आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ३१ जुलै पर्यंत ‘ वर्क फ्रॉम होम ‘



| नवी दिल्ली | आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास ३१ जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या आहेेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत.

सध्या एप्रिल अखेरपर्यंत कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या पर्यायाला परवानगी होती. दूरसंचार विभागाने यापूर्वी ही सवलत एक महिन्यापर्यंत वाढवली होती, परंतु प्रसाद यांनी ३१ जुलैपर्यंत ही सवलत लागू असल्याचं स्पष्ट केलं. आतापर्यंत जवळपास गेला दीड महिना देशभरातील अनेक आयटी कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत.

‘नॅसकॉम’ या आयटी इंडस्ट्रीतील संघटनेने ही महत्त्वाची मागणी केली होती. महिन्या-महिन्याला मुदतवाढ देण्याऐवजी स्थिर धोरण आणण्याची आवश्यकता असल्याचं ‘नॅसकॉम’चं म्हणणं आहे. आयटी कंपन्यांना नियमांमध्ये हवी असलेली सूट त्यांना देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

लॉकडाऊनमध्ये सूट मिळाली, तर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू नये, यासाठी रविशंकर प्रसाद यांनी घोषणा केली आहे. इंटरनेटचा वेग कायम ठेवण्यासाठी ‘भारतनेट’ची मदत घेणार असल्याचंही प्रसाद म्हणाले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *