
असं काही सांगा.. ज्यावर
खरंच विश्वास बसेल
स्वातंत्र्याचा मुक्काम सांगा
हल्ली कुठं असेल ?
‘भगतसिंग’वाल्या गोळीत
रेशनवाल्या पोळीत
दिवा नसलेल्या घरात
की.. वंचितांच्या स्वरात ?
कष्टकऱ्यांच्या घामात
‘शबरी’वाल्या ‘रामा’त
फांदीवर लटकणाऱ्या प्रेतात
की.. डुकरं घुसलेल्या शेतात ?
‘बापू’च्या प्रसिद्ध चरख्यात
आपल्यासोबत परक्यात
विद्यार्थ्यांच्या नव्या चळवळीत
की.. ‘भीमरावा’च्या जुन्या तळमळीत ?
कुठं असेल स्वातंत्र्याचा कॅम्प
की.. ‘कोरंटाईन’वाला स्टॅम्प ?
भेदरलेल्या ‘मुंग्यां’च्या बिळात
की.. ‘सापां’च्या खानदानी पिळात ?
सांगा कुणी पाहिलं का स्वातंत्र्याचं घर
किंवा त्याचा आनंदानं गुणगुणारा स्वर
ऐकल्याच्या, पाहिल्याच्या काहीतरी टिप्स
किंवा त्याच्या रडण्याच्या केविलवाण्या क्लिप्स ?
दंग्यामधे, तिरंग्यामध्ये
किंवा कुठं दिसेल..?
स्वातंत्र्याचा मुक्काम सांगा
नेमका कुठं असेल ?
– ज्ञानेश वाकुडकर, नागपूर
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!