पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आढावा बैठकीत सादर..!
ठाणे / प्रतिनिधी :- कल्याण, डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिंची वाढती संख्या लक्षात घेता त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कल्याण डोंबिवली मधील दोन डॉक्टरांची जोडगोळी दिशादर्शक नियोजन करत आहे. कल्याणचे खासदार वैद्यकीय डॉक्टर श्रीकांत शिंदे (MS,ortho) व कल्याणचे मनपा आयुक्त व्यवस्थापनातील डॉक्टर विजय सुर्यवंशी ( PHD management) या डॉक्टर जोडगोळीने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत तसेच पालकमंत्री शिंदे यांनी स्वतंत्रपणे कल्याण डोंबिवली मनपा अधिकारी यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत त्यावर त्वरित निर्णय घेण्यात आला.
बैठकीत ठरल्यानुसार रुग्णांवर कल्याण, डोंबिवली मध्येच तातडीने उपचार करता यावेत याकरिता खालील निर्णय घेण्यात आले.
१. महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये सुसज्ज यंत्रणा, व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करण्याबरोबरच अतिदक्षता विभाग (Intensive Care Unit) तयार करणे.
२. खाजगी रुग्णालयांची मदत घेत कोरोनाग्रस्त रुग्णांवर या खाजगी रुग्णालयांत सुध्दा तातडीने उपचार करता येतील.
३. रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित आणि संशयित यांमध्ये हाय रिस्क, लो रिस्क अशी विभागणी करण्यात येणार.
४. महत्वाचे म्हणजे रुग्णांवर तातडीने कोरोना (covID-19) च्या चाचण्या करता याव्यात यासाठी रुग्णालयांमध्येच पॅथेलॉजी सुरु करणे.
५. रुग्णांना तातडीने स्थलांतरित करण्याकरिता १० रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत.
६. कोरोना बाधित रुग्णांची अद्ययावत माहिती दर्शविणारा लाईव्ह डॅशबोर्ड तयार करणे
७. त्याचबरोबर कोरोना व्यतिरिक्त सर्दी, ताप, खोकला असे साथीच्या आजाराने ग्रस्त नागरिकांवर देखील तातडीने उपचार करता यावेत, याकरिता कल्याण पूर्व – पश्चिम तसेच डोंबिवली पूर्व – पश्चिम येथे प्रत्येकी दोन असे एकूण आठ कम्युनिटी क्लिनिक्स सुरु करण्यात येणार आहेत.
८. कोरोना बाधित अथवा संक्रमित व्यक्तिच्या सानिध्यात आलेल्या संशयित रुग्णांच्या तपासणीकरिता स्थानिक डॉक्टर्स,सर्जन आणि नर्सेस यांचे गट तयार करुन विविध विभागात कार्यरत करावेत.
या बैठकीस सिव्हिल सर्जन श्री. कैलास पवार, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली शाखेचे अध्यक्ष डॉ.मंगेश पाटे आणि महापालिका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.