उद्धव ठाकरेंची धडपड मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठीच ??
सभेत भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची वास्तवात भाजपशी लुटूपुटूची लढाई ??

मुंबई :- राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार , प्रत्यारोप आणि जगावाटपाची रणधुमाळी सुरू आहे . महायुती असो वा महाविकासआघाडी प्रत्येक घटकपक्ष हा जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन आपलाच पक्ष कसा वाढेल आणि निवडणूक पश्चात परिस्थिती मध्ये आपलाच भाव कसा वधारेल यावर लक्ष ठेऊन आहे . वरकरणी आकांडतांडव वाटत असला तरी निरीक्षण केले असता लुटूपुटूची लढाई आणि नुरा कुस्तीच दिसून येते हे सुज्ञ मतदार समजू शकतो . राज्याच्या राजकारण वर्तुळात भाजप आणि शिवसेना वगळता सर्वात चर्चेचा विषय ठरणारा पक्ष म्हणजे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) . याच पक्षाची एकूण राजकीय व्यूहरचना काय हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न .

भारतीय राजकारणाची एकंदर परिस्थिती पाहता शिवसेना (उबाठा गट) एकदम केंद्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावेल अशी परिस्थिती सध्या तरी नाही . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार खासदारांनी बंड पुकारल्या नंतर पक्षाची ताकद विभागली जाऊन क्षीण झाली आहे . सेना भाजप युती मध्ये तत्कालीन शिवसेना ही छोट्या भावाच्या भूमिकेत होती परंतु महाविकास आघाडी चा विचार करता १ खासदार असणारी काँग्रेस आणि 2 खासदार असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पाहता सर्व महत्व आणि लक्ष्य वेधून घेत शिवसेना ( उबाठा गट) हाच मोठा भाऊ आहे ने निर्विवाद पणे इतर दोन पक्षांनी मान्य केल्याचे सध्या तरी दिसते आहे . शिवसेना ( उबाठा गट ) ह्यांची २०२४ ची रणनिती समजून घेण्यासाठी आधी अविभाजीत शिवसेना २०१९ मध्ये काय स्थितीत होती ते समजावून घेणे गरजेचे . २०१९ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढवल्या होत्या एकूण २१ जागा .

मतदारसंघनिहाय उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे –

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन कीर्तीकर

4) ठाणे – राजन विचारे

5) कल्याण – श्रीकांत शिंदे

6) कोल्हापूर – संजय मंडलिक

7) हातकणंगले – धैर्यशील माने

8) नाशिक – हेमंत गोडसे

9) शिर्डी – सदाशिव लोखंडे

10) शिरूर- शिवाजीराव आढळराव-पाटील

11) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे

12) बुलढाणा – प्रतापराव जाधव

13) रामटेक – कृपाल तुमाणे

14) अमरावती – आनंदराव अडसूळ

15) परभणी- संजय जाधव

16) मावळ – श्रीरंग बारणे

17) उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर

18) हिंगोली – हेमंत पाटील

19) यवतमाळ – भावना गवळी

20) रायगड – अनंत गीते

21) सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत

या २१ जागांपैकी शिरूर , औरंगाबाद ( आता छत्रपती संभाजीनगर ) आणि रायगड या तीन ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आणि एकूण १८ खासदार निवडून आले , परंतु त्यावेळी सेना-भाजप युती होती आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त नावाने मतदारांनी कौल दिला होता हे लक्षात ठेवायला हवे . पराभूत उमेदवारांपैकी

  • औरंगाबाद – चंद्रकांत खैरे यांचा MIM कडून
  • शिरूर – शिवाजीराव आढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून
  • रायगड – अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून

असा निकाल होता . औरंगाबाद मध्ये रावसाहेब दानवे यांच्या जावयाने बंडखोरी केल्याने आणि दानवेंनी त्यांना छुपी मदत केल्यानेच ती जागा गेली असा तत्कालीन शिवसेनेचे नेते उघड सांगत होते . असो आता २०२४ मध्येही शिवसेना ( उबाठा ) गटाने २१ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत . ते पुढीलप्रमाणे

शिवसेना ( उबाठा ) गटाचे उमेदवार कोण

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ
३) संजोग वाघेरे-पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टीकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाई वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) संजय दिना पाटील-मुंबई-ईशान्य
१४) अरविंद सावंत-मुंबई-दक्षिण
१५) अमोल किर्तीकर-मुंबई-वायव्य
१६) अनिल देसाई-मुंबई, दक्षिण मध्य
१७) संजय जाधव-परभणी
१८) वैशाली दरेकर-कल्याण
१९)सत्यजीत पाटील-हातकणंगले
२०) करण पवार-जळगाव
२१) भारती कामडी-पालघर

२०१९ मधली अविभक्त शिवसेना आणि आता शिवसेना ( उबाठा ) गट असतानाही एकूण लढवल्या जाणाऱ्या जागांची संख्या समान असली तरी काही जागांची अदलाबदल झालेली दिसून येते . २०१९ मध्ये लढवलेल्या २१ जागांपैकी

  • रामटेक
  • कोल्हापूर
  • शिरूर

हे तीन मतदारसंघ उबाठा गटाने आघाडी धर्म पाळत सोडले आहेत , परंतु त्या बदल्यात

  • सांगली
  • जळगाव
  • ईशान्य मुंबई

ह्या तीन जागांची मागणी करत आपली २१ ही संख्या कायम ठेवण्याचे शिवसेना ( उबाठा) जाहीर केले आहे . शिवसेना ( उबाठा ) गटाचे जे उमेदवार जाहीर केले त्याचे विश्लेषण केले असता २१ जागांपैकी १४ ठिकाणी विरोधी उमेदवार जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे . १४ पैकी

  • ३ जागांवर भाजप सोबत
  • २ जागांवर अजित पवार गटसोबत
  • १ ठिकाणी रासप चे महादेव जानकर
  • ८ ठिकाणी शिवसेना ( शिंदे गट )

अशी लढत होण्याची शक्यता सध्यातरी वाटते . सांगली ही काँग्रेस ची पारंपरिक जागा मागून आणि ती प्रतिष्ठेची करून नेमकं काय साध्य करायचे आहे ते कळण्यास मार्ग नाही . जी अवस्था सांगली ची तीच अवस्था ईशान्य मुंबई ची . ज्या जागेवर संजय दिना पाटील राष्ट्रवादी च्या तिकिटावर सलग दोन वेळा अगदी अडीच लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले तोच उमेदवार पक्षात घेऊन तिथे उमेदवारी जाहीर करण्याच कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे .

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजप हे मोदी सरकार वर कितीही तोंडसुख घेत असले तरी वास्तवात निवडणूकित त्यांचा संघर्ष फार कमी जागांवर होणार आहे . जळगाव , दक्षिण मुंबई आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग वगळता इतर जागी ही लढत मैत्रीपूर्णच असणार आहे यात शंका नाही . एकंदर पाहता आपल्या ज्या २०१९ च्या जागा आहेत तिथे शिवसेनेशी लढत देऊन ताकद दाखवायची , मुंबईत काँग्रेस साठी एकही जागा सोडायची नाही उलट काँग्रेस च्या पारंपरिक जागेवर हक्क सांगून काँग्रेस ची जागा कमी करायची असाच एकंदर शिवसेना ( उबाठा ) गटाचा नूर दिसतो आहे .

भाजपची भूमिका काय ?

आज अखेर भाजप ने २४ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत त्यापैकी १९ ठिकाणी विरोधी उमेदवार जाहीर झाल्याने लढतीचे चित्र स्पष्ट आहे .

  • ११ ठिकाणी काँग्रेस
  • ५ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )
  • ३ ठिकाणी शिवसेना ( उबाठा )

अशी लढत होणार आहे . २०१९ ला २५ जागा लढवून २३ ठिकाणी विजय प्राप्त केलेला भाजप २०२४ मध्ये २८-२९ जागा लढवत आहे . काँग्रेस चे फारसे आव्हान आहे असे भाजप मानताना दिसत नाही . अटीतटीच्या ठरणाऱ्या ३ जागा जरी हातून गेल्या तरी २०१९ च्या २३ खासदारांच्या संख्येला धक्का पोहोचत नाही . विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) यांची गळचेपी करून ती जागा भरून काढण्याची संधी शिवसेना ( उबाठा ) गटाला द्यायची . शिवसेना आणि शिवसेना ( उबाठा ) ह्या दोघांत जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरस ठरले तर ते तर उघड युतीमध्ये आहेतच आणि जर काटे उलटे फिरले तरी विरोधीपक्ष म्हणून काँग्रेस पेक्षा शिवसेना ( उबाठा ) गट सारखा प्रादेशिक पक्ष कधीही परवडला . लोकसभेत जर अपेक्षित निकाल नाही आला तर विधानसभेला आपोआपच मुख्यमंत्री शिंदेंची ” Bargaining Power ” कमी होणार .

अर्थात हे सर्व कागदावरचे आडाखे..राजकारणाच्या आखाड्यात कोण कुणाला धोबीपछाड देणार हे मतमोजणीच्या नंतरच कळेल….आणि लोकशाहीच्या सौंदर्य घटकांपैकीच ते एक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *