लोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..!

सर्वांना नमस्कार🙏

लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत ! आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात श्रीमान अमर शर्मा यांना.. अमर शर्मा यांनी आजवर १०००० किलोमीटर सायकल राईड केलेली आहे .अमर शर्मा हे जिल्हा परिषद शिक्षक आहेत .जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धुंदी तांडा पंचायत समिती पुसद जिल्हा परिषद यवतमाळ येथे ते कार्यरत आहेत. चला तर मग ऐकूया एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला

✓ प्रविण शिंदे ( मुलाखतकार ) : सर ,आपणास सायकलिंगची आवड कशी लागली ते जाणून घ्यायला आवडेल?

अमर सर : तसे पाहिले तर मला लहानपणापासूनच सायकलिंगची आवड आहे शाळा,कॉलेज मी सायकलनेच पूर्ण केले आहे . पुढे मोठे झाल्यावर आमच्या शहरात डॉक्टर मंडळींनी मिळून एक सायकलिंग क्लब बनवला होता त्या माध्यमातून ते सायकलिंग करून इतरांनाही सायकलिंग साठी प्रेरित करत होते आणि त्याच काळातील माझ्या शाळेतील एका शिक्षकाने सायकल घेतली आणि ते अधून मधून सायकल ने शाळेत येऊ लागले ते पाहून आपणही सायकलिंग सुरू करावी असे वाटले आणि तेव्हापासून पुन्हा सायकलिंग ची आवड निर्माण झाली.

✓ प्रविण : सायकल कोणत्या वयात असताना शिकलात ? सर आपण कितीवर्षांपासून सायकल चालवत आहात ?

अमर सर : तसे पाहिले तर ५ व्या वर्गात असल्यापासून सायकल शिकलो व चालवत सुद्धा होतो,शिक्षण झाल्यानंतर १९९५ ला जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागलो शाळा आणि रूम करून राहायचो ते गाव यामध्ये ६ किलोमीटर चे अंतर होते तेव्हा दररोज सायकलनेच शाळेला जायचो जवळपास १ वर्ष सायकलिंग केली, नंतर पुढे गाडी घेतली आणि सायकल सुटली ती सरळ नंतर १ जानेवारी २०१८ लाच पुन्हा सुरू झाली सद्या तिसरे वर्ष सुरू आहे नियमितपणे सायकलिंग करत आहे.

✓ प्रविण : आपल्या सायकल राईड्स जाणून घेण्यास आवडेल !

अमर सर : मी आतापर्यंत जवळपास 10 हजार किलोमीटर सायकलिंग केली आहे पूर्वी app शिवाय सायकलिंग करायचो त्यामुळे तेव्हाचे रेकॉर्ड उपलब्ध नाही नंतर जेव्हापासून strava हे app वापरू लागलो तेव्हापासून त्यावर सर्व रेकॉर्ड उपलब्ध होते .मी आतापर्यंत 3 वेळा 100 + राईड केली आहे, दररोज सरासरी 25 किलोमीटर सायकलिंग करत असतो रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आम्ही 50 + किलोमीटर पर्यंत सायकलिंग करतो.

✓ प्रविण : सायकलिंग चे शारीरिक फायदे काय आहेत ?

अमर सर : सायकलिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे सकाळी सकाळी सायकलिंग केली की दिवसभर फ्रेश वाटते,फुफ्फुसे मजबूत होतात,वजन आटोक्यात राहते,पोटावरची,कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते,पाय मजबूत होतात,BP, शुगर,अशी कोणतीही बिमारी जवळ फटकत नाही,हृदयाची कार्यक्षमता वाढते,मणक्याचे विकार व पाठदुखीचा त्रास बंद होतो,पचनशक्ती वाढते,रक्ताभिसरण सुरळीत राहते,मास पेशी मजबूत होतात,आरोग्यदायी असल्याने आयुष्यमान वाढते,जीवनातील तणाव नष्ट होऊन आनंद वाढतो इतके सारे आणि अजून बरेच फायदे आहेत.

✓ प्रविण : सायकलिंग करणे हे शरीरासाठी हानिकारक असू शकते का ?

अमर शर्मा : व्यायाम , मग तो कोणताही असो आपल्या शरीर प्रकृती नुसार केला पाहिजे . दुसरा कोणी करत आहे म्हणून आपणही करायचा प्रयत्न केला तर निश्चितच नुकसान होते ; ही बाब सोडली तर सायकलिंग ने कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान होत नाही.

✓ प्रविण : सायकलिंग करताना कोणते नियम पाळावे लागतात ?

अमर सर : सायकलिंग मध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे हेल्मेट घातल्याशिवाय सायकलिंग करायची नाही कधीही काहीही होऊ शकते,भल्या पहाटे किंवा सायंकाळी अंधार पडल्यानंतर पुढचा आणि मागचा लाईट आणि रेडियम ची पट्टी असलेले टी शर्ट घातल्याशिवाय सायकलिंग करायची नाही,सुनसान रस्त्यावर एकट्याने सायकलिंग ला जायचे नाही,मोठ्या वाहनांच्या जास्त जवळ जायचे नाही,गावातून सायकलिंग करतांना वेगात चालवायची नाही,सोबत पाणी बॉटल,सुका खाऊ,ओळखपत्र, औषध चालु असतील तर ते सोबत ठेवावे तसेच जेल पॅन्ट ,हँड ग्लोज वापरणे उपयुक्त ठरते .थोड्या थोड्या अंतराने पाणी पिणे आवश्यक असते .अशाप्रकारे सायकलिंग करताना वरील नियम पाळणे आवश्यक आहे.

✓ प्रविण : नवीन सायकल विकत घेताना कोणती काळजी घ्यावी ?

अमर सर : इथे बजेट चा प्रश्न येतो चांगल्या ब्रँड ची सायकल 30 हजार रुपयांच्या पुढेच येते त्याखालील घ्यायची असल्यास ऍलोय फ्रेम,शिमानो चे गेयर सेट,केंडा चे टायर या बेसिक गोष्टी पाहणे आवश्यक आहे.सायकल चे तीन प्रकार जर लक्षात घ्यायचे असतील तर
१. शहरात किंवा प्लेन रोडवर सायकलिंग साठी
-रोड सायकल
२. चढ उतार, घाट रस्ते, खराब रोड साठी
-MTB माऊंटन बाईक
३. दोन्ही प्रकारचे मिक्स रस्ते असेल तर
-हायब्रीड सायकल. आपल्या गरजेनुसार आपण सायकल निवडू शकता .

✓ प्रविण : सायकल हा ट्रेंड बनू पाहत आहे ; किंबहुना सायकल हा आजच्या काळातील ट्रेंड बनला आहे . आजच्या सुपरफास्ट जीवनशैलीमध्ये सायकल ला कितपत महत्व द्यायला हवे ?

अमर शर्मा : इंधनाची वाढती किंमत, तणावपूर्ण जीवनशैली, बैठे काम, वाढते आजार, वाहनांच्या वेगामुळे होणारे अपघात यातून सुटका मिळवण्यासाठी सायकल खूप मदत करते,त्यामुळे सायकल हा जर ट्रेंड बनत असेल तर ते येणाऱ्या पिढीसाठी चांगलेच आहे.

✓ प्रविण : Cycle For Future अर्थात सायकलचा वापर आपल्याला निरोगी पर्यावरण देणार आहे ,याबाबत आपले मत काय आहे ?

अमर सर : नक्कीच वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या ओझोन लेयर ला नुकसान पोहचले आहे त्यामुळे तापमानवाढीसारख्या विविध समस्या निर्माण होत आहेत त्यांना आळा घालायचा असेल आणि निरोगी पर्यावरण पाहिजे असेल तर नक्कीच हे सायकल चालवण्यामुळे शक्य होते कारण सायकल ला कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नसल्याने प्रदूषण होतच नाही,त्यामुळे सायकल मुळे आपल्याला नक्कीच आरोग्यदायी पर्यावरण मिळणार.

✓ प्रविण : आपण या लोकसंवादच्या माध्यमातून आमच्या वाचकांना काय संदेश देऊ इच्छिता ?

अमर सर : कोरोनाने जगाला दाखवून दिले आहे की यापुढे जगायचे असेल तर निरोगी आणि शारीरिक दृष्टीने फिट राहणे आवश्यक आहे त्यासाठी आपण कोणता ना कोणता व्यायाम प्रकार करून स्वतःला फिट ठेवणे आवश्यक आहे,यासाठी सायकल आपल्याला खूप मदत करते आज सायकल घेतांना जरी आपल्याला तिची किंमत जास्त वाटली तरी एकदा आजारी पडल्यानंतर फक्त एक दिवसाच्या दवाखान्याच्या खर्चाएव्हढीच सायकलची किंमत असते .हे आपण जाणलं पाहिजे , त्यामुळे शक्य असेल त्या सर्वांनी सायकलिंग करून आपला शारीरिक व आर्थिक फायदा आणि इंधनाची बचत केल्यामुळे देशाचे चलन वाचवण्यासाठी हातभार लावावा.

✓ प्रविण : धन्यवाद सर ! नक्कीच सायकलचा वाढता वापर आपल्याला निरोगी पर्यावरण देईल हे खात्रीपूर्वक आपल्याला म्हणता येईल .आपण आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपले खूप खूप आभार…!

अमर सर : धन्यवाद मलाही आपल्याशी संवाद साधून आनंद वाटला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *