिकायला मिळाले. एखादी अडचण आल्यास मोठ्या धैर्याने त्याला सामोरे गेल्यास निश्चितच मार्ग निघतो असे प्रसंगही याकाळात अनुभवयास मिळाले. यामध्ये गावकऱ्यांनी फार मोलाची साथ दिली आणि शैक्षणिक विकास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात पाचवीचा वर्ग उघडण्यास विद्यार्थी मिळण्यात परिसरातून देखील विद्यार्थी मिळत नव्हते परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने पाचवा वर्ग सुरू केला आणि उत्कृष्ट अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध केली आणि हळूहळू विद्यार्थी वाढू लागले.

मुलाखतकार : हा आपला ध्येयवेडेपणाच सर..! पण यात शिस्त होती. तर सर शिस्तीने किंवा शिस्तीचा धाक दाखवून मुलांकडून अध्ययन करून घेतल्यास ते यशस्वी होईल काय? होते का..?

संदीप पवार सर : कोणतेही चांगले कार्य होण्यासाठी नियमांची अर्थात शिस्तीची गरज असते. शालेय जीवनात बाल वयामध्ये मुले शाळेमध्ये येतात. शाळेमध्ये मुलांना संस्कारक्षम शिक्षणाची गरज असते. या प्रसंगी विद्यार्थी काही चुका करत असतील तर त्या वेळोवेळी निदर्शनास आणुन द्याव्या लागतात. त्यांना योग्य प्रकारे समजून सांगावे लागते. परंतु अनेक वेळा समजून सांगितल्यानंतर देखील मुले ऐकत नसतील, थोडे बेशिस्त वर्तन करत असतील तर निश्चितच त्यांना नियमांचा अथवा शिस्तीचा धाक दाखवावा लागतो. आपणही आपल्या बालपणा मध्ये अनुभवले आहे आणि मग मुलांना एकदा नियमांची सवय लागली की ती बेशिस्त वर्तनापासून आपोआप दूर होतात आणि चांगल्या प्रकारे अध्ययन प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. म्हणजेच नियमांचे पालन करून, शिस्तीचे पालन करून मुलांवर योग्य संस्कार होतात आणि त्यामुळे मुले चांगली शिकू शकतात ,असा माझा २५ वर्षाचा अनुभव आहे.

मुलाखतकार : अगदी खरे आहे सर. शिस्तीची सवय लागली की ते नियम अजिबात जड वाटत नाहीत. सर लॉक डाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू आहे. परंतु वास्तविक पाहता आकलनाचा विचार केला तर फेस टू फेस शिक्षण प्रणाली किंवा ऑनलाईन शिक्षण प्रणाली यापैकी कोणती शिक्षण प्रणाली तुम्हाला सोयीस्कर वाटते?

संदीप पवार सर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील बहुतांश पालकांकडे ऑनलाइन प्रणालीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यात अनेक अडचणी आहेत आणि ती खर्चिक बाब देखील आहे म्हणून ऑनलाइन प्रणाली मध्ये शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया प्रत्यक्ष समोरासमोर होत नाही. त्यामुळे तितकसं प्रभावी ते शिक्षण होत नाही. हा एक तात्पुरता पूरक पर्याय आहे. परंतु आकलनाचा विचार जर केला तर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रत्यक्ष आंतरक्रिया झाल्याशिवाय चांगल्या शिक्षणाचा श्री गणेशा होत नाही किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत नाही. म्हणून प्रत्यक्ष विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आंतरक्रियातून होणारे शिक्षणच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उपयोगी ठरते. परंतु नवनवीन तंत्रज्ञानाचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि या फेस टू फेस प्रणाली बरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी ज्ञानाने समृद्ध करण्यासाठी आपण ऑनलाईन शिक्षणाची मदत घेऊ शकतो.

मुलाखतकार : म्हणजे थोडक्यात दोन्हीही यांचा सुवर्ण मध्य शोधावा लागेल. सर आपण गेल्या पंचवीस वर्षापासुन जरेवाडी येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहात, यात अनेक अडचणी आल्या. या अडचणींचा सामना करत आज रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. मागील काही आठवणी लक्षात घेता आज तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत?

संदीप पवार सर : सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणतेही चांगले कार्य घडण्यासाठी सुरुवातीला असंख्य अडचणी येत असतात. परंतु त्या अडचणींना तोंड देत धैर्याने पुढे जायचे असते. मलाही सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या. विद्यार्थ्यांना बसायला पुरेशी जागा नव्हती, शिक्षकही नव्हते, शाळेमध्ये कुठल्याही आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नव्हत्या, परंतु मनात जिद्द होती की आपण काहीतरी वेगळे करून दाखवायचे, ग्रामस्थांच्या मदतीने या समस्या सोडविण्याचा निर्धार केला. सुरुवातीच्या काळामध्ये शाळेला बहुतेक सुविधा निर्माण केल्या. पिण्याचे पाणी, खेळण्यासाठी मैदान, शौचालयाची सुविधा, विद्युत सुविधा या सुविधा ग्रामस्थांच्या मदतीने पूर्ण केल्या. त्याला शासनाची ही जोड मिळाली. बाहेरील मुलांना येण्यासाठी नदीतून यावे लागे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नद्यांना अनेक वेळा पूर यायचा. मग या पुरातून मुलांना नदीपलीकडे जाण्यासाठी पालक मदत करायचे. नदीवर ती दोर टाकून त्या दोराच्या साह्याने विद्यार्थ्यांना नदीच्या पलीकडे पोहोच करायचे. शाळेमध्ये अडचणी होत्या त्या वेळी बऱ्याच प्रमाणात शाळेमध्ये सापही निघायचे अशा वातावरणामध्ये ग्रामस्थ खूप सहकार्य करायचे आणि सामुदायिक श्रमदानाच्या माध्यमातून शाळेत भोवतालच्या सर्व अडचणी त्यांनी दूर केल्या आणि परिसर स्वच्छ केला. त्यामुळे हळूहळू या अडचणींवर आम्ही मात केली या टप्प्यातून जात असताना अनेक अडचणी ग्रामस्थांच्या माध्यमातून सोडवल्या आणि पूर्वी २४ पटामध्ये सुरू झालेली शाळा आज ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. एक शिक्षकी शाळेचे रुपांतर आज १८ शिक्षकी शाळेमध्ये झाले आहे. एका वर्ग खोलीचे रूपांतर आज वीस वर्ग खोल्यांमध्ये झालेले आहे. सर्व भौतिक सुविधांनी सज्ज अशी शाळा आहे. म्हणूनच गेल्या सर्व अनुभवांचा विचार करतात आज मनस्वी आनंद आहे. आपण एवढ्या छोट्या शाळेचे रुपांतर सर्वांच्या अर्थात गावकऱ्यांच्या तसेच सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने मोठ्या शाळेत रूपांतर केले याचा मनापासून अभिमान वाटतो.

मुलाखतकार : हे अचाट आणि अविश्वसनीय असच रूपांतर आहे. हे आपल्या मेहनतीमुळे. सर शिस्त, संस्कार , आणि शिक्षण याविषयी आपले मत काय आहे?

संदीप पवार सर : आपल्या सर्वांचा अनुभव आहे की प्रत्येकाला जीवनामध्ये शिस्त अर्थात नियमांची सवय असणे आवश्यक आहे. शिस्तीतून संस्कार निर्माण होतात आणि संस्कारातून चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळते. चांगल्या नियमांचे पालन केले तर चांगली शिस्त लागते आणि मुले वाईट गुणांपासून दूर राहतात आणि याचा उपयोग चांगल्या शिक्षणासाठी निश्चितच होतो हा माझा आणि आपल्या सर्वांचा देखील अनुभव आहे. म्हणूनच योग्य शिस्तीतून संस्कारक्षम शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. यातूनच चांगले, सुजान नागरिक घडत असतात.

मुलाखतकार : सर, शाळेमध्ये तुम्ही टीमवर्क कशाप्रकारे करून घेता? जे बहुतेक जणांना जमत नाही.

संदीप पवार सर : कोणतेही विधायक कार्य घडवायच असेल तर सामूहिक प्रयत्नांची गरज असते. सामूहिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या गोष्टीतूनच चांगले कार्य होत असते. शाळेमध्ये अठरा शिक्षक आहेत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन आम्ही काम करतो. शिक्षकांच्या आवडीनिवडीचा कल लक्षात घेता त्यांना अध्यापनाव्यतिरिक्त त्यांचे कौशल्य प्रभावीपणे वापरण्याची संधी शिक्षकांना दिली जाते. सर्व शिक्षकांना मान दिला जातो, म्हणूनच शिक्षक मोठ्या उत्साहाने काम काम करतात . एखाद्या बाबतीत गैरसमज निर्माण झाल्यास आम्ही सर्व शिक्षक एकत्रितपणे सोडवतो. आम्ही सर्व शिक्षक जरेवाडी एक कुटुंब आहे, या कुटुंबातील आपण सदस्य आहोत आणि आपल्‍या कुटुंबाच्‍या प्रगतीसाठी सर्वांनी मिळून मिसळून एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे हे जाणतो.

मुलाखतकार : हो कुटुंबच आहे जरेवाडीची शाळा. सर, आजची शिक्षण प्रणाली आणि पूर्वीची शिक्षण प्रणाली याबाबत शिक्षकांची शिकवण्याची मानसिकता टिकून आहे काय?

संदीप पवार सर : शिक्षण प्रक्रियेमध्ये कालानुरूप सातत्याने बदल होत असतात आणि सातत्याने होणारे बदल स्वीकारून पुढे पुढे मार्गक्रमण करणे हे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने पूर्वीची शिक्षण प्रणाली त्या काळात अनुरूप होती परंतु आज नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, बदललेले धोरण या सर्वांचा विचार करता आजच्या घडीला देश विकासाच्या वाटेवर असताना विकसित कसा होईल या दृष्टीने दिले जाणारे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. याचा अर्थ पूर्वीच्या शिक्षण प्रणाली विचारात घेऊन आज त्यामध्ये बदल करून आपण मार्गक्रमण करत आहोत. पूर्वी शिक्षणामध्ये लोकांना फारशी रुची नव्हती निरक्षरतेचे प्रमाण जास्त होते परंतु आज शिक्षणाच्या हक्कानुसार सर्व विद्यार्थ्यांना यशस्वीपणे शिक्षण मिळत आहे आणि सर्व विद्यार्थी नवनवीन ज्ञान विकसित करून ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. शिक्षक त्यासाठी महत्त्वाचे मेहनत घेत आहेत.

मुलाखतकार : शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अवांतर कामाचा परिणाम गुणवत्तेवर होतो काय? जो सध्या ज्वलंत प्रश्न आहे.

संदीप पवार सर : निश्चितच होतो हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शैक्षणिक धोरण आहे. परंतु आज शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त अनेक आवांतर कामे दिली जातात. या अवांतर कामांमध्ये शिक्षक भरडला जातो आणि मुख्य उद्देश बाजूला राहून अवांतर कामे पूर्ण करण्यासाठी शाळेचा बराचसा वेळ खर्च होतो. परिणामी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेला भरपूर सराव घेणे अडचणीचे होते. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची प्रगती मंदावते. गुणवत्तेवर याचा परिणाम होऊ नये म्हणून फक्त जनगणना आणि निवडणूक काम वगळता इतर कामे शिक्षकांना न दिल्यास त्यांना अधिकचा वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी घेता येईल आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल.

मुलाखतकार : अगदी खरे आहे सर. शिक्षकांना शिकवू दिले पाहिजे. सर, एवढे मोठे कार्य उभारणीसाठी आपण दरेवाडी गावात इतिहास निर्माण केला. हे आपण कसे निश्चित केले? ते पूर्ण करण्यासाठी आपणास विरोध झाला काय? तो आपण कशाप्रकारे स्वीकारून पुढे गेलात?

संदीप पवार सर : सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चांगले कार्य घडत असताना विरोध होतच असतो. परंतु त्याला न जुमानता आपण पुढे जायचे असते. ध्येयाचा ध्यास घेतला म्हणजे कामाचा त्रास होत नसतो याप्रमाणे मी ग्रामस्थांना विचारात घेऊन सुरुवातीलाच आपण शाळेमध्ये एक वेगळ आणि चांगलं कार्य एकत्रितपणे करू असे सुचविले होते. ग्रामस्थांनी त्याला मोलाची साथ दिली. सुरुवातीला शाळेत मुले येत नव्हती. ज्या वेळी बाहेरून मुले शाळेत यायला लागली तेव्हा परिसरातून बराच विरोध झाला. आपल्या शाळेतील पटसंख्या कमी होईल म्हणून लोक अडचणीत आणू लागले. परंतु माझ्यासह माझ्या सहकारी मित्रांची आणि गावकर्‍यांची जिद्द होती. आपले हे चांगले कार्य पुढे चालू ठेवायचे, यासाठी विरोध झाला तरी तो स्वीकारायचा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांना विश्वासात घेऊन शैक्षणिक कार्य जोमाने सुरू ठेवले. पालकांनी सहकार्य केले आणि त्याच्या जोरावर ती आज एवढ्या मोठ्या शाळेत रूपांतर झाले. सुरुवातीच्या काळामध्ये वर्ग वाढत गेले आणि पट संख्या देखील वाढत गेली परंतु शिक्षक मात्र मिळत नव्हते त्यावेळी गावातील श्री उद्धव पवार यांचे डीएड पूर्ण झाले होते. त्यांना विनंती केली आणि त्यांनी विनावेतन शाळेमध्ये काम सुरू केले . डीएड झालेल्या इतर काही मुला- मुलींची याकामी आम्ही मदत घेतली आणि या सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक कार्य सुरू ठेवले.

मुलाखतकार : हे अभिमानास्पद असेच आहे. सर , आपण आशावादी असतो. सतत कोणत्या ना कोणत्या मनीषा मनात असतात, त्यानुसार आपले शिक्षण विषयक स्वप्न जरेवाडीत पूर्ण झाले काय? किंवा भविष्यातील जरेवाडी शाळा कशी असेल?

संदीप पवार सर : ज्या उदात्त हेतूने जरेवाडी शाळेमध्ये ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक कार्य सुरू केले होते. ते अगदी मनाप्रमाणे पूर्ण झाले. अगदी छोटी पटसंख्या असणाऱ्या शाळेचे ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या शाळेमध्ये रूपांतर झाले. तब्बल ६० गावातून मुले शाळेमध्ये ये-जा करू लागले. शाळेचे नाव राज्यभर पोहोचले याचा मनस्वी आनंद वाटतो, अभिमान देखील वाटतो. ज्या हेतूने हे कार्य सुरू केले होते ते स्वप्न नक्कीच पूर्ण झाले आहे. परंतु शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया असून कितीही काम केले तरी ते अपूर्णच राहते इतका मोठा विस्तार शिक्षण प्रक्रियेचा असतो. भविष्यामध्ये जरेवाडी शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. जरेवाडी शाळेच्या माध्यमातुन अनेक विद्यार्थी घडावेत, सुजाण नागरिक व्हावेत या अपेक्षे सह सर्व जण आम्ही शैक्षणिक वारसा नव्या जोमाने जोपासत आहोत.

मुलाखतकार : सर, आपल्याशी विविधांगी चर्चा झाली. अगदी थोड्या काळात बऱ्याच गोष्टी आपण सोप्या शब्दात सांगितल्या. आपल्या सारखे आदर्श गुरु आहेत, म्हणून ह्या संस्था अभिमानाने टिकून आहेत.

संदीप पवार सर : धन्यवाद सर..! आभारी आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *