मुंबई : ‘तारक मेहता का उलटा’ चष्मा मालिकेतील मुंबईची भाषा हिंदी या संवादावरुन चांगलच राजकारण गाजलं होतं. मालिकेतील संवादाला आक्षेप घेत मनसेने वाहिनीकडून माफीची मागणी केली. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी यायला लागल्यानंतर, मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपण सर्व भाषांचा सन्मान करतो असं स्पष्टीकरण दिलं.
यानंतर मालिकेत ‘बापुजी’ हे पात्र साकारणारे कलाकाम अमित भट यांनीही याप्रकरणात माफी मागितली आहे. अमित भट यांनी मनसेच्या नावाने मराठीमध्ये पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. मला स्क्रिप्टमध्ये लिहून देण्यात आलेला संवाद मी कॅमेऱ्यासमोर बोललो…मुंबईची भाषा ही हिंदी नसून मराठी आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दांत अमित भट यांनी माफी मागितली आहे.
नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. प्रसारित झालेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान…बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या भूमिकेवर आक्षेप घेतला असून, याप्रकरणी वाहिनीने वेळेत माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी…आपल्या ट्विटर अकाऊंटवरमुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटते असं मत मांडलं होतं.