झारखंड मधील शाळेचा ऑनलाईन शिक्षणासाठीचा नवा फंडा..!

| मुंबई / रांची | लॉक डाऊन मध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून देशातील बहुतांशी शाळांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. त्यातच झारखंडमधील आदिवासी भाग असलेल्या दुमका गाव बानकाठी मधील एक मुख्याध्यापक श्याम किशोर सिंह गांधी यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही आहेत. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांनी गावामध्ये लाऊड स्पीकर लावला आहे. लाऊड स्पीकरच्या मदतीने १६ एप्रिल पासून दररोज दोन तास ऑनलाईन क्लास घेतला जात आहे.

हे लाऊड स्पीकर एक तर झाडांवर आणि भिंतींवर लावण्यात आले आहेत. सात शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. गांधी म्हणाले की, आमच्या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गात २४६ विद्यार्थी आहेत. त्यातील २०४ विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही आहेत. आमचे वर्ग सकाळी १० वाजता सुरू होतात. एखाद्या विद्यार्थ्यास काही प्रश्न किंवा समस्या असल्यास तो विद्यार्थी कोणाच्याही मोबाईल वरून आम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या दिवशी त्याला समजावून सांगितले जाते. पुढे ते म्हणाले, ही युक्ती काम करत असून, विद्यार्थ्यांना शिकविलेले समजत आहे. या युक्तीचे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील समर्थन केले आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना आनंद मिळत आहे.

दुमका गावाच्या जिल्हा शिक्षा अधिकारी पूनम कुमारी यांनी या पद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांनी या पद्धतीनुसार काम केले पाहिजे. कारण लॉक डाऊन संपल्यानंतर जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये. पुढे त्या म्हणाल्या, लवकर आम्ही या गावात जाऊन या पद्धतीची पाहणी करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *