लोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची

गळफास त्यानेही घेतला
गळफास यानेही घेतला
जीवानिशी तो ही गेला
अन् जीवानिशी हा ही गेला

हा बांधावरच्या बाभळीला
दोरीने लटकून मेला
तो कोटींच्या फ्लॅटमध्ये
ओढणीला टांगून गेला

तो लाखो चाहत्यांसाठी होता
फिल्मी पडद्यावरचा हिरो
हा मात्र सामान्य शेतकरी
म्हणून ठरतो कायमच झिरो

त्याची आत्महत्या देशासाठी
अत्यंत महत्त्वाचा विषय आहे
याची आत्महत्या जगासाठी
मात्र दुर्लक्षित आशय आहे

तिकडे कायम पैसा, प्रसिद्धी
लाईम लाईट नि ग्लॅमर
इकडे मात्र रात्रंदिवस कष्ट
तरी जगण्यासाठीची मरमर

तिकडे ड्रग्ज, व्यसन, अफैर्स
अन् शौकही असतात हजारो
इकडे बायकोसाठी नवरा म्हणजे
सात जन्माचा असतो हिरो

तिकडच्या आत्महत्येला तर
ED, NCB, CBI नि सगळे
इकडे आत्महत्ये नंतर
पंचनाम्यास तलाठीही ना मिळे

तिकडे आत्महत्ये नंतर त्यांची
कोटींची प्रॉपर्टी क्षुल्लक आहे
इकडे आत्महत्या नंतरही याचा
कर्जाचा बोजा शिल्लक आहे

तिकडची आत्महत्या म्हणजे
बातमीला टी.आर.पी.ची साथ
शेतकरी आत्महत्या वेळी यांचा
नाक कान डोळ्यांवर हात

त्याच्यासाठी राज्या साहित
केंद्र सरकारही ऍक्शनमध्ये येतं
याच्यासाठी सांगा बरं कधी
कोणतं सरकार गंभीर होतं..?

आता तुम्हीच सांगा आत्मचिंतन
नेमकं कुणी करायला हवं…?
मीडिया, नेते अन् लोकांनी नेमकं
कोणाला किती महत्व द्यावं…?

– श्री. कुणाल मु. पवार,  ९४०३५८९९७०
मु. पो. लोंढवे ता. अमळनेर जि. जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published.