नवी दिल्ली : दिल्लीत आज भाजपची संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळी दिल्ली हिंसाचाराचा थेट उल्लेख टाळला. पण ते भावुक झाल्याचं दिसून आलं. ‘सबका साथ’ ‘सबका विकास’च्या सोबतच ‘सबका विश्वास’पण गरजेचा आहे. माझ्यासाठी पहिला देश आहे आणि त्यानंतर पक्ष आहे. देशात शांतता आणि एकता गरजेची असल्याचं मोदी म्हणाले.
दिल्लीत उसळलेल्या दंगलीमुळं परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय. या हिंसाचारातील मृतांची संख्या ही ४० च्या वर गेलीय. या हिंसाराचे पडसाद संसदेतही उमटलेत. विरोधी पक्षांनी सरकारला घेरलंय. येत्या रविवारपासून सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतोय. फेसबुक,ट्विटर,इन्स्टाग्राम आणि यू ट्यूब अकाउंट्स बंद करण्याचा विचार आहे, असं मोदींनी सोमवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर मोदींनी संसदीय मंडळाच्या बैठकीत केलेल्या वक्तव्याला महत्त्व आलंय.
पहिलं प्राधान्य देशाला आहे. विकास करणं हा भाजपचा मंत्र आहे. यासाठी देशात शांतता, एकता आणि सद्भावना आवश्यक आहे. या संगळ्यांसोबतच देशाच्या विकासाला चालना द्यायची आहे, असं मोदी यांनी या संसदीय बैठकीत मंडळाच्या बैठकीत स्पष्ट केलं. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी ठेवायचं नाही. तर प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावनेसाठी पुढाकार घ्यायचा आहे. आधी देश की पक्ष? असा प्रश्न या आधीही उपस्थित झाला होता. त्यावेळी ‘वंदे मातरमला’ नाकारलं होतं. तेव्हा सारखचं आताही देशाहिताला प्रधान्य देऊन ‘भारत माता की जय’ च्या नाऱ्याला मुद्दा बनवण्याचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर सांगितलं.