भारत आणि चीनचे संबंध कमालीचे ताणले असताना, त्यात कोरोना व्हायरस मुळे जगातील अनेक देश थेट चीन विरोधात दंड थोपटत असताना भूमाफिया चीनची भूक मात्र काही कमी होत नाहीये. संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात टाकून चीन आता अनेक देशांसोबत वाद निर्माण करत आहे. भारत, म्यानमार, जपान नंतर आता चीनने रशियामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे टीकेचा लक्ष्य झालेल्या चीनला रशियाने पाठिंबा दिला होता. पण आता चीन त्याच मित्राच्या पाठीत खंजीर खूपण्याचा प्रयत्न करत आहे.
रशिया देखील सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. हाँगकाँगच्या मुद्द्यावर देखील रशियाने चीनचा विरोध केला नव्हता. पण आता त्याच रशियाच्या एका शहरावर चीनने थेट दावा ठोकला आहे. चीनने रशियातील शहर व्लादिवोस्तोक वर दावा केला आहे. हे शहर रशियाने द्वितीय अफीम युद्धात चीनला पराभूत केल्यानंतर मिळवलं होतं. चीन हे क्षेत्र तेव्हा गमावून बसला होता. दोन्ही देशांमध्ये १८६० मध्ये एक करार देखील झाला होता. तरीही भू चोरीची चटक लागलेला चीन आता इतक्या वर्षानंतर पुन्हा या शहरावर आपला दावा सांगत आहे. चीनने म्हटलं की, हे शहर आधी हैशेनवाई नावाने प्रसिद्ध होतं. ज्याला रशियाने चीनकडून हिसकावून घेतलं आहे. चीनने रशियाच्या विरोधात आता चुकीचा प्रसार सुरु केला आहे.
दरम्यान हा वाद एका सोशल मीडिया पोस्टवरुन सुरु झाला आहे. चीनमध्ये रशियाच्या राजदूतांकडून चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट Weibo वर व्लादिवोस्तोक शहराबाबत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओचा उद्देश व्लादिवोस्तोक शहराचा १६० वा स्थापना दिनाचा होता. पण चीनला हे सहन झालं नाही, आणि चीनने थेट मित्र राष्ट्र रशियावरच हा भू बॉम्ब टाकला.
चीनचा फिलीपींस, मलेशिया, इंडोनेशिया सोबत देखील वाद सुरु आहे. रशियाचं व्लादिवोस्तोक शहर हे पॅसिफिक समुद्रात त्याचा महत्त्वाचा बेस आहे. हे शहर प्रिमोर्स्की क्राय राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. व्यापार आणि ऐतिहासिक रूपाने व्लादिवोस्तोक रशियासाठी तसे महत्त्वाचं शहर आहे. रशियाचा मोठ्या प्रमाणात व्यापार याच मार्गातून होतो. त्यामुळे रशिया त्यावरील आपला हक्क सोडेल याची तिळमात्रही शंका नाही.
एकंदरित, चीन आपले शत्रू राष्ट्रांची यादी वाढवत आहे की यामागून अजून काही वेगळी खेळी खेळत आहे, हे येत्या काळात समजेलच. परंतु या ड्रॅगनच्या भू भस्मा आजाराला वेळीच पायबंद घालणे अत्यावश्यक झाले आहे.
– प्राजक्त झावरे पाटील