विमानात पुरवणार वाय – फाय ची सुविधा
मुंबई : विमानात वायफाय सेवा पुरवण्यास भारत सरकारने परवानगी दिली असून हा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. २१ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार प्रवाशांना विमानात बसल्यानंतर वायफाय सेवेच्या माध्यमातून इंटरनेट साधने वापरता येतील.
विमानाचा प्रमुख वैमानिक हा प्रवाशांना इंटरनेट सेवा यापुढे उपलब्ध करून देऊ शकतो. ही सेवा वाय फाय ऑन बोर्ड पद्धतीची असून त्यावर लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, ई रीडर व पॉइंट ऑफ सेल मशीन चालू शकतात. त्यामुळे प्रवासी विमानातील खाद्यपदार्थ किंवा इतर काही वस्तूंचे पैसे तेथेच डेबिट क्रेडिट कार्डने अदा करू शकतील.
विस्तारा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली थँग यांनी बोइंग ७८७—९ या वायफाय सेवा असलेल्या विमानाची खरेदी स्वीकारली, तेव्हा त्यांनी सांगितले,की हे वायफाय सेवा असलेले पहिले विमान भारतात उपलब्ध झाले आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या प्रमाणनानंतर ही वायफाय इंटरनेट सेवा वापरता येईल, त्यासाठी प्रक्रिया निश्चित केली आहे. विमानाची सर्व दारे बंद झाल्यानंतर वैमानिक त्याच्या कळफलकावरून ही सेवा सुरू करून देईल. विमानाची दारे विमानतळावर आल्यानंतर उघडली जातील तेव्हा ही सेवा बंद केली जाईल.
भारतीय हवाई क्षेत्रात वायफाय सेवा विमानात देण्यात यावी अशी सूचना भारतीय दूरसंचार नियामकांनी २०१८ मध्ये केली होती. त्यानुसार हा निर्णयम् घेण्यात आला असून भारतीय विमानांमध्ये वायफाय सुविधा नसल्याने परदेशी विमानात ती सोय असूनही त्यांना भारतीय हवाई क्षेत्रात आल्यानंतर वायफाय सेवा बंद ठेवावी लागत होती