मानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..!

डाकू जेव्हा चोरून लपून गावात येतात, रात्रीच्या अंधारात डाका घालतात, तोवरच त्यांची दहशत, तोवरच त्यांची भीती ! तोवरच त्यांच्या टोळीला दीर्घकाळ भविष्य असते..!

पण जर एखाद्या टोळीच्या, म्होरक्याच्या डोक्यात हवा गेली, राजरोस डाके टाकायला लागले, दिवसाढवळ्या गावात घुसायला लागले, तर.. ?

अशावेळी काही वेळासाठी गोंधळ उडतो. सुरुवातीला गाव हादरून जातो. सैरभैर होतो. पण डाकूंचा हैदोस पुन्हा पुन्हा तसाच सुरू राहिला, तर मात्र हळू हळू सारा गाव डाकूंच्या विरोधात संघटित व्हायला लागतो ! आणि इथूनच डाकुंचे कपडे फाडायला सुरुवात होते. डाकुंना पळता भुई थोडी होते. डाकुंचे साम्राज्य उध्वस्त व्हायची ती सुरुवात असते.

गावात एखादा सावकार असतो. एखादा दुकानदार असतो. आपल्याला तो नकळत आपलाच वाटतो ! वरून सज्जन पणाचा आव आणत असला, तरी तो प्रत्यक्षात डाकूंच्या टोळीचा साथीदार असतो. लुटीतून आलेल्या मालाची विल्हेवाट लावण्याचं काम तो करत असतो. त्याचे वरपर्यंत लागेबांधे असतात. हा दुकानदार धार्मिक कार्यक्रमात नेहमीच सहभागी असतो. उत्साहानं देणग्या देतो. लोकांना आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन देतो. गरीब, अशिक्षित लोकांना तो एक प्रकारचा धर्मात्मा वाटतो. या बुरख्या आडून त्याला पाप करणं सोपं जाते.

डाकू संघटित असतात. क्रूर असतात. निष्ठुर असतात. विकृत असतात. मानसिक रुग्ण असतात. बुद्धी आणि विवेक यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. लोकांच्या मेहनतीवर डाका घालणं, लुटालूट करणं ह्यात त्यांना असुरी आनंद मिळतो. स्वतःच्या कष्टाचं खाणं, यावर त्यांचा विश्वास नसतो.

डाकुंची टोळी कितीही मोठी असली, तरी त्यांचं स्वत:च्या नावाचं रजिस्ट्रेशन नसते. त्यांचं स्वतःच्या नावाचं बँकेत अकाउंट देखील नसते. मात्र गावातील दलालांना ते पुढं करतात. त्यांच्या पुढाकारानं वेगवेगळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक मंडळं उभी करतात. त्यांचं रजिस्ट्रेशन देखील करतात. त्या नावानं दक्षिणा गोळा करतात. डाकू आणि त्यांचे समर्थक यांची पिलं विदेशात वगैरे असतात. तिथून ते नियमित पैसा वगैरे पाठवतात. पैसा जास्त झाला, जास्तच माजावर आलेत, तर मग ते एखादी राजकीय पार्टी वगैरे काढतात. अर्थात तिचं रजिस्ट्रेशन असलं, तरी त्यांना देशाच्या भल्याशी काहीही देणंघेणं नसते. लूट हीच त्यांची संस्कृती असते. लूट हा त्यांचा धर्म असतो. लुटीमध्येच त्यांना असुरी समाधान असते.

मुख्य टोळीच्या नावानं जी दक्षिणा गोळा केली जाते, त्याचा कुठेही हिशेब नसतो. त्याचं रजिस्ट्रेशन नसते. अकाउंट नसते. त्यांची घटना नसते. त्यांच्या नावाचं कार्यालय किंवा फुटभर जागा देखील नसते. निष्णात डाकू हे सारे व्यवहार समाजसेवेचे बुरखे पांघरलेल्या आपल्या इतर शाखांच्या माध्यमातून करतात. ह्या शाखांची नावं देखील सेवेचा आव आणणारी असतात..पण वैचारिक आणि ऐतिहासिक गोंधळ निर्माण करणारी असतात..!

ही मुख्य टोळी म्हणजे मानसिक रुग्णांची गँग असते. धर्म, संस्कार, राष्ट्रवाद असल्या गोष्टींचा ते वारंवार उच्चारत असतात. त्याबाबतीत त्यांच्या कल्पना मात्र भोंगळ असतात. फसव्या असतात. अनिती, दांभिकपणा, कपट हा यांच्या रक्तातील गुण असतो. त्यांनी उभारलेल्या इतर शाखा किंवा छुप्या टोळ्या मधील म्होरके प्रामुख्यानं बिनडोक असतात. अर्धवट असतात. तेही मानसिक रुग्ण असतात. दहा पाच पाठ केलेली वाक्य हेच त्यांचं अगाध ज्ञान असते. त्यांचा मेंदू आधीच काढून घेतला असतो. मेंदूमध्ये भरलेला गोबर हा त्यांच्यासाठी सर्वोच्च अभिमानाचा ठेवा असतो. त्यांच्या दृष्टीनं तोच खरा धर्म असतो ! तोच त्यांचा राष्ट्रवाद असतो !

