- मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी..
| जळगाव | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, अखेर निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याचे जाहीर केल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील इतर इच्छूक देखील विधानपरिषदेत प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली असून पक्षश्रेष्ठींकडे विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी केली आहे.
मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. एकनाथ खडसे यांनी जळगावात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
मागील राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण, मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात मी इच्छुक आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मी इच्छुक आहे. त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षाही खडसेंनी बोलून दाखवली.
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल सदस्य म्हणून कुणाची नेमणूक करायची याचा निर्णय घेण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल, असेही खडसे यांनी महाराष्ट्रातील राज्यपाल व महाविकास आघाडी यांच्यातील वादावर बोलताना स्पष्ट केले.