लोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..ही धन्य सावित्री बाई sss
हा हा हा हा..
ही धन्य सावित्री बाई..
आमुची आई
वेगळी माय
रोवूनी पाय
कोटी समुदाय
सज्ज झाला..
उभे आभाळ पेलण्याला..
रं जी जी जी..!!धृ!!

ही माय वेगळी न्यारी
युगांना भारी
बघा दिलदारी
सोडूनी जात – पात, घरदार
कराया महिलांचा उद्धार
खोलले ज्ञानाचे भंडार
सनातनी करती वारावर वार..
जी जी जी जी..||१||

लाभले जोतिबा गुरू
हा हा हा हा..
लाभले जोतिबा गुरू
लढाई सुरू..
जिंकू वा मरू
झेलले दगड, झेलली घाण
पेलण्या वर्णवादी आव्हान
कराया समतेचा सन्मान
माय सावित्री आमुचा प्राण
जी जी जी जी ||२||

इतिहास बदलला काळा
हो ss जी जी
काढली शेतकी शाळा
हो ss जी जी
अन् मंत्र मुक्तीचा दिला
हो ss जी जी
त्या वंदन सावित्रीला
हो ss जी जी !
पेटू दे वात
संपू दे रात
आपुल्या आत
जाग येवो
.. थेट सावित्री जन्म घेवो
रं .. जी जी जी जी ||३||

– ज्ञानेश वाकुडकर, नागपूर 

Leave a Reply

Your email address will not be published.