संवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी

करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे।।

या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या संस्काराचा नंदादीप असंख्य मुलांच्या यशस्वी जीवनाचा मार्ग उजळून टाकतो आहे आणि ज्यांनी मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र ‘श्यामची आई’ हा ग्रंथ रचला त्या ग्रंथाचे रचनाकार साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांचा काल जन्मदिन होता. 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजी यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. माता यशोदा आणि पिता सदाशिव यांच्या संस्काररूपी अखंड अमृताच्या झऱ्यातील अमृत प्राशन करत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या जीवनाची अमृतवेल फुलवली आणि त्याच वेलीला लागलेल्या फुलांच्या सुगंधाचा दरवळ आज साऱ्या जगात पसरलेला असताना साने गुरुजींचे जीवन अवघ्या जगाला मार्गदर्शन करणारे एक आदर्श संस्काराचे विद्यापीठ झाले आहे, याबाबत कुणाचेही दुमत नाही. आई माझा गुरू, आई कल्पतरू हेच सूत्र साने गुरुजी यांनी आयुष्यभर जपले. त्यांचे पूर्ण आयुष्यच आईच्या चरणी वाहिलेले होते. त्यांच्या जीवनाची पूर्ण इमारत आईच्या भक्कम संस्काराच्या पायावर उभी होती आणि हा संस्काराचा अमूल्य व कधीही न संपणारा ठेवा हे अमृतकण त्यांनी ‘श्यामची आई’ या ग्रंथाच्या रूपाने आपणासही प्राशन करता यावेत यासाठी निर्माण केला आहे.

नाशिकच्या तुरुंगात असताना 1933 सालच्या 9 ते 13 फेब्रुवारी या अवघ्या पाच दिवसांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात आईचा महिमा अनन्यसाधारणपणे अधोरेखित केलेला आहे. सावित्री व्रत या पहिल्याच कथेमधून कोणतेही चांगले काम करताना लाज वाटायला नको ही शिकवण श्यामने अंगीकारली. या व अशा एकूण 42 कथांमधून विविध संस्कारांचे महान शब्दचित्र अतिशय संवेदनशीलतेने साने गुरुजींनी लेखणीबद्ध केलेले आहे. कादंबºया, काव्य, निबंध, लेख, मासिके, साप्ताहिके इ. साहित्याच्या विविध माध्यमांद्वारे समाजोद्धार करण्याचे व्रत साने गुरुजींनी आयुष्यभर जपले. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराला घाण लागू नये म्हणून प्रयत्न करतो त्याच पद्धतीने आपले मनही निर्मळ असले पाहिजे हा सुंदर विचारही आपणास या ग्रंथामधून वाचावयास मिळतो. कोणतेही काम नीटनेटके करावे, मग ते करताना वेळ लागला तरी चालेल; मात्र ते करताना घाई करू नये आणि आपल्या कार्यातून विश्वाचे कल्याण व्हावे असे विश्वात्मक विचारही आपणास या कथांमधून मिळतात.

आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये, मग ते शिक्षण घेत असताना येणाऱ्या अनंत अडचणी असोत किंवा म. गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन केलेले स्वातंत्र्य चळवळीतील कार्य असो, आपली कर्मभूमी असलेल्या खान्देशामधील जनतेला जागृत करण्यासाठी केलेले अखंड प्रयत्न असोत किंवा पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर दीनदलितांसांठी खुले व्हावे यासाठी त्यांनी केलेले आमारण उपोषण असो, या सर्व संघर्षमय कालखंडात अतिशय संवेदनशील मन असतानाही मनाचा कणखरपणा, निग्रह, तेजस्वी वृत्ती आणि प्रखर देशाभिमान या सद्गुणांचा समुच्चयही आपणास साने गुरुजी यांच्यामध्ये दिसून येतो. धुळ्याच्या कारागृहात असताना ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या ओळी असलेली खरा धर्म ही महान कविता असो, म. गांधींच्या दांडीयात्रेच्या पे्ररणेतून शब्दरूपाने प्रगटलेली ‘स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई, सुखवू प्रियतम भारतमाई’ किंवा बुडालेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था शासनाला कळावी यासाठी साने गुरुजींनीच लिहिलेले त्वेषपूर्ण गीत म्हणजे ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कामकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’ अशी अनेक गीते सर्वसामान्य जनतेच्या तोंडी मुखोद्गत होती. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या समाजाची होत असलेली दुरवस्था पाहून साने गुरुजींचे हृदय विदिर्ण होत असे.

अशाच एका मनाच्या विषण्ण अवस्थेत साने गुरुजींनी आपले जीवन चिरनिद्रेच्या स्वाधीन केले तो दिवस होता 11 जून 1950. साने गुरुजी देवाघरी गेले, मात्र जाता-जाता आपल्या आदर्श आयुष्याद्वारे येणाºया सर्व पिढ्यांसाठी अखंड मार्गदर्शक ठरणारे एक संस्काराचे आदर्श विद्यापीठ निर्माण करून गेले. आचार्य विनोबा भावे यांनी साने गुरुजी यांचे वर्णन ‘अमृतस्य पुत्र’ असे केले होते. साने गुरुजींच्या जन्मदिनी त्यांना माझे शतश: विनम्र अभिवादन.

– सौ. अमृता साठे, दापोली

Leave a Reply

Your email address will not be published.