‘ नाव मोठे लक्षण खोटे ‘ मनसे आमदारावर टीका..!
मोफत दिलेल्या रुग्णालयाचे घेतले १० लाख रुपये भाडे...!



| डोंबिवली | मनसे आमदार राजू पाटील यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी डोंबिवलीमधील आपलं खाजगी रुग्णालय महापालिकेला सोपवलं होत. तसेच राजू पाटील यांनी यासाठी कोणतंही भाडं आकारत नसून महापालिकेला मोफत सुविधा देत असल्याचं देखील सांगितलं होतं.

मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आजच्या मुंबई मिरर या इंग्रजी वर्तमान पत्रात आलेल्या बातमी नुसार मनपाने आमदार पाटील यांच्या हॉस्पिटलला मनपा कडून महिना १० लाख भाडे अदा केले आहे. तसेच हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा मनपा तर्फे देण्यात आलेला आहे. इतरत्र खर्च म्हणजेच पाणीपट्टी, लाईटबिल, सुरक्षा रक्षक यांचा खर्च सुद्धा मनपाने भागवला आहे. त्यामुळे मोफत हॉस्पिटल दिल्यामुळे एकीकडे आमदार राजू पाटील यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले होते मात्र आज पाटील यांनी रुग्ण सेवेसाठी सुद्धा मनपाकडून पैसे आकारले आहेत हे समोर आले आहे.

रुग्णालय आणि महापालिकेत झालेल्या सामंजस्य करारानुसार महापालिकेने ही सुविधा BAJ Symbiotic Pvt Ltd. कडून भाडेतत्वावर घेतली आहे. जोपर्यंत करोनावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत हा करार वैध असणार आहे.

” डोंबिवली पूर्व य़ेथे करोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर महापालिकेने रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांची पाहणी करण्यास सुरुवात केली होती,” अशी माहिती राजू पाटील यांनी मिररला एप्रिल महिन्यात दिली होती. “रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यापेक्षा त्यांना एक समर्पित सुविधा दिली पाहिजे असा सल्ला मी महापालिका आयुक्तांना दिला होता. यावेळी मी त्यांना माझं रुग्णालय मोफत वापरण्याची ऑफर दिली,” असंही राजू पाटील यांनी सांगितलं होतं.

त्यांच्या रुग्णालयात १०० बेड असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळायचं असल्याने ६० – ६५ रुग्णांवरच उपचार केले जाऊ शकतात. आयसीयूमध्ये १५ बेडची सुविधा आहे. तसंच तीन व्हेंटिलेटर आहेत. ते अपुरे असल्याने महापालिका तात्पुरते काही व्हेंटिलेटर बसवत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी देखील महापालिकाने राजू पाटील यांना महिन्याला १० लाखांचं दिल्याची कबुली दिली आहे. मात्र त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. त्या सोबतच गेले काही महिने हे रुग्णालय पूर्ण क्षमेतेने चालत नसल्याचे देखील येथील स्थानिक सांगत आहेत.

हे पूर्ण प्रकरण तापू लागल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी रुग्णालयाकडून भाड्याची कोणतीही मागणी केली नसल्याचं म्हटंल आहे. “महापालिका प्रत्येक रुग्णालयात जाऊन पाच ते दहा बेड मिळतील का पाहत होतं. त्यांना गरज हवी तितके बेड मिळत नसल्याने मी त्यांना संपूर्ण रुग्णालय देण्याची ऑफर दिली. मी मार्च महिन्यातच त्यांना ऑफर दिली होती. आमच्या आरआर हॉस्टिपलच्या आधी त्यांनी दुसऱ्या एका रुग्णालयासोबत करार केला होता. तीच माहिती त्यांनी आमच्यासोबत करार करताना वापरली. मी तो करार पाहिलेलाही नाही. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. मी चांगल्या हेतूने रुग्णालय दिलं आहे,” असं राजू पाटील यांनी सांगितलं आहे.

एकंदरीत, मोठा गाजावाजा करत मनसेच्या एकमेव आमदाराने मोफत रुग्णालय देण्याची केलेली घोषणा अशी हवेत विरली असल्याने, सोशल मीडियातून यावर प्रचंड टीका होत असून ‘ नाव मोठं लक्षण खोटं’ अश्या प्रकारची चर्चा तिथे रंगू लागल्या आहेत..


2 Comments

  1. मनसेच्या एकमेव आमदाराने मोफत रुग्णालय देण्याची केलेली घोषणा अशी हवेत विरली 😜🤪

  2. मनसेच्या एकमेव आमदाराने मोफत रुग्णालय देण्याची केलेली घोषणा अशी हवेत विरली 😜🤪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *