भिवंडी : शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून (MMRDA) कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई करण्याचा घाट घालण्यात सुरुवात झाली आहे.
येवई येथील आर. के. लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीए कारवाई करण्याच्या तयारीत आहे. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत.
त्यामुळे भिवंडीत हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, यावर आता भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत, असे स्पष्टीकरण यावर म्हात्रे यांनी दिलं आहे.
अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील – सुरेश म्हात्रे
मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत. एमएमआरडीए राजकीय दबावातून कारवाई करत आहे. जिनके घर शिशे के होते हैं वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते, असं म्हणत सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला. आता यावर महायुतीचे उमेदवार कपिल पाटील काय उत्तर देतात हे पहावे लागेल.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर महाविकास आघाडीकडून कपिल पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाला उमेदवारी देण्यात आली आहे.