हे अयोध्यापते, सितापते, प्रभू रामचंद्रा !
५ ऑगस्टला तुझ्या मंदिराचा शिलाण्यास होतो आहे ! पण मला कळत नाही, तुझं अभिनंदन करू की मौन राहू ? मला खरंच कळत नाही की काही लोकांच्या इशाऱ्यावर पेटवलेल्या पणत्यांचा उजेड बघून आनंदित होऊ, की कोरोनामुळे लाखो घरात पसरलेला अंधार बघून दु:खी होऊ ! उद्या अवती भवती लाखो चुली उपाशी असतांना त्याचवेळी बाजूला असंख्य दिवेही लावले जातील..! तेव्हा तुला नेमकं कसं वाटेल रे ! देवा.. उपाशी पोटी झोपणारी दुर्दैवी पोरंही तुझीच आणि दिव्यासाठी लाखो लिटर तेल वाया घालवणारी पोरंही तुझीच ! माहीत नाही त्यामागं खरंच तुझ्याबद्दलचं प्रेम असेल की राजकीय दहशत ? मला माहित नाही, तुला त्यामुळे आनंद होईल की दुःख ! पण प्रभू, तू तर देवच आहेस ना ? ( तुझ्याकडे आधार कार्ड असेल, नसेल तो मुद्दा महत्त्वाचा नाही..) म्हणजे निदान आपला भारत तरी सद्या ‘रामभरोसे’ चालतो आहे, हे तर तुला माहितच असेल ना ?
देवा, या घाई गडबडीच्या वेळी मी तुझा जास्त वेळ घेणार नाही ! पण अस्वस्थ करणारे काही प्रश्न मला त्रास देताहेत. राहवत नाही म्हणून तेवढेच फक्त विचारतो. तुझ्याकडे उत्तर असेल तर आता दे ! नसेल तर जमेल तेव्हा दे. तशी काही घाई वगैरे नाही. सावडीनं मेल कर, एसएमएस कर, व्हॉट्स ऍप कर.. किंवा डायरेक्ट फोन कर.. अपन कू चलेगा ! तुझ्याकडे तर हे सारं फ्री असेल ना ?
देवा, मला सांग..
• कोरोनाराची एवढी भयंकर महामारी सुरू असताना, जनतेची चिंता करायचे सोडून तुझ्या मंदिराचा शिलाण्यास करण्याची या्वेळी खरंच गरज होती का रे ?
• मला सांग त्याची घाई तुलाच होती की तुझ्या ह्या भक्तांना ?
• रामजन्मभूमी मुद्दा देशात तापवण्यात अडवाणी यांचा रोल मोठा आहे, हे तुलाही माहीत आहे. मग त्यांनाच ड्रॉप का करण्यात आले देवा ? ही तुझीच आयडिया आहे की तुझ्यावर दुसऱ्या कुणाचा दबाव होता ?
• तू शबरीची उष्टी बोरे खाणारा म्हणून प्रसिद्ध आहेस रे, पण आमचे राष्ट्रपती चक्क तुलाही अस्पृश्य वगैरे वाटले का ? राष्ट्रपतींना काही मान वगैरे असतो की नाही बाबा ?
• एकीकडे सारी मंदिरं बंद आहेत. तुझे किंवा इतर देवांचे पुजारी कोरोना ग्रस्त होत आहेत. भक्त असलेले मंत्री परेशान आहेत. काहींचे तर आधीच ‘राम नाम सत्य है..’ सुद्धा आटोपले आहे. अशावेळी तुला काही वेळासाठी थांबता आले नसते का ?
• देवा, महामारी मुळे उद्योग बंद पडलेत, लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, संसार उध्वस्त झालेत, अनेकांनी आत्महत्या केल्या, अशावेळी मंदिराचा शिलाण्यास केल्यामुळे तुझ्याकडून काही विशेष पॅकेज वगैरे मिळणार आहे का गरिबांना ? म्हणजे तू स्वतः लक्ष देवून काही करणार आहेस का ? बाकी तर काही खरं नाही देवा !
• देवा, शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेण्याची सोय नाही म्हणून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. पालकांना रोजगार नाही.. म्हणून खाजगी शाळेतील शिक्षकांनाही पगार नाही. जिथं उद्याची चूल कशी पेटेल याच्या चिंतेन आई वडिल रात्रभर झोपले नाहीत, तिथं मुलांची फी तरी कशी भरणार रे ? अशावेळी तू सरकारला काहीच बोलत नाहीस का ? सारे तर तुझे परम भक्त आहेत ना ?
देवा, माझा भक्तीसाठी आक्षेप नाही.. पण तुझ्या आरतीसाठी लावलेल्या दिव्यांच्या आडून कुणा गरिबांच्या वस्त्या जाळल्या जावू नयेत, एवढीच अपेक्षा आहे ! आणि तू तर देव आहेस, म्हणजेच सर्वांचाच आहेस ना ? तेव्हा..
असू दे.. काळजी घे ! फिजीकल डिस्टंस पाळ ! हा कोरोना महा डांबिस आहे बघ.. कुणालाही झोंबतोय ! शिवाय आमच्या इकडे हॉस्पिटल खर्च सुद्धा लाखोमध्ये येतो..! त्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी ना ? मग उद्या म्हणू नकोस, आधी सांगितलं नाही म्हणून..!
आणि हो, सीतामाई कशी आहे ? लव – कुश कसे आहेत ? आता बरेच मोठे झाले असतील ना ? की देव असलेल्या बापाची मुलं कायम लहानच असतात रे ?
असू दे..
चुकलं माकलं पोटी घालून घे.. उदार मनानं माफ कर रामराया !
– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान ( अतिथी संपादक)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .