१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश यशवंतरावांनी महाराष्ट्रात आणला व महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून ते आजच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राने देशाला वाट दाखवली, दिशा दिली. छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान वारसा, भक्कम आध्यात्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्य लढ्यातील मराठी माणसाचे अमुल्य योगदान, फुले – शाहू – आंबेडकरांनी दाखवलेली पुरोगामित्वाची वाटचाल या या सगळ्या पार्श्वभूमीवर १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून बेळगाव व डांग जिल्ह्याची भळभळती जखम उरावर घेत मुंबई सहित विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र असा नानाविध बोली, जाती, परंपरा व भिन्न भौगोलिक प्रदेश असलेला महाराष्ट्र अस्तित्वात आला. गेल्या ६० वर्षात पाठीमागे बघताना यशवंतराव चव्हाण यांचे एक वाक्य सातत्याने आठवतं ते असं म्हणायचे “हा महाराष्ट्र इतका सुंदर आणि संपन्न आहे त्याला कुणाची नजर लागेल अशी भीती वाटते”
यशवंतरावांचा हा संपन्न महाराष्ट्र आजपर्यंत अधिकाधिक समृद्ध होत गेला, औद्योगिक दृष्ट्या सजत गेला, मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली. रोजगार हमी योजनेसारखी परिवर्तनकारी योजना महाराष्ट्राने देशाला दिली, महिलांना 50 टक्के आरक्षणाची सर्वोत्तम अंमलबजावणी महाराष्ट्राने केली, महाराष्ट्राच्या धर्तीवर माहिती अधिकार सारखा एक महत्त्वाचा कायदा देशाला मिळाला, कोयना- जायकवाडी ने लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी थांबवून येथील जमीन पाणीदार केली. चीनचे युद्ध असो की वीस कलमी योजनेची अंमलबजावणी जेव्हा-जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा तेव्हा महाराष्ट्र देशाच्या मदतीला धावला.
अर्थात हे सगळं सुरू असताना काही गोष्टी आज निश्चितपणे महाराष्ट्र समोर आव्हान म्हणून उभ्या आहेत. आदिवासींचे कुपोषण, विदर्भाचा अनुशेष, मराठवाड्याचा दुष्काळ, बकालपने वाढलेली शहरं, मुंबईतली मराठी माणसाची व मराठी भाषेची उडालेली दैना, दिल्लीतले कमी झालेले राजकीय वजन याकडेही डोळेझाक करता येणे शक्य नाही. आजच्या एक मे च्या पार्श्वभूमीवर योगायोगाने झालेले दोन निर्णय महाराष्ट्राच्या भवितव्यावर परिणाम करणारे ठरतील असं वाटतं एक कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपूर्ण जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय राज्याने घेतला, दुसरा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र गुजरातला हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय कदाचित योगायोग असेलही मात्र महाराष्ट्र नावानेच नाहीतर कर्तुत्वाने ही महान आहे, असे अनेक घाव पचवीत महाराष्ट्र दिमाखाने उभा आहे आणि राहील. महाराष्ट्र दिनाच्या हीरक महोत्सवी वर्षात आपण कोरोनाच्या संकटावर मात करून पुढचा महाराष्ट्र दिन दिमाखात साजरा करू याच शुभेच्छा…
– विकास नवाळे (लेखक उत्तम वक्ते असून नगर परिषद भडगांव जि. जळगाव इथे मुख्याधिकारी आहेत.)
👍🏻Jay Maharashtra 🙏
छान लेख आहे
अप्रतिम 👌👌🙏
सर विवेचन छान केले आहे 👍
VERY NICE
खुपच छान
Sir atishy Chan ani vichar karayla lavnara lekh ek jababdar ani savhedanshil adhukari
Sir atishy Chan lekh ahe ek jababdar ani savhdanshil Adhikari…..
Nice writing, Jai Maharashtra
Very nice
अप्रतिम sir
BHARI