नकळत सारे घडते..!


सकाळची कामाची गडबड चालू होती. रेणुला ऑफिसला जायला उशीर होत होता. यातच वेदच्या स्कूलचीही तयारी करायची होती. या सगळ्यांमुळे रेणुची चिडचीड चालू झाली आणि ती वेदला बडबडू लागली. “एवढा मोठा घोडा झालास पण अक्कल काही वाढली नाही. या घरात कोणीही काहीही कामाचे नाही”. असे काही ना काही ती बडबडत राहिली. नकळत रागाचा पारा चढत गेला आणि सकाळी सकाळी घराचे वातावरण बिघडून गेले.

बऱ्याच वेळेला असे घडते की मुद्दामहून आपल्याला कोणाचेही मन दुखवायचे नसते किंवा कोणाचाही अपमान करायचा नसतो, पण आपल्याही नकळत ते असं घडून जातं, ते बोलणं इतकं आपसूक निघतं कि आपला आपल्यावर कंट्रोल राहत नाही आणि नंतर आपण जेव्हा शांत होतो तेव्हा जाणवतं, कि उगाच यार आपण काहिही बोलून गेलो. उगाच आपण चिडचीड केली असे सगळ्यांच्याच बाबतीत कधी ना कधी घडते.

का होते असे नेमके ? का आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. राग येणे, चिडचीड होणे ही नैसर्गिक भावना आहे. जेव्हा शरीर आणि मन ही थकते, आपल्याला असे वाटते की हि परिस्थिती आपण हाताळू शकत नाही, तेव्हा आपसूकच आपला आपल्यावरचा ताबा सुटतो आणि आपली चिडचीड चालू होते, अशा वेळी नेमके आपले काय चुकते किंवा अशी परिस्थिती कमीतकमी वेळा आपल्यासाठी निर्माण व्हावी म्हणून नेमके काय करायला हवे ? तर यासाठी मुळात ओझ्याचे गाढव होणे थांबवा.

गाढव फक्त ओझी वाहून नेण्याचे काम करते तसे घरचे , बाहेरचे , मुलांचे , दुनियेचे अशी खुप सारी ओझी एकावेळी घेणे थांबवा. कारण यात एक ना धड भाराभर चिंध्या इतकेच होते. म्हणजेच एक हि काम चांगल्या रितीने पार पडत नाही आणि फक्त स्ट्रेस लेव्हल वाढतो. एकावेळी एकच काम हाती घेतलेले बरे राहते. यामुळे कामाचा ताण हि येत नाही आणि थकवा ही जाणवत नाही.

जसा गाडीच्या स्पीडला कंट्रोल करण्यासाठी ब्रेक लावणे आवश्यक असते तसे कामाच्यामधे छोटा ब्रेक घेत राहणे ही गरजेचे आहे, यामुळे काय होईल कि हा छोटासा ब्रेक ही पुढच्या कामासाठी एनर्जी निर्माण करेल. सतत तेच रूटीन फॉलो केल्यानेही चिडचीड होते. सो, आठवड्यातून एखादा दिवस स्वतःला जे आवडते त्या गोष्टीवर घालवा किंवा निदान काही वेळ तरी स्वतःच्या आवडीच्या कामासाठी द्या. तुम्हाला चित्रे काढायला आवडतात किंवा वाचायला आवडतं किंवा फिरायला आवडतं असे काहीही जे तुमच्या आवडीचे आहे यामुळे नैसर्गिकरित्या तुम्ही खुश रहाल आणि एक्टिव्हही..

कधी कधी काय होतं कि दुसऱ्यावर निघालेला राग हा नेमका दुसऱ्या व्यक्तीवर नसतो.. तर तो स्वतःच स्वतःवरचा छुपा राग असतो. पण ते आपल्याला समजून येत नाही. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं तसंच आपण इतरांना दोष देत राहतो, किंवा परिस्थितीला दोष देत राहतो. पण मुळात आपल्याला ती परिस्थिति हाताळता येत नसते. ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी’. क्रोधाने फक्त आपण आपल्या नकळत इतरांची मने दुखावून बसतो. बाकी यातून काही निष्पन्न होत नाही. कधी ना कधी असा हा मानसिक संताप प्रत्येकाचाच होतो. त्या क्षणी ती गोष्ट कशी हाताळायची हे आपले आपणच ठरवावे लागते.

मंगेश पाडगांवकरांनी त्यांच्या एका कवितेत म्हणटले आहे .
‘सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा..
पेला अर्धा सरला आहे,
असं सुद्धा म्हणता येतं,
पेला अर्धा भरला आहे,
असं सुद्धा म्हणता येतं,
सरला आहे म्हणायचं की,
भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा..
सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत की गाणं म्हणत..
तुम्हीच ठरवा’
सो गाइज कुल रहा, हसत रहा आणि इतरांनाही हसवत रहा..

पल्लवी माने, डेनवर, अमेरिका


3 Comments

  1. काय अप्रतिम विषय आहे. हे असे घडते.. छान लिहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *