| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार, विनंतीनुसार आणि मनाप्रमाणे वागतात असं आमचं आजही मत नाही. राज्यपाल हे स्वतंत्र विचाराचे आहेत. ते निर्भीडही आहेत. त्यामुळे याप्रश्नी ते निर्भीडपणे निर्णय घेतील असा आमचा विश्वास असल्याचेही पाटील म्हणाले. घटनेत जे म्हटलंय त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषद सदस्यत्वाबाबत शिफारस केली आहे. ही शिफारस घटनेच्या चौकटीत बसते आणि म्हणूनच ती राज्यपालांनी मान्य करावी अशी आमची विनंती असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यातूनच त्यांचे खटाटोप सुरू आहेत, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यात महाराष्ट्रामध्ये माध्यमांची गळचेपी सुरू आहे. अघोषित आणीबाणीसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. फडणवीस यांच्या या पत्राचा उल्लेख करत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. फडणवीस यांनी जे पत्र दिले आहे त्यातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असाच सूर निघत असल्याचा दावा पाटील यांनी केला.