| नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची निर्मिती याच वर्षी सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढून तशी घोषणाच केली.
देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणा दरम्यान अर्थ मंत्रालायाकडून हा एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना करात सूट दिली जाणार आहे. ही सूट केवळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आर्थिक मदत केल्यानंतरच मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून, आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० जी नुसार ही सूट देण्यात येईल.
मंदिर उभारणीसाठी देशातील अनेक भाविक भरभरून मदत करत आहेत. या दानावर आयकरातून सूट मिळवण्यासाठी ट्रेस्टला दिल्या गेलेल्या देणगीची पावती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यामध्ये ट्रस्टचं नाव, पत्ता, पॅन क्रमांक, दान देणाऱ्याच्या नावाचा उल्लेख आणि दानाची राशी नमूद केलेली असायला हवी.
दरम्यान, कलम ८० जीनुसार, सर्व धार्मिक ट्रस्टला सूट दिली जात नाही. धार्मिक ट्रस्टला अगोदर कलम ११ आणि १२ नुसार, आयकरातील सूटसाठी रजिस्ट्रेशन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर कलम ८० जी नुसार ही सूट दिली जाते. अर्थ मंत्रालयानं तीर्थक्षेत्राचा उल्लेख ऐतिहासिक महत्त्वाचं स्थान तसेच सार्वजनिक पूजेचं प्रसिद्ध स्थान म्हणून केला आहे.