पत्र – करोना मुळे घरात बंदिस्त झालेल्या मित्राला

(प्रिय… तुम्ही माझे कोणीतरी आहात म्हणून हे पत्र तुम्हाला पाठवत आहे. मला माझी जेवढी काळजी आहे तेवढीच तुमचीही. माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी, तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी तुम्ही हे पत्र वाचावं ही माझी छोटीशी अपेक्षा आहे. हवं तर शेवटची इच्छा समजा.!)

प्रिय मित्रा..

असं स्वतःला कैद करून घेणं किती कठीण जातंय मला याची कल्पना कदाचित तुला असेलच; पण जगायचं असेल आणि हे जग जिवंत ठेवायचं असेल तर ही निसर्गाने लादलेली बंधने पाळवीच लागतील… काल भारतभरात लॉक डाउन होता, सगळे लोकं घरी बसले होते. त्या घरी बसण्यामागे शिस्त होती का मरण्याची भीती हे ज्याचं त्यालाच माहित. शिस्त असेल तर आणखी पुढच्या काही दिवस असेच रस्ते सुनसान दिसतील, गर्दी कमी दिसेल आणि आवश्यक ती काळजी घेताना प्रत्येकजण दिसेल. पण ही शिस्त नाहीच दिसली तर या देशाचं काय होईल ? ह्याची प्रचंड धास्ती वाटू लागलीय..! कालच्या लॉकडाउन नंतर देशात थाळी नाद करण्याच्या नादात काही लोकांनी केलेलं विचित्र सेलिब्रेशन पाहून ही भीती जरा जास्तच वाटू लागलीय. आपल्याकडे लोक शिस्त पाळतील असं मला तरी वाटतं नाही; पण प्रत्येकाला मरणाची तरी भीती वाटायला पाहिजे ना…! कारण जीव धोक्यात ठेऊन आवश्यक ती काळजी न घेणाऱ्या त्या प्रत्येक मूर्ख माणसांना कदाचित माहीत नसेल की ते त्यांचंच नाही तर त्यांच्या सहवासात येणाऱ्या त्यांच्या लेकरांच, आईवडिलांच, कुटूंबातल्या प्रत्येक माणसाच, शेजाऱ्याच, पर्यायाने समाजाचं आणि देशाचं आयुष्य धोक्यात घालत आहेत. हे शिस्त न पाळणारी लोकं मला आतंकवाद्यासारखी वाटू लागलीयेत. म्हणून या मोकाट गर्दी करून हिंडणाऱ्या प्रत्येक आतंकवाद्याला नियंत्रणात आणण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं असंही मला मनापासून वाटतंय..!

मित्रा, आपलं आयुष्य आता आपलं एकट्याच राहिलं नाही. त्यावर आता प्रत्येकाचा अधिकार झालाय. आपल्याला जगवायचं की मारायचं हे आता प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्याला जगायचं असेल तर इथे प्रत्येकानं निरोगी असणं गरजेचं आहे. प्रत्येक जण निरोगी राहण्यासाठी आपण स्वतःची जी काळजी घेतो तीच आपल्याला प्रत्येकाचीच घ्यावी लागणार आहे. म्हणून कोरोनाचा आतंकवाद घेऊन फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या , काळजी न घेणाऱ्या त्या प्रत्येकाला गर्दी करण्यापासून रोखनं हे आता आपलं राष्ट्रीय कर्तव्य बनलं आहे. लोक खूप निष्काळजी आहेत आपल्या देशात.. आपआपल्या सोयीनुसार, गरजेनुसार आणि फायद्यानुसार कोणत्या गोष्टी किती गांभीर्याने घ्यायच्या हे ठरवत असतात. संकट जोपर्यंत त्यांच्या मानगुटीवर बसत नाही तोवर त्याला आव्हान देणारे आपले लोकं, या संकटाच गांभीर्य समजून घ्यायला तयार आहेत असं दिसत नाहीत. आजवरची अस्मानी- सुलतानी संकटं इथल्या लोकांनी कदाचित परतवलीही असतील. त्या प्रत्येक संकटावर मात करण्यात इथल्या लोकांना कदाचित यश मिळालंही असेल; पण करोनाच हे संकट एकदा मानगुटीवर बसलं तर संपवल्याशिवाय सोडत नाही याची कल्पना आपल्या इकडच्या नादान लोकांना अजून आलेली दिसत नाही. त्यांच्या नादानपणणामुळे, त्यांच्या मुर्खपणामुळे, त्यांच्या चुकांमुळे आपण आपला, समाजाचा आणि देशाचा जीव धोक्यात घालत आहोत; म्हणून अशा नादानपणा करणाऱ्या लोकांना आवरं घालण आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. असल्या प्रत्येक आतंकवाद्याला विरोध करण हे प्रत्येकाचं वैयक्तीक कर्तव्य आहे… हा माझा एकट्याच्याच नव्हे, तर आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे….! प्रशासनावर अवलंबून राहून हा हाहाकार सावरता येणार नाही. कारण 135 कोटीच्या देशाला सावरण्यासाठी प्रत्येकालाच प्रशासनाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. यासाठी मित्रा तू तुझ्या भागात लोकांमध्ये जागृती कर, प्रशासनाला मदत होईल अशी भूमिका तुझ्या परिसरात तयार कर, आरोग्य यंत्रणेला मदत होईल असं घरी बसल्या नेटवर्क तयार कर. गरज पडल्यास शासनाने आवाहन केलं तर मदत कार्यात सहभागी हो. आपण आज हे रोखलं नाही; तर जग सूंदर बनवण्याचं आपलं स्वप्न तसंच अर्धवट राहून जाईल. उद्याच्या सूंदर जगासाठी आपल्याला करोनाच्या आतंकवादविरोधात लढावंच लागेल… कदाचित घरात बसून ही लढाई आपल्याला लढावी लागेल… पण लढणं अनिवार्य आहे..!

आपल्याला आपल्या देशाच्या काही मर्यादा लोकांपर्यंत पोहचाव्या लागतील. आपली लोकसंख्या, त्यात आपली आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची संख्या, उपलब्ध हॉस्पिटल याबद्दल लोकांपर्यंत जागृती करणं आवश्यक आहे. काही होत नाही हे बोलणाऱ्या लोकांना आपण इतर देशातील अराजक परिस्थितीच गांभीर्य लक्षात आणून द्यायला हवं. आपण इटली, स्पेन, जर्मनी या प्रगत देशात सूर असलेली महामारी आपल्या लोकांच्या लक्षात आणून द्यायला हवी. करोना जर आपल्या देशात तळागाळात पोहचला तर गोष्टी किती हाताबाहेर जातील, हे आपल्याला तळागळातील लोकांपर्यंत पटवून सांगायला हवं.

आपल्याला हेही सांगायला हवं की ज्या इटलीसारख्या प्रगत राष्ट्राची लोकसंख्या फक्त सहा कोटी आहे. जे इटली राष्ट्र आरोग्य सेवेत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे दिवसागणिक पाचशे ते सहाशे लोक करोनामुळे मरत आहेत. आपल्याकडे 135 कोटीच्या देशात करोना प्रतिबंध झाला नाही तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला तपासणी, उपचार, हॉस्पिटल आणि डॉक्टर कुठुन उपलब्ध होणार..? जर आपल्या देशात 10% लोक जरी बाधित झाले तरी 13 कोटी लोकांना उपचार देण्याची क्षमता आपल्या देशात उपलब्ध होऊ शकणार नाही. आपल्या देशात उपलब्ध असणाऱ्या एकूण व्हेंटिलेटरची संख्या आहे फक्त एक लाख. 10 टक्के म्हणजे 13 कोटी लोक जर बाधित झाले तर 1 लाख व्हेंटिलेटर कुना कुणाला पुरणार आहेत. अनेक लोक रस्त्यावरच तडफडून मरतील, अनेकांना तर तपासनंही शक्य होणार नाही. अनेक जण अन्न, पाणी आणि सामजिक बहिष्कारामुळ जीव सोडतील. सगळीकडे अराजकता होईल. महासत्ता बनू पाहणारा आपला देश आणि आपणही काही दिवसात नामशेष होऊन जाऊ…. आणि आपण हे सगळं होत असताना हताश नजरेने बघत बसू यापेक्षा मोठं दुदैव काय असणार..!

या सगळ्यावर एकच उपाय… तो म्हणजे आपल्याला स्वतःला लॉक डाउन करणं. आपणच नाही तर समाज आणि समाजातील प्रत्येकाला लॉक डॉउन करायला भाग पाडणं. गर्दी होऊ न देण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणं… जनजागृती करणं.. करोनाचा वाढता प्रसार थांबवणं हाच आपला देश वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. मित्रा आता वेळ आलीय खरा देशभक्त, खरा क्रांतिकारी होण्याची… पण यावेळी हि क्रांती आपल्याला घरी बसून करावी लागणार आहे… एका न दिसणाऱ्या दुष्मणासोबत..!

तुझाच
दादासाहेब श्रीकिसन थेटे उर्फ दाद्या..!

(वाचून काही जाणवलं तर काय करायचं ते ठरवा..!  लिहण, बोलनं आणि जागृती करणं हेच या लढाईचं शस्र..!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *