हिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..!

संत, विचारवंत, साहित्यिक, महापुरुष किंवा उदारमतवादी राजकीय नेते एखाद्या विषयाची मानवतावादी, समतावादी मांडणी करतात. त्यासाठी काही शब्दांना व्यापक अर्थ प्रदान करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असतो. त्यामागील संदर्भ आणि हेतू समजून समाजानं पुढील वाटचाल करावी, हा उदात्त हेतू त्यामागे असतो. उदा. हे विश्वची माझे घर, सबै भूमी गोपालकी वगैरे. मात्र व्यवहार आणि कायद्यात ह्या गोष्टी जसच्या तशा चालत नसतात. मात्र तेवढ्याने त्यांचं महत्त्व कुठेही कमी होत नाही. कारण त्यामागील हेतू उद्दात्त असतो.

याउलट परिस्थिती हल्ली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बघायला मिळते. सोयीची मांडणी करणं, भोंगळ व्याख्या करणं, हा बऱ्याच नेत्यांचा छंद असतो. काहींचं तर तेवढंच भांडवल असते. अर्थात त्यामागे शुद्ध स्वार्थ असल्यामुळे ती मांडणी विश्वासार्ह रहात नाही.

ही काही उदाहरणं बघू या..
• ‘जो शेती करतो तो कुणबी
– हेच सूत्र जर आपण व्यवहारात किंवा कायद्याच्या बाबतीत मान्य केलं तर कसा गोंधळ होईल बघा. माळी, तेली ह्या लोकांचा देखील शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मग ह्यांना पण कायद्याच्या भाषेत कुणबी म्हणता येईल का ? अशी फसवी मांडणी खरंच शहाणपणाची आहे का ?

• ‘जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा
– ह्याच न्यायानं महाराष्ट्रातील एससी, एसटी, आदिवासी, ब्राम्हण वगैरे सारेच मराठा समजायचे का ? मग बिहारी, साऊथ वाले यांच्या विरोधात आंदोलन कोणत्या आधारावर केले जाते ?

• ‘जो मराठी बोलतो तो मराठा’
– ही आणखी एक निरर्थक आणि भोंगळ व्याख्या. निरर्थक डायलॉगबाजीचा हा उत्कृष्ट नमुना ! मराठी मातृभाषा अनेक समाजातील लोकांची असते.

• ‘मराठे आणि कुणबी एकच..
कारण मराठे आणि कुणब्यांच्या आपसात सोयरिकी देखील झाल्या आहेत’
– अशी मोजकी आणि अपवादात्मक उदाहरणं घेवून जर जातीचा निकष ठरवला गेला, तर मग ब्राह्मण ही जात जगातून केव्हाच नष्ट झाली आहे, असं मानावं लागेल. कारण ब्राम्हण समाजातील मुली तर असंख्य वेगवेगळ्या जातीतील मुलांशी लग्न करतात. आणि ती संख्या इतर सर्व जातीपेक्षा प्रचंड मोठी आहे.

• ‘हिंदुस्तानात राहतो तो हिंदू
– हे जर खरं आहे, तर हिंदू खतरेमे है.. वगैरे कशासाठी ? मागासवर्गीयांना मंदिरात प्रवेश का नाही ? त्यांना पूजेचा अधिकार का नाही ?

तात्पर्य काय,
हल्ली जी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आघाडीवर गोंधळाची स्थिती आहे, त्यातून बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला ह्या असल्या निरर्थक भूलभुलैया तून बाहेर यावं लागेल. वैचारिक गुलामगिरी सोडावी लागेल. नेते, महापुरुष यांची आंधळी भक्ती सोडावी लागेल. कोणतीही जात, कोणताही धर्म यांच्या बद्दलचा आकस, द्वेष मनातून काढून टाकावा लागेल. चोराला चोराला चोर म्हण्याची हिम्मत दाखवावी लागेल. वास्तव तटस्थपणे समजून घ्यावं लागेल. निरपेक्षपणे त्यावर चिंतन करावं लागेल. व्यावहारिक अडचणी किंवा उपलब्ध पर्याय यांचाही सांगोपांग विचार करावा लागेल. मार्ग काढण्यासाठी प्रामाणिक भूमिका घ्यावी लागेल. उगाच मखलाशी करून, बनवाबनवी करून हाती काहीही लागणार नाही.

‘सर्व समावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता..’ हे सूत्र घेवूनच यानंतर आपल्याला पुढं जाता येईल. हा देश तुमच्या किंवा माझ्या असा कुणाच्याही बापाचा नाही, हे आधी समजून घ्यावं लागेल. शेतकरी असो..कर्मचारी असो, गरीब असो..श्रीमंत असो, शहर असो..खेडे असो, नेते असोत की कार्यकर्ते असोत.. सर्वांचा या देशावर सारखाच हक्क आहे. प्रत्येकाला त्याच्या संखेइतका वाटा दिला गेला पाहिजे, हे सूत्र आपल्याला मान्य करावंच लागेल. हीच यापुढील खरी लढाई असणार आहे. कुणीही भ्रमात राहू नये..! कुणाचीही चालबाजी आता फार काळ चालणार नाही !

झालं गेलं विसरून जाऊ या ! झालेल्या चुका मान्य करू या ! त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू या ! संघर्ष टाळू या ! हिटलर सारखे मातीमोल झालेत, तिथं तुम्ही आम्ही कोण आहोत ?

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *