| मुंबई | सध्याचे कोरोनाचे संकट, महाविकास आघाडीचे सरकार , देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन चीनचे संकट, भाजपचे राजकारण, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी अनेक गोष्टींवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व देशातील मोठे नेते शरद पवार यांची घेतलेली मुलाखत सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.
ती ही मुलाखत भाग – १
शरद पवार राजकारणात कोणती भूमिका घेतात, काय बोलतात याला नेहमीच महत्त्व मिळाले. या वेळी शरद पवार ‘सामना’च्या माध्यमातून बोलले. ते मार्गदर्शक तितकेच खळबळ उडवणारे आहे. महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ला अजिबात धोका नाही! हे त्यांनी ठामपणे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी सडेतोड उत्तरे दिली. सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहीत नाही, असा ‘स्फोट’ शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांची ही प्रदीर्घ मुलाखत ऐतिहासिक ठरेल. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे उत्तम काम करीत आहेत, असे प्रमाणपत्र शरद पवारांनी दिले.
महाराष्ट्र या संकटातूनही बाहेर पडेल व झेप घेईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार यांची इतकी प्रदीर्घ मुलाखत प्रथमच प्रसिद्ध होत आहे. शरद पवारांनी एकही प्रश्न टोलवला नाही. अडीच तासांची ही मुलाखत म्हणजे राजकीय इतिहासाचा दस्तावेज ठरेल!
मुलाखतीची सुरुवात मोकळ्या वातावरणात झाली. ‘लॉकडाऊन’च्या बेड्यातून बाहेर पडलेल्या देशाच्या ज्येष्ठ नेत्यास विचारले, ”सध्या नक्की काय चाललंय?” त्यावर त्यांनी सांगितले, खास असं काही चाललेलं नाही. काय चालणार? एक तर देशात आणि राज्यात काय चाललंय याच्यावर लक्ष ठेवणं आणि वेगवेगळय़ा लोकांशी सुसंवाद ठेवणं, अगदी राजकारणाबाहेरच्या लोकांशी मी बोलतोय. आणि काही चांगलं वाचायला मिळालं तर वाचन करणं याच्या बाहेर काही फारसं चाललेलं नाही.
लॉकडाऊनचे हे फायदेसुद्धा आहेत.
– संकट तर आहेच. पण त्यातून जे चांगलं करता येईल, सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येईल ते करणं गरजेचं आहे. याचं महत्त्वाचं कारण की आता कोरोनाचं जे संकट जगावर आलंय त्यामुळे लॉकडाऊन आहे. सगळय़ा गोष्टी बंद आहेत. दुर्दैवाने लॉकडाऊनसारखे जे काही निर्णय सगळ्यांना घ्यावे लागले त्याचा हा परिणाम आहे. समजा हा लॉकडाऊनचा काळ नसता, हे संकट नसतं तर कदाचित माझ्याबद्दल काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं हे नक्की!
पण लॉकडाऊनचा काळ अद्यापि संपलेला नाही. जगण्यावर बंधनं आली आहेत. माणसाला एकप्रकारे बेड्याच पडल्या आहेत. माणूस जखडला गेला आहे. राजकारण जखडलंय, उद्योग जखडलाय. आपण अनेक वर्षे समाजकारणात, राजकारणात आहात. आपण अनेकदा भविष्याचा वेध घेता. आपल्याला स्वप्नात तरी कधी असं वाटलं होतं का, की अशा प्रकारच्या संकटाला माणसाला तोंड द्यावं लागेल?
– कधीच वाटलं नाही. माझ्या वाचनात पण नाही कधी.
मुख्यमंत्र्यांशी माझा उत्तम संवाद!
हे पहा, यात माझं स्वच्छ म्हणणं असं आहे की, सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. इथे तशी आवश्यकताच होती. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे.
जुने संदर्भ आहेत. खासकरून काँगेस पक्षाचा इतिहास वाचताना. काँग्रेस पक्षाची स्थापना जी झाली त्याला एक इतिहास आहे. खरं तर काँग्रेसची स्थापना पुण्यात व्हायची होती 1885 साली आणि तिथं अधिवेशनही ठरलं होतं, पण प्लेगची साथ त्याच काळात मोठ्या प्रमाणावर आली. माणसं मृत्युमुखी पडायला लागली म्हणून पुण्याची जागा शिफ्ट झाली मुंबईमध्ये आणि आता ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात किंवा गवालिया टँक, तिथे ते अधिवेशन झालं. त्या वेळचा प्लेगच्या साथीचा संपूर्ण इतिहास लिहिला गेलाय. त्यात असं चित्र होतं की राज्याच्या अनेक भागांत प्लेगमुळे माणसं मृत्युमुखी पडत होती. सगळे व्यवहार थांबलेले होते, पण ती वाचनात आलेली गोष्ट आहे. कारण त्या वेळी माझा जन्म झालेला नव्हता आणि आज कधी अपेक्षा केली नाही, कधी विचार केला नाही अशाप्रकारचं चित्र ते महाराष्ट्रपुरतं सीमित नाही. अवघ्या विश्वात आहे. हे कधी अनुभवास येईल असे वाटले नव्हते. पण परिस्थितीला सामोरे जावेच लागेल.
आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र आहे…
– हो, अगदी घराघरांत हेच चित्र आहे. डॉक्टरांच्याही सूचना आहेत की एकमेकांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहायला हवं. तुम्ही काळजी घ्या. नाही तर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील. त्यामुळे अवघे विश्व चिंतेत आहे. या सगळय़ा कालखंडात एकच गोष्ट मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतेय की समाजातल्या सगळय़ा घटकांमध्ये एकप्रकारची घबराट आहे. आता हळूहळू ती कमी व्हायला लागलीय, हे खरं; पण या घबराटीमुळे घरातून माणूस घराबाहेर पडणार नाही असं कधी वाटलंही नव्हतं ते आपल्याला पाहायला मिळालं.
वेगळ्या पद्धतीचा कर्फ्यू लागलाय अनेकदा…
– म्हणजे मला आठवतंय की, पूर्वी चीन वा पाकिस्तानचं युद्ध झालं तेव्हा एक-दोन दिवस कर्फ्यू असायचा. शत्रूराष्ट्राचे वैमानिक हल्ला करणार आहेत अशा बातम्या यायच्या तेव्हा अशाप्रकारचा कर्फ्यू होत असे. असायचा. लोक घरामध्ये बसायचे, पण ते एका दिवसासाठी, अर्ध्या दिवसासाठी किंवा एखाद्या रात्रीसाठी हा कर्फ्यू असे. पण आता कोरोनामुळे लोक महिना-महिना, दोन-दोन महिने, अडीच महिने घराबाहेर पडलेले नाहीत. हे चित्र कधी पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं, आता एक वेगळीच स्थिती कोरोनामुळे आपल्याला पाहायला मिळाली.
लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ सगळय़ांकडून अत्यंत कठोरपणे पाळला गेला. मग कलाकार असतील, आपल्यासारखे राजकारणी असतील, उद्योजक असतील…
– दुसरा काय पर्याय होता? घरी थांबणं हाच सगळय़ात सुरक्षित उपाय होता.
आपण तर सतत फिरणारे नेते आहात. सतत लोकांमध्ये राहणारे नेते आहात. हा लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ आपण कसा व्यतित केला?
– तो सुरुवातीचा महिना दीड महिना मी अक्षरशः माझ्या घराच्या चौकटीच्या बाहेरसुद्धा गेलो नाही. अगदी प्रांगणातसुद्धा गेलो नाही. चौकटीच्या आतच होतो. त्याची काही कारणं होती. एक तर घरातून प्रेशर होतं. त्यानंतर सगळय़ा तज्ञांनी सांगितलं होतं की, 70 ते 80 या वयोगटातील सगळय़ांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे किंवा हा वयोगट अतिशय व्हलनरेबल आहे. मी नेमका त्या वयोगटात येतो. त्यामुळे अधिक काळजी घेतली पाहिजे हा घरच्यांचा आग्रह होता आणि नाही म्हटलं तरी मनावर दडपण. त्यामुळे मी त्या चौकटीच्या बाहेर फारसा कुठे गेलो नाही. बराचसा वेळ टेलिव्हिजन, वाचन याच्याबाहेर काही दुसरं केलं नाही.
आम्ही तुमचा एक व्हिडीओ पाहिला, जो सुप्रियाताईंनी टाकला होता. त्यात आपण व्हरांडय़ात फेऱया मारताय आणि गीत-रामायण ऐकताय.
– हो या काळात खूप गाणी ऐकली. भीमसेन जोशींचे सगळे अभंग ऐकले. हे सगळे अभंग दोन-तीन-चार वेळा नव्हे, अनेकदा ऐकले. जुन्या काळात हिंदीमध्ये ‘बिनाका गीतमाला’ असायची. आता ती नव्याने उपलब्ध आहे. त्याही पुनः पुन्हा ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. संपूर्ण गीत-रामायण पुन्हा ऐकलं. ग. दि. माडगुळकरांनी काय जबरदस्त कलाकृती या देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सांस्कृतिक विश्वात निर्माण करून ठेवलीय याचा पुन्हा प्रत्यय आला.
तुमचा राममंदिराच्या आंदोलनाशी कधी संबंध आला नाही, पण गीत-रामायणाशी येतोय…
– नाही. त्या आंदोलनाशी कधी संबंध आला नाही.
पण रामायणाशी संबंध आलाय…
– तो गीत-रामायणाच्या माध्यमातून!
कोरोनाचं संकट तर राहणारच आहे असं जागतिक तज्ञांचं मत आहे. हे संकट एवढ्यात दूर होणार नाही. ते तसंच राहील, पण लॉकडाऊनचं संकट कितीकाळ राहील असं आपल्याला वाटतं?
– एक गोष्ट तर या काळात स्पष्ट झालेली आहे की, इथून पुढे तुम्हाला, मला, आपणा सर्वांना कोरोनासोबत जगायची तयारी ठेवली पाहिजे. कोरोना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय अशा प्रकारची भूमिका तज्ञांकडून मांडली गेली आहे. त्यामुळे आता आपणही हे स्वीकारायलाच हवं. ही परिस्थिती गृहीत धरूनच पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रश्न आहे तो लॉकडाऊनचा. चिंताजनक परिस्थिती निर्माण करतो तो लॉकडाऊन.
