विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर पासून सुरु होणार..?
युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष..!



| मुंबई | कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? त्याची पद्धत काय असेल..? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) नेमलेल्या २ समितींनी आपल्या शिफारसी आयोगाकडे सोपविल्या आहेत. पुढील शैक्षणिक वेळापत्रक कसे असू शकेल आणि या काळात परीक्षा घेण्यासंबंधी उपलब्ध पर्याय यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. तर ऑनलाईन शिक्षणाचा दर्जा कसा असावा ? कसा सुधारता येईल याचा अभ्यास करण्यासाठी दुसरी समिती नेमण्यात आली होती.

या शिफारशींमध्ये महाविद्यालयीन, विद्यापीठाचे नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली आहे. तर दुसऱ्या परीक्षेसंदर्भात नेमलेल्या समितीने या महाविद्यालय, विद्यापीठ परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी विद्यापीठाने करावी किंवा ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्यास लॉकडाऊन मागे घेण्याची प्रतीक्षा करून त्यानुसार पारंपारिक पद्धतीने नेहमीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्याची तयारी करावी व त्यानुसार परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी शिफारस केली आहे.

यामुळे आता देशभरातील महाविद्यालये व विद्यापीठांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे जून जुलैमध्ये सुरु होण्याऐवजी सप्टेंबरपर्यंत सुरु करण्यात यावे या बाबत आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. युजीसी आता अहवालावर नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

या दोन्ही समित्यांनी त्यांचा अहवाल शुक्रवारी सादर केला आहे. या दोन्ही अहवालांचा अभ्यास करून देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठे यांना अधिकृत मार्गदर्शक तत्वे जरी करण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.

परंतु, लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या प्रवेशपरीक्षा या नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्यातील अडथळा ठरू शकतात. नीट , जेईई, वकिली अभ्यासक्रमासाठी ची प्रवेश परीक्षा या सारख्या प्रवेश परीक्षा जूनपर्यंत घेण्याचा विचार असला तरी देशातील व राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेणे आवश्यक आहे, त्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच मार्गदर्शक तत्त्वे उच्च तंत्र शिक्षण खात्याकडून जारी केली जाण्याची शक्यता आहे.


1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *