बारामती :- आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांकडे फक्त राज्य नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण या मतदारसंघात फक्त लढत होणार नसून, प्रतिष्ठाही पणाला लागलेली असणार आहे. महाराष्ट्रातील बारामती हा त्यातीलच एक मतदारसंघ आहे.
कारण पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत पवार कुटुंबीयच आमने-सामने आहे. एकीकडे शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिलेली असताना, दुसरीकडे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी ननंद-भावजयेत हा सामना होणार आहे. पण यादरम्यान बारामतीच्या रिंगणात शरद पवारही उतरले आहेत.
हो तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. बारातमीमधून शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण हे शरद पवार म्हणजे रिक्षावाले आहेत. शरद राम पवार असं या उमेदवाराचं नाव आहे. शरद राम पवार यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
बघतोय रिक्षावाला संघटनेकडून त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. शरद राम पवार स्वत: रिक्षाचालक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील आंबेगाव बुद्रूक येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवारही निवडणूक लढताना दिसतील.
रिक्षावाल्यांच्या अनेक समस्या आहेत. पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. तसंच ओपन परमिट बंद व्हावं यासह आमच्या अनेक मागण्या आहेत. या समस्यांसाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे असं शरद राम पवार यांचं म्हणणं आहे. सध्या फक्त घराणेशाहीचं राजकारण सुरु असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. फक्त निवडणुकीपुरतं या समस्यांकडे पाहिलं जातं असंही ते म्हणाले आहेत.
अजित पवारांचा डमी अर्ज ?
बारामतीत शरद पवार ग़टाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दोन्ही उमेदवार 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. यादरम्यान खबरदारी म्हणून अजित पवारांनी डमी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणास्तव बाद झाल्यास खबरदारी म्हणून अजित पवारांचा डमी अर्ज दाखल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचा डमी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे.
डमी अर्जावरुन रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे. दिल्लीवरुन आदेश आले असतील तर दादा काहीही करतील असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार स्वत: आदेश द्यायचे.
पण आता त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. उद्या जर दिल्लीवरुन आदेश आली की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या तर तेही ऐकावं लागेल असाही टोला रोहित पवारांनी लगावला आहे.