| मुंबई | विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २९ मते (मतांचे मूल्य २८८१) मिळवावी लागणार आहेत. बिनविरोध निवडीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आग्रही आहेत, पण निवडणूक झाल्यास ९ व्या जागेसाठी मोठा घोडेबाजार होऊ शकतो. राज्य विधिमंडळाच्या विधानपरिषदेत , विधानसभेत सदस्य संख्येच्या कमाल १/३, तर किमान ४० सदस्य असू शकतात. महाराष्ट्रात विधानसभेची सदस्य संख्या २८८ आहे. त्यानुसार वरिष्ठ सभागृहात ७८ सदस्य असून ते ९६ पर्यंत वाढवणे शक्य आहे.
असा ठरतो विजयी मतांचा फॉर्म्युला…
विधानसभेतील सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या उमेदवारांना विजयासाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो. एक जागेची निवडणूक असल्यास विधानसभा सदस्यांची एकूण मते भागिले २ अधिक १ बरोबर विजयी उमेदवारासाठी मतांचा कोटा निश्चित होतो. (महाराष्ट्र राज्य : २८८/२+१=१४५ मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो.) एका वेळी एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवडणूक असल्यास मात्र कोटा निश्चिती वेगळ्या पद्धतीने होते. विधानसभेतील एकूण मते गुणिले १०० अधिक १ या संख्येला रिक्त जागांच्या संख्येत अधिक १ संख्या मिसळून भागाकार केल्यानंतर जी संख्या येते तो विजयी उमेदवारासाठी मतांचा कोटा असतो.
एका आमदाराच्या मताचे मूल्य असते १००..
२१ मे रोजी ९ रिक्त जागांची निवडणूक होत आहे. राज्य विधानसभेत २८८ आमदार, तर एक अँग्लो इंडियन सदस्य असतो. एका आमदाराच्या मताचे मूल्य १०० असते. त्यामुळे २८८ गुणिले १०० झाले २८८००. त्यात अधिक १ मिसळायचा म्हणजे एकूण मते झाली २८८०१. सध्या ९ रिक्त जागांची निवडणूक होत आहे. त्यात अधिक १ मिसळायचा म्हणजे झाले १०
२८८०१ याला १० ने भागायचे, ती संख्या येते २८८०.१ म्हणजे कोटा झाला २८.८ मतांचा. याचा अर्थ पहिल्या पसंतीची २९ आमदारांनी मते टाकलेला उमेदवार विजयी होणार.
अशी असते विधानपरिषदेची सदस्य संख्या..
७८ पैकी विधानसभा सदस्यांद्वारे ३०, शिक्षक मतदारसंघातून ७, पदवीधर मतदारसंघातून ७, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून २२ आणि १२ सदस्यांची (कला, क्रीडा, वाङ्मय, शास्त्र, समाजसेवा यातील नामवंत) राज्यपाल नामनियुक्त सत्ताधारी पक्षाकडून नियुक्ती करण्यात येते. विधान परिषदेचे १/३ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यामुळे परिषदेला स्थायी सभागृह म्हटले जाते.
स्त्रोत : विधिमंडळ संहिता