म्हणजे लॉकडाऊनबरोबर सुद्धा जगावं लागेल का?
– नाही. अगदीच तसं नाही. लॉकडाऊनसह कायम जगावं लागेल असं मला वाटत नाही. अलीकडेच मी काही तज्ञांशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की, साधारणतः जुलै महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापासून तो ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण खाली जाईल आणि पुन्हा नॉर्मलसी येईल, पण याचा अर्थ कोरोना कायमचाच संपला असं काही गृहीत धरण्याचं कारण नाही. कधी रिव्हर्सही होऊ शकतो. त्यामुळे यापुढे आपल्याला कोरोनाची काळजी घ्यावी लागेल आणि आपल्या सगळय़ा व्यवहारात काळजी घेण्याची गरज आहे, पण कोरोनासारखी अशी परिस्थिती पुन्हा उफाळून आली तर लॉकडाऊन करण्याची वेळ येते आणि लॉकडाऊन केल्यामुळे जे परिणाम झालेत, उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेवर झालेत, कुटुंबात झालेत, व्यापारावर झालेत, प्रवासावर झालेत. हे सगळं आपण आता पाहिलंय. यापुढे अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये अशी आपली प्रार्थना आहे, पण अर्थसंकट आलंच तरी आपली सर्वांची त्यासाठी तयारी असली पाहिजे.
त्यासाठी समाजात जागृकता आणणं गरजेचं आहे असं का वाटतंय?
– हो नक्कीच. माझं तर स्वच्छ मत आहे की, इथून पुढे आता आपल्या पाठ्यपुस्तकात हा दोन-अडीच महिन्यांचा जो कालखंड आपण अनुभवला यासंबंधी जी काळजी अथवा खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे यावर आधारित एखाद् दुसरा धडा पाठय़पुस्तकात असणं गरजेचं आहे.
गेले काही दिवस ज्या बातम्या येताहेत त्या आधारावर असं विचारतोय की, लॉकडाऊनसंदर्भात आपली भूमिका आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे. मतभेद आहेत.
– अजिबात नाही. कसले मतभेद? मतभेद कशाकरता? या संपूर्ण काळात माझा मुख्यमंत्र्यांशी उत्तम संवाद होता. आजही आहे.
पण लॉकडाऊन शिथिल करावा अशी आपली भूमिका होती आणि त्यासंदर्भात मतभेद होते असं प्रसिद्धी माध्यमात आलंय.
– प्रसिद्धी माध्यमात काय आलंय ते येऊ द्या. एक लक्षात घेतलं पाहिजे. वृत्तपत्रांच्या काही समस्या असतात. जसं लॉकडाऊनमुळे आम्हाला घराबाहेर पडता येत नाही, आमची बरीचशी कामं करता येत नाहीत, बऱयाचशा ऑक्टिव्हिटीज थांबल्यात याचे परिणाम जसे बऱयाचशा घटकांवर झाले आहेत तसे वृत्तपत्रांवरही झाले आहेत. मुख्य परिणाम म्हणजे, त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे जे उद्योग असतात, कार्यक्रम असतात ते कमी झाले आणि त्यामुळे जागा भरण्यासंबंधीची जबाबदारी त्यांना टाळता येत नाही. मग यांच्यात आणि त्यांच्यात नाराजी आहे अशा बातम्या दिल्या जातात. दोन-तीन दिवस मी वाचतोय की आमच्यात म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद वाढताहेत. त्यात यत्किंचितही सत्य नाही, पण त्या बातम्या येताहेत. येऊ द्या!
माझा प्रश्न असा होता की, लॉकडाऊन हळूहळू उठवावा अशी आपली भूमिका आहे. लोकांना मोकळीक दिली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे.
– हे पहा, यात माझं स्वच्छ म्हणणं असं आहे की, सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. इथे तशी आवश्यकताच होती. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती. आपण न्यूयॉर्कसंबंधीची वृत्ते वाचतो की, हजारो लोकांना या संकटामुळे मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आली. तीच स्थिती इथे आली असती. इथे कठोरपणे लॉकडाऊन राबवला आणि विशेष म्हणजे लोकांनी त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारायला मदत झाली. नाहीतर अनर्थ झाला असता. पहिले दोन महिने-अडीच महिने याची आवश्यकता होती. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्य सरकारचा दृष्टिकोन शंभर टक्के बरोबर होता. आमचा सगळ्यांचा याला मनापासूनचा पाठिंबा होता.
लॉकडाऊनचा सगळय़ात मोठा फटका कामगार व उद्योजकांना बसला. त्यामुळे शिथिलता आणावी असं आपलं मत होतं…
– या काळात मी अनेकांशी चर्चा केली. त्यात उद्योजकही होते, कामगार संघटनांचे लोक होते, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझं एक मत बनलं ते मी मुख्यमंत्र्यांच्या नक्कीच कानावर घातलं. याला मतभेद म्हणत नाहीत. स्पष्ट सांगायचं म्हणजे काही ठिकाणी, उदाहरणार्थ दिल्ली. दिल्लीत रिलॅक्सेशन केलं. काय झालं तिथे? त्याची झळ बसली, पण व्यवहार हळूहळू सुरू झाले. कर्नाटकच्या सरकारने रिलॅक्सेशन केलं. त्याच्यातही काही परिणाम झाले, नाही असं नाही. पण कर्नाटकातील व्यवहार सुरू झाले. हे महत्त्वाचे. या पद्धतीने पावले टाकावी लागतील. कारण सबंध समाजाची, राज्याची, देशाची अर्थव्यवस्था कम्प्लिट उद्ध्वस्त झाली तर कोरोनापेक्षा त्याचे दुष्परिणाम पुढे काही पिढ्यांना सहन करावे लागतील. त्यामुळे ही अर्थव्यवस्था पुन्हा कशी सावरता येईल त्यादृष्टीने काळजी घेऊन आपण पुढे कसं जायचं याचा विचार करावा लागेल. तेवढ्यापुरता निर्णय घ्यावा लागेल. याचा अर्थ सगळं खुलं करा असा नव्हे, पण थोडीबहुत तरी आता हळूहळू मोकळीक द्यायला हवी. तशी ती दिली आहे. उदाहरणार्थ परवा मुख्यमंत्री ठाकरे यांनी सलून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला, त्याची आवश्यकता होती. कारण अनेक आमचे मित्र भेटायचे. त्यांना पाहून त्यांच्या डोक्यावर एवढे केस आहेत हे पहिल्यांदाच कळलं. कोरोनाचा परिणाम! दुसरी गोष्ट अशी की या व्यवसायात असलेल्या लोकांच्या कौटुंबिक समस्या फार वाढायला लागलेल्या होत्या. त्यादृष्टीने सलून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो माझ्या मते योग्य निर्णय होता.
म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पद्धतीने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला…
– नक्कीच. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत हा फरक आहे तर…
– बरोबर आहे… हा फरक आहे. तसा तो राहणारच!
बाळासाहेब ठाकरे तडकाफडकी निर्णय घेऊन निर्णयाला सामोरे जात, पण बाळासाहेब कधीच सत्तेत नव्हते आणि उद्धव ठाकरे प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहेत…
– हादेखील फरक आहेच ना. बाळासाहेब हे प्रत्यक्ष सत्तेत नसले तरी सत्तेच्या पाठीमागचे एक मुख्य घटक होते. त्यांच्या विचाराने सत्ता महाराष्ट्रात आली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. आज विचाराने सत्ता आली नाही, पण सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या संबंधीची जबाबदारी आताचे मुख्यमंत्री ठाकरे यांची आहे. हा फरक महत्त्वाचा आहे.
या सगळ्या परिस्थितीत कधी तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का?
– येते ना. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पहिले दोन महिने स्वस्थपणे घरामध्ये बसून होतो. बाळासाहेबांची कामाची पद्धत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. ते काय दिवसभर घराच्या बाहेर पडून कुठे गेलेले असायचे असे नाही. अनेक वेळेला ते दिवस दिवस घरातच घालवायचे, पण ते घरात असतानासुद्धा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करून आलेल्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी शिकवलं होतं असं मला वाटतं. माझ्यासारख्याला या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण अशासाठी येत होती की, आपण घरातून तर बाहेर पडायचं नाही, पण बाकीची कामं, ज्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेला जाण्याच्या प्रवासाची तयारी आपण केली पाहिजे. ते ज्या पद्धतीने बाळासाहेब करायचे त्याची आठवण या काळात आली.
कोरोनामुळे संपूर्ण जग बदललंय. त्या बदललेल्या जगाचा परिणाम हिंदुस्थानवरसुद्धा होतोय, देशावरसुद्धा होतोय. म्हणजे परदेशात जो नोकरदार वर्ग जगभरात पसरला होता, जो आपला होता तो आपल्या देशात परत आलाय. मगाशी आपण न्यूयॉर्कचा उल्लेख केलात. तिथूनसुद्धा हजारो लोक इथे परत आले. या बदललेल्या जगाकडे आपण कसं पाहता?
– माझ्या मते एक संधी म्हणून या परिस्थितीकडे आपण बघितलं पाहिजे. हे संकट आहे. या संकटामुळे पहिल्यांदा लक्षात आलं की, जगाच्या कानाकोपऱयात भारतीय कुठे कुठे पोहोचलेत. विशेषतः लॉकडाऊनच्या पहिल्या दोन महिन्यांत मुंबईत बसून एक काम फार करावं लागलं. ते काम असं की, अनेक देशांतून टेलिफोन यायचे की आमच्या देशात इतके इतके भारतीय आहेत. त्यांना परत यायचंय. त्यांना परतण्यासाठी विमानाच्या व्यवस्थेसाठी सहकार्य करा. मला आश्चर्याचा धक्का केव्हा बसला? जेव्हा फिलिपिन्समधून 400 मुलं मेडिकल एज्युकेशन घेणारी परत आणण्याची व्यवस्था मला करावी लागली. ताश्कंदवरून तीनशे-साडेतीनशे विद्यार्थी हे आणण्यासंबंधी व्यवस्था मला करावी लागली. इंग्लंड, अमेरिकेचे ठीक आहे, पण हे जे देश आहेत या देशात एवढय़ा मोठय़ा संख्येने आपले विद्यार्थी गेले आहेत हे माहीतच नव्हतं. जगाच्या कानाकोपऱयात भारतीय आणि मराठी हे दोन्ही बघायला मिळाले. हे कोरोनामुळे घडलं!
या सगळ्या प्रकरणात या देशाचं आणि राज्याचं राजकारणच बदलून गेलं आहे. आतापर्यंत आपल्यासारखे मोठे नेते हे जाहीरसभा घ्यायचे. हजारो-लाखोंच्या सभांना संबोधित करायचे. प्रधानमंत्री मोदी असतील. आपण असाल, इतर नेते असतील. आता हे सगळं बंद होणार. हे राजकारणालाच लॉकडाऊन झालं की काय!
– तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आजतरी चित्र तसंच दिसतंय. नव्या पद्धतीचे राजकारण आता स्वीकारावे लागेल.
मुळात आपल्या भारतीय राजकारणाचा आत्मा गर्दी आहे. गर्दी नसेल तर आपलं राजकारण इंचभरही पुढे जाणार नाही. आपला संदेश पुढे जाणार नाही. लाखांची गर्दी जो जमवतो तो मोठा नेता हे आतापर्यंत आपल्या देशातलं चित्र होतं.
– ही स्थिती एकदम बदलेल असं मला वाटत नाही. हळूहळू पूर्वपरिस्थिती येत जाईल, पण आपल्याला ही स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. आपण अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक बघतो. त्या निवडणुकीत चित्रं अगदी वेगळं असतं. आपल्याकडे चित्र वेगळं आहे. आपण भारतात बघतो, बाळासाहेबांची लाखोंची सभा व्हायची. अटलजींची लाखांची सभा व्हायची. इंदिरा गांधींची व्हायची. यशवंतराव चव्हाणांची व्हायची. हे चित्र अमेरिकेत किंवा पश्चिमी देशात बघायला मिळत नाही, पण टेलिव्हिजन आणि रेडिओच्या माध्यमातून सबंध देशाचे लक्ष त्या दिवशीच्या चर्चेकडे असायचे. समजा, राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार वा प्रतिस्पर्धी उमेदवार या दोघांमध्ये डिस्कशन, चर्चा, प्रश्नोत्तरे असतात त्याकडे लागलेलं असतं. सबंध देश हे बघत असतो, पण ते पाहण्याचं आणि व्यक्त करण्याचं माध्यम वेगळं आहे. आपलं माध्यम वेगळं आहे.
महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय!
‘कोरोनासारखं एवढं मोठं संकट तीन विचाराचे तीन पक्ष, पण सगळे जण एका विचारानं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहोत, आणि या परिस्थितीला तोंड देताहेत. लोकांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहताहेत. हे घडू शकलं याचा अर्थ माझी खात्री आहे, हे एकदिलाने काम सुरू आहे म्हणून घडू शकलं. या तिन्ही पक्षांत यत्किंचितही नाराजी नाही.’
आपल्याकडे कसं आहे. इथल्या राजकीय नेत्याला, वक्त्याला समोर गर्दी नसेल तर त्याच्या बोलण्याला धार येत नाही. मी बोलतोय ते समोरच्याला किती पटतंय, किती डायजेस्ट होतंय, हे त्यांच्या चेहऱयावरून कळत असतं आणि समजा तो स्तब्ध राहिला… गर्दीचा अजिबातच प्रतिसाद मिळत नसला तर त्याचाही परिणाम वक्त्यावर होत असतो. या सगळय़ांतून आपण गेलोय, पण आता हळूहळू या सगळय़ा जुन्या पद्धती आपल्याला बदलाव्या लागतील. म्हणजे मी त्या शंभर टक्के संपतील असं म्हणत नाही, पण त्या हळूहळू कमी होणारच. कम्युनिकेशनची मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याचा विचार करावा लागेल.
आपल्याकडे हे डिजिटल सभेचे प्रकरण रुजेल?
– आपल्याकडे कसं आहे. इथल्या राजकीय नेत्याला, वक्त्याला समोर गर्दी नसेल तर त्याच्या बोलण्याला धार येत नाही. मी बोलतोय ते समोरच्याला किती पटतंय, किती डायजेस्ट होतंय, हे त्यांच्या चेहऱयावरून कळत असतं आणि समजा तो स्तब्ध राहिला… गर्दीचा अजिबातच प्रतिसाद मिळत नसला तर त्याचाही परिणाम वक्त्यावर होत असतो. या सगळय़ांतून आपण गेलोय, पण आता हळूहळू या सगळय़ा जुन्या पद्धती आपल्याला बदलाव्या लागतील. म्हणजे मी त्या शंभर टक्के संपतील असं म्हणत नाही, पण त्या हळूहळू कमी होणारच. कम्युनिकेशनची मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याचा विचार करावा लागेल.
पण ग्रामीण भागात हे कसं रुजणार? विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारचं वातावरण आपण स्वतः निर्माण केलंत त्यामुळे पुढे परिवर्तन होऊ शकलं. विशेषतः तुमची भरपावसातली सातारसारखी सभा ही नवीन यंत्रणेत कशी होणार? लोकांना मनापासून वाटतं की मी माझ्या नेत्याला पाहावं, समोरून ऐकावं. हे सर्व थांबेल असं वाटत नाही का यापुढे?
– नक्कीच हे थांबेल. माझ्यासारख्या माणसाला, माझ्या पिढीच्या माणसाला ते थांबलं तर मजा नाही. लोकांमध्ये जावचं लागेल. निवडणुकीच्या सभेतसुद्धा जान नाही अशीसुद्धा स्थिती येईल की काय याची चिंता आहे, पण हे फार दिवस चालेल असं वाटत नाही. चालू नये अशी प्रार्थना आहे.
एक वर्षापूर्वी या देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. साधारण देशाची परिस्थिती आणि राजकारण ‘जैसे थे’ राहिले. म्हणजे जी व्यवस्था होती ती व्यवस्था कायम राहिली. प्रधानमंत्री मोदी आहेत. त्यांचे सरकार कायम राहिले. केंद्रातील राजकीय व्यवस्था बदलेल अशी शक्यता नव्हतीच. लोकसभेचे निकाल लागायचे तसेच लागलेत. पण काही राज्यांत बदल झाले. विशेषतः आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचे राजकारण सहा महिन्यांपूर्वी पूर्ण बदलून गेले. अशाप्रकारे बदललं की संपूर्ण देश या महाराष्ट्राच्या घडामोडींकडे भविष्यातला एक वेगळा विचार म्हणून पाहू लागले. अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की, हा जो बदल आहे महाराष्ट्रातला. हा एक अपघात होता. त्या वेळेला झाला? की हा बदल सगळय़ांनी ठरवून केला?
– मला अपघात अजिबात वाटत नाही. दोन गोष्टी आहेत, महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक? देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीत फारसं अंतर नव्हतं. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या मराठी जनतेनंसुद्धा देशातलं जे चित्रं होतं त्याच्याशी सुसंगत महत्त्वाची भूमिका घेतली. पण राज्याचा प्रश्न आला त्या वेळेला महाराष्ट्रातलं चित्रं वेगळं आपल्याला दिसायला लागलं. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यांतही दिसत होतं. कुठे काँगेस आली… कुठे इतर आघाडय़ा सत्तेवर आल्या. आता मध्य प्रदेशचं उदाहरण घ्या किंवा राजस्थान, झारखंड, छत्तीसगड.. या सगळय़ा राज्यांत चित्र बदललं. लोकसभेला तेथे जागा होत्या, पाठीशी केंद्रातलं सरकार होतं, पण विधानसभेला भाजपची पीछेहाट पाहायला मिळाली. महाराष्ट्रात माझ्या मते चित्र बदलायचा मूड लोकांचा होता.
असं आपण कसं म्हणता?
– उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वीचा काळ पहा. या पाच वर्षांत शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं, पण शिवसेनेच्या विचाराचा जो मतदार आहे आणि शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे त्या सगळय़ांमध्ये त्या सरकारविषयी एकप्रकारची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती.
असं तुम्हाला काय जाणवलं?
– शिवसेनेची काम करण्याची विशिष्ट पद्धत आहे. एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर ठोसपणाने ती राबवायची. त्यासाठी कितीही कष्ट आणि किंमत देण्याची तयारी ठेवायची. भाजपसोबतच्या सहभागाच्या या कालखंडात शिवसेनेने मोठी किंमत मोजली. साधारणतः शिवसेनेला गप्प कसं ठेवता येईल, थांबवता कसं येईल, त्यांना बाजूला कसं ठेवता येईल ही भूमिका भाजपने सातत्याने घेतली. त्यामुळे हा शिवसेनेस मानणारा वर्ग बाजूला झाला. शिवसेनेला मानणारा वर्ग अस्वस्थ होता. दुसरी गोष्ट, ती पाच वर्षे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली ती खऱया अर्थाने भाजपचंच सरकार असावं अशीच होती. याच्याआधी युतीचं सरकार होतं. 1995 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यात हे असं वातावरण कधी नव्हतं. याचं कारण त्याचं नेतृत्व शिवसेनेकडे होतं आणि बाळासाहेबांकडे होतं. या सरकारच्या मागे त्यांची भक्कम भूमिका होती. आता जे या दोघांचं सरकार होतं त्यात भाजपने शिवसेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजप हेच खरे राज्यकर्ते आणि या पुढच्या कालखंडात राज्य भाजपच्या नेतृत्वाच्या विचारानेच चालणार ही भूमिका भक्कमपणानं घेऊन त्यांनी पावलं टाकली. महाराष्ट्राच्या जनतेला हे पटत नव्हतं.
म्हणजे या महाराष्ट्रात आम्हीच राजकारण करणार, दुसरं कोणी करणार नाही…
– हो, करूच शकत नाही. दुसरं कोणी इथं राजकारण करूच शकत नाही अशी भावना दिसत होती.
मग या विरोधात लोकांचं बंड उफाळून मतपेटीतून आलं असं वाटतं का?
– अगदी सरळ सरळ तसंच चित्र आहे आणि थोडाफार हा चेष्टेचाही विषय झाला की ‘मी परत येणार… मी परत येणार…’
मी पुन्हा येईन…
– हो, मी पुन्हा येईन… या सगळय़ामुळे एक तर असं आहे की, कुठल्याही राज्यकर्त्याने, राजकीय नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नसतं. अशा गृहीत धरण्यात थोडासा दर्प आहे अशा प्रकारची भावना लोकांच्यात झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले की, माझं सरकार गेलं किंवा मी मुख्यमंत्रीपदी नाही हे पचवणं खूप कठीण गेलं. हे समजून घ्यायलाच दोन दिवस लागले. याचा अर्थ असा आहे की, आपली सत्ता कधीच जाणार नाही या भूमिकेत…अमरपट्टाच बांधून आलेलो आहोत.
– हे पहा, कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणाऱया व्यक्तीलासुद्धा पराभव पाहावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालासुद्धा पराभव पाहायला मिळाला. याचा अर्थ असा आहे की, या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाराच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांपेक्षा अधिक शहाणा आहे आणि आमचं पाऊल चाकोरीच्या बाहेर टाकतोय असं दिसलं की तो आम्हालाही धडा शिकवतो. त्यामुळे कोणतीही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच! आम्हीच येणारच… तर लोकांना ते आवडत नाही.
105 आमदारांचं बळ असतानासुद्धा प्रमुख पक्ष सत्ता स्थापू शकला नाही. सत्तेवर येऊ शकला नाही. हीसुद्धा एक अजब कला किंवा महाराष्ट्रात चमत्कार होता. याला तुम्ही काय म्हणाल?
– असं आहे की, तुम्ही ज्याला प्रमुख पक्ष म्हणताय तो प्रमुख कसा बनला याच्याही खोलात जायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की, विधानसभेला त्यांच्या आमदारांची 105 ही जी फिगर झाली त्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यातून तुम्ही शिवसेना मायनस केली असती, त्याच्यात सामील नसती तर 105 चा आकडा तुम्हाला कुठेतरी 40-50 च्या आसपास यावेळी दिसला असता. भाजपचे लोक जे सांगतात की, आम्ही 105 असतानाही आम्हाला आमच्या सहकाऱयाने म्हणजे शिवसेनेने दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं. त्यांना 105 पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहीत धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटत नाही की इतरांनी काही वेगळं करण्याची आवश्यकता आहे.
पण त्यांना जे जमले नाही ते शरद पवार यांनी जमवून दाखवलं आणि शिवसेनेला भाजपशिवाय मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं.
– असं म्हणणं हे पूर्ण खरं नाही. मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत, पण बाळासाहेबांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही.
का…? असं का वाटतं आपल्याला?
– सांगतो ना. त्याचं कारण असं आहे की, बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची विचारधारा यात अंतर होतं. विशेषतः कामाच्या पद्धतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला. त्यांनी अटलबिहारी वाजपेयींचा केला, त्यांनी आडवाणींचा केला, त्यांनी प्रमोद महाजनांचा सन्मान केला. या सगळय़ांना त्यांनी सन्मानाने वागणूक देऊन त्यातून एकत्र येण्याचा विचार केला आणि पुढे सत्ता येण्यात हातभार लावला. दुसरी गोष्ट अशी होती की, काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष होता असं मला वाटत नाही. शिवसेना ही काँग्रेसच्या कायमचीच विरोधात होती असं नाही.
बाळासाहेब हे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट हे तोंडावर म्हणणारे नेते होते. त्यामुळे हे घडलं असावं.
– हो बाळासाहेब तसेच होते. जितके रोखठोक तितकेच दिलदार. राजकारणात ही अशी दिलदारी दुर्मिळ आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही या देशातील एकमेव संघटना अशी असेल की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची काय स्थिती होईल याची यत्किंचितही तमा न बाळगता पाठिंबा द्यायचे. म्हणजे आणीबाणीच्या काळातदेखील इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा फैसला करणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेब इंंदिरा गांधींसोबत उभे राहिले. नुसतेच उभे राहिले असं नाही तर आम्हाला सगळय़ांना धक्काच बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली, की महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी उमेदवारसुद्धा उभा करणार नाही! राजकीय पक्ष चालवणाऱयांनी मी उमेदवार उभा करणार नाही असं म्हणून त्या संघटनेचे नेतृत्व टिकवणं ही काही साधी गोष्ट नाही, पण ते बाळासाहेब ठाकरे करू जाणोत आणि त्यांनी ते केलं. त्याचं कारण काँगेससंबंधी त्यांच्या मनात तसा विद्वेष नव्हता. काही धोरणांसंबंधी स्पष्ट मतं होती. त्यामुळे तो एक वेगळा पैलू त्यावेळी पाहायला मिळाला आणि आज कमीजास्त प्रमाणात त्याच मार्गाने उद्धव ठाकरे चाललेत असं म्हणायला हरकत नाही.
तुमचंसुद्धा कधी शिवसेनेशी वैचारिक नातं होतं असं म्हणता येणार नाही.. पण आज आपण महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये एकत्र आहात..
– वैचारिक मतभेद होते. काही गोष्टीत असतीलही, पण सुसंवाद नव्हता असं नाही. बाळासाहेबांशी सुसंवाद होता. शिवसेनेच्या आताच्या नेतृत्वापेक्षाही अधिक सुसंवाद होता. भेटीगाठी, चर्चा, एकमेकांकडे जाणं. या सगळय़ा गोष्टी होत्या. आणि अनेक वेळेला मी जाहीरपणेसुद्धा बोललोय. बाळासाहेबांनी एखादी व्यक्ती, कुटुंबाच्या संबंधी, पक्षाच्या संबंधी वैयक्तिक सुसंवाद ठेवला किंवा वैयक्तिक ऋणानुबंध ठेवला तर त्यांनी कधी कशाची फिकीर बाळगली नाही. ते ओपनली मदत करीत होते. म्हणून मी माझ्याच घरातलं उदाहरण जाहीरपणानं सांगितलं, की सुप्रियाच्या वेळेस तिला फक्त बाळासाहेबांनी बिनविरोध निवडून दिले. हे फक्त बाळासाहेबच करू शकतात.
तुम्ही राज्यात महाविकास आघाडीचा जो प्रयोग केलात. तुम्ही त्याचं नेतृत्व केलंत. त्याला सहा महिने होऊन गेले. हा प्रयोग यशस्वी होतोय असं आपल्याला वाटतं का?
– नक्की होतोय. हा प्रयोग आणखीन यशस्वी होऊन या प्रयोगाची फळं महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा विभागाला मिळताहेत अशी स्थिती आपल्याला नक्कीच बघायला मिळाली असती. पण हे कोरोनाचं संकट आलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. गेले काही महिने राज्य प्रशासन, आणि राज्यकर्ते आणि राज्याची संपूर्ण यंत्रणा फक्त एकाच कामात गुंतलेली आहे कोरोनाविरुद्ध लढण्याच्या. त्यामुळे बाकीचे सगळे प्रश्न बाजूला राहिले. अशीच दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हा आताचा सेटअप नसता तर या कोरोनाच्या संकटालासुद्धा इतक्या प्रभावीपणे तोंड देता आलं नसतं. तुम्ही लक्षात घ्या. कोरोनासारखं एवढं मोठं संकट तीन विचाराचे तीन पक्ष, पण सगळे जण एका विचारानं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहोत, आणि या परिस्थितीला तोंड देताहेत. लोकांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहताहेत. हे घडू शकलं याचा अर्थ माझी खात्री आहे, हे एकदिलाने काम सुरू आहे म्हणून घडू शकलं. या तिन्ही पक्षांत यत्किंचितही नाराजी नाही.
आणि श्रेय लाटण्याची धडपडही नाही.
– अजिबात नाही.
पुलोद हा एक प्रयोग तुम्ही या देशात सगळय़ात पहिला केलात. अनेक पक्ष एकत्र आणून एक राज्य निर्माण केलं. पुलोदचं सरकार आणि आताचं महाविकास आघाडीचं सरकार यांच्यात तुम्ही काय फरक कराल?
– फरक असा आहे की, पुलोद सरकारचं नेतृत्व माझ्याकडे होतं. त्या सरकारात सगळे होते, आजचे जे भाजप आहे ते त्या वेळी जनसंघाचे म्हणून होते. तेही त्याच्यात होते आणि मंत्रिमंडळ एका विचारानं काम करणारे होते. त्यात कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, केंद्र सरकारची त्याला मोठय़ा प्रमाणावर साथ होती. पुलोदचं सरकार आलं त्या वेळी देशाचं नेतृत्व मोरारजीभाई देसाई यांच्याकडे होतं. ते पंतप्रधान म्हणून महाराष्ट्रातल्या पुलोदच्या सरकारला पूर्ण ताकदीने मदत करत होते. आज फरक थोडासा असा आहे की, या ठिकाणी आयडीऑलॉजी वेगळी असेल, तरीही एका विचारानं काम करणारे लोक एकत्र आले आहेत, दिशा कोणती आहे याच्यात स्पष्टता आहे आणि त्या दिशेने जाण्याचा प्रवास नीट राहील आणि तो लोकांच्या हिताचा असेल याची काळजी घेण्याची भूमिका घेतली आहे, पण पुलोदच्या वेळेला जसा केंद्राचा पाठिंबा मजबूत होता तसा या वेळेला या ठिकाणी आहे असं मला दिसत नाही.
या सरकारचे तुम्ही हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?
– दोन्ही नाही. हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. रिमोट चालतं कुठे? जिथे लोकशाही नाही तिथं! आपण रशियाचं उदाहरण पाहिलं. पुतीन 2036 पर्यंत अध्यक्ष राहणार. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सगळे बाजूलाच केलेले आहे. त्यामुळे आपण म्हणू त्या पद्धतीने सरकार चालवले पाहिजे हा अट्टहास आहे, पण इथे लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलने कधी चालू शकत नाही. मलाच ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहेत!
सौजन्य : सामना वृत्तपत्र
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .