लोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..!

आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर…!  डॉ. सुधीर कुंभार सर हे विज्ञान विषयाला जीवनाशी जोडून कृतिशील पद्धतीने विज्ञान शिकवणारा व जगणारा खराखुरा प्रयोगशील शिक्षक म्हणून सर्वपरिचित आहेत. जटानिर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, वनसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, निसर्गज्ञान असलेला सर्पमित्र व वन्यजीव मित्र आशा नानाविध भूमिका नाविन्यपूर्णरीत्या चोख बजावणारा एक बहुआयामी रयत सेवक म्हणजे डॉ. सुधीर कुंभार सर. सर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

त्यांच्याशी दैनिक लोकशक्ती ने साधलेला संवाद :

प्रविण शिंदे ( मुलाखतकार ) : सर नमस्कार..! दैनिक लोकशक्तीच्या लोकसंवाद या उपक्रमात आपले स्वागत आहे.

डॉ. सुधीर कुंभार सर : नमस्कार प्रविण सर..! धन्यवाद एका आगळ्या वेगळ्या उपक्रमात आल्याचा आनंद आहे.

प्रविण शिंदे ( मुलाखतकार ) : सर..! चला मग करूया गप्पांना सुरवात ..

डॉ. सुधीर कुंभार सर : येस..! करूया..!

मुलाखतकार : सर आपण विज्ञान जगता , हे आम्ही पाहत आलो, वाचत आलो, अनुभवले देखील तर आपणास विज्ञान विषयाची आवड कशी निर्माण झाली ?

डॉ. सुधीर कुंभार सर : विज्ञान हा विषय लहानपणापासून शिकताना शाळेमधून मिळालेली कौशल्य आणि आई वडिलांनी दिलेली चिकित्सक शिकवण याचा उपयोग विज्ञानामध्ये प्रयोग निरीक्षणे करताना होत असतो विज्ञान विषयाची आवड वेगळ्या मार्गाने लावू शकते पुस्तके वाचन शिक्षण त्याचबरोबर इतर कौशल्य देण्यात आली शाळेतून शिकवलेले आत्मसात करत असताना पाठांतरा ऐवजी पाहण्याची व करुन पाहण्याची सवय लागलेली होती. ती सगळी पुढे शालेय जीवन कॉलेज जीवनात वाढली. शिक्षकी पेशात ही सवय चालू ठेवली. विज्ञान विषय निसर्गातून त्याचबरोबर इतर परिसरातील घटना, कृती बाबीतून जर आपण शिकलो तर विज्ञान विषयाची आवड लागू शकते. घरी निरीक्षण करून प्रश्न विचारण्याची मुभा होती. खेळणी खेळ यातून सुद्धा विज्ञान विषय आवडू लागला तशी सवय मला लागली आणि विज्ञान आवडू लागले. जीवनाचं अविभाज्य भाग झाले.

मुलाखतकार : सर, एक महत्त्वाचा प्रश्न विज्ञान विषय, विज्ञान शिक्षक आणि विज्ञान शिकणारा विद्यार्थी या त्रिमिती बद्दल काय सांगाल ?

डॉ. सुधीर कुंभार सर : विज्ञान विषयी विज्ञान शिक्षक आणि विज्ञान शिकणारा विद्यार्थी या दोघांच्या मध्ये समान आहे ते म्हणजे विज्ञान. आपल्या परिसरात असणाऱ्या अनेक बाबी बदल शोधणे आणि नव्याने त्यावर विचार करणे हवे ते बदल करणे अशा बाबी वारंवार होत असतात. विज्ञान शिक्षकाला जर आवड असेल तर त्याचे विद्यार्थी आपोआपच वैज्ञानिक पद्धतीने विचार करू लागतात कृती करू लागतात; कृती आणि वैचारिक पद्धत विज्ञान विषय आवडायला सुरु करते. येत नसलेल्या गोष्टी अडचणी प्रश्न विचारून सोडवायचे असतात हे जेवढ्या लहानपणी कळेल किंवा शिक्षक समजावून देतील तेवढी विज्ञानाविषयी गोडी वाढू लागेल प्रत्येक विषयात घटनेत विज्ञान असते आणि त्याची सुरुवात घर, शाळा, समाज शिक्षणातून होते आणि तर्क करण्यातून होते. विज्ञान शिक्षकांनी चिकित्सक विचार त्याच्या मनामध्ये सतत पेरले ठेवले तर त्यांना विज्ञान वादी विद्यार्थी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी विविध पद्धती अवलंबल्या तर वैज्ञानिक दृष्टीकोन असणारी विज्ञानावर प्रेम करणारी चांगल्या कामासाठी विज्ञान वापरणारी विद्यार्थ्यांची पिढी तयार होऊ शकते. विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधली नाते प्रयोगशाळा प्रयोगशिलता याद्वारे वाढते. ते अधोरेखित करते स्पष्ट करते आणि त्यांच्यातील आणि कौशल्य यांच्या वाढीस सातत्याने जर असे विचार कृती विद्यार्थी बघत राहिला. अनेक प्रश्न विचारत राहिला तर त्याप्रमाणे कृती करायला वैज्ञानिक विचार करायला कायमच तयार होतो त्याच्या अडचणी वैज्ञानिक पद्धतीने विज्ञानाच्या शांततामय मार्गाने सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करतो.

मुलाखतकार : हे मात्र खरे आहे. सर, आश्चर्यकारक म्हणजे आपण आजपर्यंत ११० महिलांच्या जटा सोडवून त्यांच्या आयुष्यात आनंद पेरला. या जटा निर्मूलन मोहिमेविषयी काय सांगाल ?

डॉ. सुधीर कुंभार सर : जटा निर्मूलन मोहीम कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मी १२० महिलांना जटामुक्ती दिली आहे. आज मनाचा गुंता काढणे महत्वाचे आणि त्यानंतर जटा सोडविणे. जटा या अस्वच्छतेने होतात. त्या सोडवताना विज्ञानाचा वापर करावा लागतो. येथे गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित असा भाग नसतो. त्या देवाच्या देवीच्या कोपाने होतात हा गैरसमज असतो. त्यामुळे त्याला हात लावत नाहीत सोडविल्या जात नाहीत. आम्ही त्या हाताने सोडवतो अनेक कुटुंब त्यामुळे उभी राहीली. मानसिक, शारीरिक, सामाजिक, आरोग्य विषयक अनेक प्रश्न यात गुंतलेले असतात यातून मानसिक तयारी करुन हे काम करताना वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागतो.

मुलाखतकार : सर, अनेक संविधनिक मूल्ये आहेत. त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन हे संविधानिक मूल्य समाजामध्ये रुजवण्यासाठी आपण काय प्रक्रिया सुचवाल?

डॉ. सुधीर कुंभार सर : वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य रुजवायची असेल तर संविधानात दिलेल्या योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. शैक्षणिक सामाजिक राजकीय या सर्व क्षेत्रातील जाणत्या व चांगले माणसांनी या विषयावर एकत्रित पणे कार्य करणे गरजेचे आहे. जन जागृती करणे महत्वाची गोष्ट आहे. संविधानात सांगितलेले वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्य आजच्या सुरु असणाऱ्या शैक्षणिक पद्धतीने शक्य आहे; पण त्यासाठी अभ्यासक्रम करणे, पुस्तके तयार करणे, शिकवणारा शिक्षक ,संस्था आणि प्रशासकीय अधिकारी या सर्वांच्या बरोबरीने मीडिया, न्यायव्यवस्था आदी साऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित काम केले तर वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करु शकतो. पण ज्यांचे पोट विशिष्ट धर्मिक गोष्टीवर त्यातल्या अफवा आणि विश्वासावर, अंधश्रद्धेवर, गैरसमजुती वर अवलंबून आहे ती मंडळी अशा वैज्ञानिक दृष्टिकोन आणन्याला विरोध करणार हे निश्चित. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन आणण्याचा प्रयत्न यापूर्वी कित्येक वर्षे आधीच सुरू झाला आहे पण म्हणावा तसा प्रचार आणि प्रसार झाला नाही. भारतीय इतिहास पाहिला तर बुद्ध, बसवेश्वर त्याचप्रमाणे चार्वाक यांच्या विचारसरणीवर पुढे संत तुकाराम, संत कबीर , गाडगे महाराज त्याचबरोबर महात्मा फुले, रामास्वामी पेरियार, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, मानवेंद्रनाथ रॉय आणि अनेक समाज शास्त्रज्ञ यांनी प्रयत्नपपूर्वक हा भाग पुढे रेटण्याच्या दृष्टीने चळवळी निर्माण केल्या होत्या. अनेक सामाजिक सुधारणा शैक्षणिक सुधारणा करणाऱ्या संस्थानी वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. मात्र त्याला विरोध करण्याचे काम अनेक सनातनी मंडळींनी प्रारंभापासून केला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीला लावण्यासाठी समाजासमोर अनेक चांगल्या बाबी या घडत असतात. त्या समोर असताना धार्मिक श्रद्धा पसरवणाऱ्या लोकांनी या बाबी कब्जात घेऊन त्यामागे कोणतीतरी दैवी शक्ती कार्य करते आहे याचा निखालसपणे खोटा प्रचार करून लोकांच्या माथी खोट्या श्रद्धा अंधश्रद्धा मारल्या आणि विज्ञानाचा गाडा आडथळ्याच्या रस्त्यावर नेला. त्यातून समाज विकास कमी झाला. मात्र येणारी पिढी वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन चालेल असे शिक्षण देत राहिले पाहिजे.

मुलाखतकार : सर, आपण सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहात. तर समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असावी ? ती महत्वाची आहे का..?

डॉ. सुधीर कुंभार सर : समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यात शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. आमचा शिक्षकच अंधश्रद्धेत अडकलेला असेल तर त्याच्याकडून अपेक्षा करता येणार नाहीत. सूर्यग्रहणात सुद्धा घराची दारे खिडक्या बंद करून तो बसेल आणि उठून मार्गदर्शन करित असेल तर त्याच्याकडून अपेक्षा करुन चालणार नाहीत. त्या शिक्षकांनी केलेले वाचन वैज्ञानिक पद्धतीने यापूर्वी झालेले नसेल आणि होणारही नसेल तेंव्हा समजावे की हा एक शिक्षक तीस पिढ्यांना बाद करणारा असतो. जर तो नवीन पद्धतीने वैचारिक गोष्टी स्वीकारत असेल आणि कृती करताना विद्यार्थी पहात असेल आणि त्याचे अनुकरण करत असेल तर या विषयावर एक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्याच्या कुटुंबाला मदतच करु शकतो. मोठी झाल्यावर हीच मुली देशाची नागरिक होणार आहेत त्यांना शिकवणारे शिक्षक अंधश्रद्धा पळत असेतील तर त्यांची कृती विद्यार्थी पाहतील त्यावर चर्चाही करतील आणि त्यातून त्यांचा वर्तनात बदल करू शकतील. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बाबत शिक्षक जागृत नसेल तर त्याचे मानसिक आरोग्य सुव्यवस्थित नाही असे समजायला हरकत नाही. आमचा शिक्षक वैज्ञानिक चळवळीपासून दूर राहत असेल तर त्याच्या कडून बदल घडवणारी पिढी निर्माण होणे शक्य नाही. यासाठी शिक्षकांनी आपले वचन किंवा वाचलेल्या गोष्टीवर चर्चा करावी वा तज्ञांशी सल्ला-मसलत करावी. ग्रुप वरच्या अनेक पोस्ट वाचून खात्री करणे अवैज्ञानिक असेल तर थांबविणे त्यास विरोध करणे ही भुमिका असली पाहिजे. त्यावेळी निश्चितच त्याच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झालेला विद्यार्थ्यांना दिसेल. विद्यार्थीही अशा शिक्षकाचे अनुकरण चांगल्या पद्धतीने करतील आणि त्यातून चांगले सामाजिक अभिसरण शक्य होईल. आपल्या कृतीतून कोणतेही काम शिक्षकांनी समाजापुढे आदर्श म्हणून ठेवला पाहिजे. ती कृती व त्यामुळे अंधश्रद्धा पसरणार नाहीत हे त्यांनी पाहिले पाहिजे आपण पन्नास-शंभर विद्यार्थ्यापुढे असतो याचे भान त्यांना असावे.

मुलाखतकार : सर, आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असता. सध्या आपण करत असलेल्या प्रकल्पांविषयी थोडक्यात काय सांगाल ?

डॉ. सुधीर कुंभार सर : कोणताही प्रकल्प सातत्याने करा. त्यातील काही प्रकल्प म्हणजे –
• वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान पंधरवडा सलग ३० वर्षे चालवतो.
• निसर्गज्ञान साप्ताहिक भित्तिपत्रक २० वर्षे चालवतो.
• होळी बचाव आंदोलन सन १९९४ पासून
• नदी सफाई व गणेशोत्सव प्रदुषण २००० पासून
• जटा निर्मूलन १९९२ पासून
• वणवा निर्मूलन २००४ पासून
• कराड ढेबेवाडी रस्त्यावरील प्राणी पक्षी रोड किल्स २००४ पासून डाटा संग्रहण व उपाय
• २००६ पासून पर्जन्यमान मोजणे
• २००५ पासून भूजल पातळीची नोंद दर आठवड्याची एका विहिरीच्या पाण्याची ठेवत आहे.

कमीजास्त प्रतिसादाचा परिणाम आपल्यावर व उपक्रमावर होऊन देऊ नये. महत्वाचे अहवाल, फोटो काढून ठेवणे हा दस्तऐवज आपणास, समाजास व संशोधक यांना उपयोगी ठरतो.

मुलाखतकार : सर, आपले उपक्रम नावीन्यपूर्ण असेच आहेत. जाता जाता राज्यातील सर्वच विज्ञान शिक्षकांना आपण काय संदेश द्याल ?

डॉ. सुधीर कुंभार सर : विविध प्रकल्प चालवत असताना विद्यार्थ्यांना आपल्याबरोबर शिक्षकांनी घेतले पाहिजे. सतत त्यांनी विज्ञानाबद्दल बोलत राहिले पाहिजे तरच विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळेल. प्रथम काहीना मिळेल काही ना अवघड वाटेल. त्यांच्यातील वैज्ञानिक कौशल्य वाढविणे विज्ञान शिकवताना छोटे मोठे प्रयोग करून दाखवणे. एखादा प्रकल्प झाला की नाही तोपूर्ण करायला अडचणी असतील तर सोडविल्या गेल्या तर गतीने पूर्तता होते. असे करून घेतल्या गेलेल्या प्रकल्पातून तरी वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्यासाठी शुभेच्छा. मुला मुलींना येईल अशा प्रकल्प उपक्रमांची यादी सतत देणे गरजेचे आहे. आपल्याला विविध कौशल्य देऊन पुढे वाटचाल करायची असेल तर त्यांना संधी मिळेल असे छोटे पण उपयुक्त उपक्रम देणे, तयार करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी जादा खर्च करावा लागू नये हे पाहुयात. साध्या साध्या गोष्टीतून त्यांना प्रयोग करता आले पाहिजेत. त्यांची सादरीकरणे करून त्याच्या भाषेत त्याला मांडणी करता आली पाहिजे. यासाठी शिक्षकांनी पहिल्यांदा स्वतः अशा गोष्टी वैज्ञानिक पद्धतीने करून पहिल्या पाहिजेत आणि हे विद्यार्थ्यांच्या समोर मांडले गेले पाहिजे. त्यामधील चुकले असले तरी तेथील चुका शोधून त्यावर उपाय कसा योजणार हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे म्हणजे विद्यार्थी शास्त्रीय पद्धतीचा वापर करतील. आपल्या समस्या त्याला सोडवता येतील विज्ञान दैनंदिन जीवनात तो वापरायला शिकले ही सारी दृष्टी विज्ञान शिक्षक म्हणून आपण देऊ शकतो. Think Scientifically; Act Scientifically अर्थात वैज्ञानिक पद्धतीने विचार करा आणि वैज्ञानिक पद्धतीने कृती करा हा संदेश आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा..

मुलाखतकार : अप्रतिम संदेश सर..!डॉ. सुधीरजी कुंभार सर आपण लोकसंवाद या कार्यक्रमात सहभागी झालात. आपण केलेल्या कामांविषयी जाणून आम्ही थक्क झालो. एक शिक्षक विविध आयामातून किती समर्पक काम करू शकतो याची प्रचिती आली. आपला संवाद राज्यातील सर्वच शिक्षकांना खासकरून विज्ञान शिक्षकांना दिशादर्शक व प्ररेणादायी ठरेल. आपले मनःपूर्वक खूप खूप आभार..

डॉ. सुधीर कुंभार सर : धन्यवाद सर..! आणि आपलेही आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *