मानवतेला काळिमा फासणारी घटना नुकतीच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून समोर येत आहे . पोशिर येथे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे . मृतांमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवतीचा समावेश असल्याने पूर्ण तालुका सुन्न झाला आहे .
काल दि 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र श्री गणेशाच्या आगमनात व्यस्त असताना मानवी संवेदना बोथट झाल्या आहेत की काय असा प्रश्न पडावा अशी घटना कर्जत मधील पोशिर गावात घडली आहे . काल सर्वत्र गणेश उत्सवाची लगबग होती . लगबग शांत होऊन सर्व निद्राधीन असताना चार निष्पाप जीवांची या लोकीची यात्रा संपली असेच म्हणावे लागेल .
कालची लगबग संपल्या नंतर काही लोक दशक्रिया विधी करण्यासाठी पोशिर येथील नदीवर आले असताना ही घटना उघडकीस आली . सर्वात आधी एका मुलाचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले . त्यानंतर आणखी तपास केला असता एकूण तीन मृतदेह हाती आले . चौकशीअंती सदर मृतदेह हे मदन जैतु पाटील ( वय वर्ष 35 ) , अनिशा मदन पाटील ( वय वर्ष 30 ) आणि विनायक मदन पाटील ( वय वर्षे 8 ) सर्व राहणार पोशिर ता कर्जत जि रायगड यांचे असल्याचे समजले .
मूळचे बोरगाव येथील असणारे मदन पाटील हे गेली 15-16 वर्षे पोशिर येथे राहत होते . कुणाशीही वाद नसलेले आणि समजुतीने वागणारे पाटील कुटुंबीय अशा प्रकारे मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे . मृतदेह पाण्यात टाकून सदरची घटना ही आत्महत्या असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न असला तरी मृतांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असल्याने सदरचा प्रकार घातपात असण्याची जास्त शक्यता आहे . मदन पाटील यांच्या कपाळावर तर अनिशा पाटील यांच्या मानेवर खोल जखमा आढळून आल्या आहेत तर विनायक याच्या पाठीवर धारदार शस्त्रांचे वार आढळून आले आहेत . अधिक तपास नेरळ पोलीस स्टेशन येथील अधिकारी करत आहेत