नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीने खुनाच्या आरोपात सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. प्रकरणावरील सुनावणी ५ मार्च रोजी पूर्ण झाली असून आज त्यावर उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्य सरकारने त्याच्या सुटकेवर पुढील चार आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिलेत.
याचिकेनुसार, १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. गवळीने या आधारावर शिक्षेत सूट मिळविण्यासाठी सुरवातीला कारागृह अधीक्षकांना अर्ज सादर केला होता.
गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना २ मार्च २००७ रोजी घडली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष उद्या (ता. ५) सुनावणी होणे अपेक्षीत आहे. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.
गवळीचे वयासह आजाराचे कारण
वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. विविध शारीरिक आजार जडले आहेत. निम्मा कारावासही भोगला आहे. त्यामुळे कारागृहातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती गवळीने केली होती. कारागृह अधीक्षकांनी निर्णयात २०१५ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार गवळीला शिक्षेत सूट दिली जाऊ शकत नाही, असे कारण नमूद करून तो अर्ज १२ जानेवारी २०२३ रोजी फेटाळून लावला. त्यामुळे, मागील वर्षी गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.