या टोळीची विचारधारा वेगळी असते. ती विकृती असते. त्यांच्या डोक्यातील त्यांचं विश्व वेगळं असते. त्यांच्या डोक्यातील त्यांचा देशही वेगळा असतो. त्यांचा धर्मही वेगळा असतो. त्यांचं मनातलं राष्ट्रगीत वेगळं असते. त्यांचा झेंडा वेगळा असतो. त्यांची राज्यघटना वेगळी असते. ते ज्या देशात राहतात त्या संवैधानिक देशाचा ते कायम द्वेष करत असतात. त्या देशाच्या राष्ट्र ध्वजाचा कायम द्वेष करत असतात. राष्ट्रगीताचाही कायम द्वेष करत असतात. वरून गोष्टी राष्ट्रभक्ती बाबत करत असले, तरी त्यांच्या मनातलं राष्ट्र वेगळंच असते. विकृतीलाच ते राष्ट्रभक्ती म्हणतात. हे लोक कमालीचे निर्लज्ज असतात.

असे डाकू स्वतःचे पेड वर्कर्स तयार करतात. त्यांना सेवक वगैरे सारखंं गोड संबोधन देतात. हे लोक साधेपणाचा आव वगैरे आणतात. हे बोलायला वगैरे चतुर असतात. हे शिकलेले पोपटराव असतात. टोळीतील लोक एकमेकांच्या नावापुढे जी वगैरे लाऊन आपल्या लोकांचा मोठ्या आदरानं उल्लेख वगैरे करत असतात. इतर भोळ्या भाबड्या लोकांना आपल्या कळपात आणण्यासाठी सोडलेली ही मेंढरं असतात. दिसायला ही चिकणी चोपडी दिसतात. मंद मंद हसतात. सौम्य आवाजात बोलतात. सहसा उंच आवाजात बोलत नाहीत. एखादा तात्विक किंवा वैचारिक प्रश्न कुणी उपस्थित केलाच, तर त्यांच्याकडे उत्तर नसते. अशावेळी हे धर्माच्या, भोंगळ राष्ट्रवादाच्या मागे लपून आपला बचाव करून घेतात. लगेच हात जोडून शेपटी टाकून पळ काढतात. पण लोकांचा पिच्छा मात्र कधीही सोडत नाहीत. पुन्हा निर्लज्जपणे आपल्या दाराशी हात जोडून उभे होतात. पुन्हा आपलं बौद्धिक पाजळायला सुरुवात करतात. वेगळ्या शब्दात यांचा लाज, लज्जा, मान, अपमान असल्या गोष्टींशी काहीही संबंध नसतो. कोडगेपणा हाच यांचा विशेष गुणधर्म असतो.

या मानसिक रुग्णांच्या डोक्यातला देश हा माणसासाठी नसतो. यांच्या मेंदूतला धर्म माणसाच्या कामाचा नसतो. यांचा धर्म दगड, धोंडे, जनावरं यांच्यासाठी असतो. यांच्या राष्ट्र वादाच्या संकल्पनेत सर्व सामान्य माणसांची गुलामी हा यांचा मुख्य अजेंडा असतो. माणसाचं दुःख, दैन्य पाहून यांना असुरी आनंद होतो. माणसांच्या जळणाऱ्या चीता बघून यांचे चेहरे उजळून निघतात. गरिबांचा आकांत हे यांना शास्त्रीय संगीतासारखा आनंद देते. गाव जळत असताना यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. सर्वत्र मृत्यूचं तांडव चालू असताना यांचा राजा बेभान होऊन दौरे करत असतो. त्यातच त्याला असुरी आनंद मिळतो ! राजाचे भाटही दौऱ्याचा वृत्तान्त तडका मारून सादर करतात. चोवीस तास भाटगिरी करण्यासाठी यांना टोळीनं पैसे देवून खरेदी केलेलं असते.

या टोळ्यांचे संस्थापक किंवा यांचे वैचारिक बाप हे, मुळातच नीच असतात. हलकट असतात. तेच त्यांचं मेरीट असते. त्यामुळे मुख्य टोळीनं वेगवेगळ्या नावानं कितीही शाखा काढल्या तरी प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांना दुसऱ्याचे बाप उधार घ्यावे लागतात. कारण यांच्या स्वतःच्या बापाची समाजात काय इज्जत आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. मग हे इतरांच्या बापांना आपले बाप सांगून संभ्रम निर्माण करण्याची निती वापरतात. निराधार दावे करतात. धादांत खोटी विधानं करतात. बोगस इतिहासकार तयार करतात.

सद्या आपण, आपला देश या वळणार उभे आहोत ! हा देश माणसांचा असावा, तुमचा आमचा असावा, की मानसिक रुग्णांच्या हातात कायमचा देवून टाकावा, याचा निर्णय आपल्याला करायचा आहे. आणि ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे.

अशा प्रलयाच्या वेळी शहाण्या लोकांनी एकत्र यायचं की आपसात भांडत राहायचं, हे प्रामाणिकपणे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आपल्यातले त्यांचे दलाल ओळखून त्यांचा रोखठोक हिशेब करण्याची वेळ आलेली आहे..! त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची वेळ आलेली आहे ! त्यासाठी आपण स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं बोलण्याची वेळ आलेली आहे.

मात्र यापुढेही आपण आपला दुटप्पीपणा कायम ठेवला, तर पुढच्या पिढ्यांना त्याची किंमत मोजावी लगणार आहे, एवढं मात्र नक्की !

बघा.. विचार करा..
देश काही माझा एकट्याचा नाही..!

-ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *