ठाणे : प्रतिनिधी
सोळाव्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून सुरू होईल. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणं, गटाची विभागणी, घर यादी तयार करणं आदी कामे करण्यात येतील.
या कामासाठी शिक्षकांसह इतर सरकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही नेमणूक करताना शहरी भागात अधिकचा कर्मचारी वर्ग लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना सरसकट आदेश काढले जातात. हे आदेश काढले जात असताना गरोदर स्त्रिया , ५२ वर्षावरील तसेच दुर्धर आजाराने पिडीत कर्मचारी यांना जणगणनेतून वगळणे नियमाला धरून असल्याने त्यांना यातून वगळावे , अशी मागणी मराठी माती प्रतिष्ठानचे प्राजक्त झावरे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शिक्षक कर्मचारी कोणतेही काम उत्तम रीतीने करून पूर्णत्वास नेत असतात. त्यामुळे त्यांना काम देण्याचा प्रशासनाचा आग्रह असतो, परंतु हे करत असताना वरील कर्मचारी यांना यातून वगळावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.