कळसुबाईवर महिलांना प्रवेशबंदीचा ‘तो’ फलक अखेर हटवला; पण लावला कोणी ?…………

आशिष कुडके :- अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई (सर करणे ही ट्रॅकर्ससाठी खूप आनंदाची गोष्ट असते. हिवाळा, उन्हाळा असो किंवा पावसाळा तिन्ही ऋतुंमध्ये ट्रेकर्सची पावलं भटकंतीसाठी फिरत असतात. गड-किल्ल्यांवरुन दिसणारे निसर्गाचे सुंदर रूप डोळ्यात साठवण्यासाठी ट्रेकर्स अतिशय मेहनतीने गड-किल्ले सर करतात.

मात्र, अलीकडेच महिला ट्रेकर्सच्या भावना दुखावणारा एक प्रसंग समोर आला आहे. कळसूबाईच्या शिखराजवळ महिलांना प्रवेशबंदीचा फलक लावण्यात आला होता. या फलकावरुन अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मात्र ग्रामस्थांनी हा फलक काढला आहे. मात्र, हा फलक कळसुबाईवर कोणी लावला, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

अहमदनगर जिल्ह्यात असलेले कळसुबाई शिखर सर करण्यासाठी हजारो पर्यटक येतात. कळसुबाई शिखरावर देवीचे एक मंदिरदेखील आहे. त्यामुळं स्थानिकांसाठी हा आस्थेचा विषय देखील आहे. या शिखरावर नेहमी येणारे अकोले तालुक्यातील गिर्यारोहक राहुल भांगरे यांनी एक खळबळजनक गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ते कळसुबाईवर आले असताना त्यांना एक आक्षेपार्ह फलक दिसला. त्यावरील सूचना ऐकून ते अस्वस्थ झाले. 

घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात प्रवेश करु नये, अशा सूचना लिहलेला एक फलक सुळक्याच्या पायथ्याला लावण्यात आला होता. राहुल भांगरे यांनी या फलकाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसंच, हा प्रकार चुकीचा असल्याचेही त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं होतं. राज्य महिला आयोगानेही या फलकाची दखल घेतली होती. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करुन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 

वादग्रस्त फलकावरुन वादंग झाल्याने ग्रामस्थांनीच हा फलक काढला आहे. मात्र हा फलक तिथे कोणी लावला? हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. गावकऱ्यांनीही हा फलक लावला नसल्याचे सांगण्यात येतेय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *